व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?

मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?

तुम्ही ऑनलाईन आहात. अलीकडेच झालेल्या एका पार्टीचे फोटो पाहत आहात. तुमचे सगळे मित्र आणि मैत्रिणी दिसताहेत. अगदी धमाल करताहेत सर्व जण. पण या फोटोंमध्ये एकाच गोष्टीची कमी आहे—त्यांत तुम्ही नाही!

तुमच्या मनात विचार येतो, ‘मला का नसेल बोलावलं?’

आधी तर तुम्ही विचार करू लागता की काय कारण असू शकेल, पण त्यानंतर तुम्हाला राग येतो. तुमच्या मित्रांनी तुम्हाला दगा दिला आहे असं तुम्हाला वाटतं. जणू तुमची सगळी नाती पत्त्यांच्या घरासारखी एका क्षणात कोलमडून पडली आहेत असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला अगदी एकटं वाटतं आणि तुम्ही विचार करता, ‘मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?’

 पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या

 चूक की बरोबर

  1.  १. तुम्हाला भरपूर मित्र असतील, तर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही.

  2.  २. तुम्ही एखाद्या सोशल नेटवर्कचे सदस्य बनलात, तर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही.

  3.  ३. मित्रमैत्रिणींसोबत सतत चॅट करत राहिलात, तर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही.

  4.  ४. तुम्ही इतरांसाठी काही ना काही करत राहिलात, तर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही.

 ही चारही विधानं चूक आहेत.

 का?

 मैत्री आणि एकटेपणाबद्दल काही खरी माहिती

  •   भरपूर मित्र असले तरी तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही याची खातरी नाही.

     “मी माझ्या मित्रमैत्रिणींना खूप जीव लावते, पण कधीकधी वाटतं की ते मला तितका जीव लावत नाहीत. मित्रांच्या गराड्यात असूनही कधीकधी तुम्हाला जाणवतं, की तुमचं त्यांच्यावर जितकं प्रेम आहे तितकं त्यांचं नाही, किंवा त्यांना तुमची गरज नाही. अशा वेळी जाणवणारा एकटेपणा सगळ्यात वाईट असतो.”—ॲन.

  •   एखाद्या सोशल नेटवर्कचे सदस्य बनलात तरी तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही, याची खातरी नाही.

     “काही लोकांना जसा बाहुल्या आणि लहानसे पुतळे गोळा करण्याचा छंद असतो, तसेच काही जण मित्र गोळा करतात. पण अशा ढीगभर बाहुल्या गोळा केल्या तरी त्या तुमच्यावर प्रेम थोडंच करणार आहेत. तसंच, अर्थपूर्ण नाती असल्याशिवाय, ढीगभर ऑनलाईन फ्रेंड्‌स असणं हे त्या निर्जीव बाहुल्या गोळा करण्यासारखंच आहे.”—इलेन.

  •   सतत चॅट करत राहिलात तरी तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही, याची खातरी नाही.

     “कधीकधी एकटं वाटतं तेव्हा एखाद्या फ्रेंडचा मेसेज तर आला नसेल, हे पाहण्यासाठी तुम्ही सारखा फोन चेक करत राहता. एकतर आधीच तुम्हाला एकटं वाटत असतं; त्यात कुणीही मेसेज केलेला नाही, हे पाहिल्यावर तुम्हाला आणखीनच वाईट वाटू शकतं!”—सरीना.

  •   इतरांसाठी काही ना काही करत राहिलात तरी तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही, याची खातरी नाही.

     “मी आजपर्यंत नेहमीच माझ्या मित्रमैत्रिणींना भरभरून दिलंय, पण ते माझ्याशी तसंच वागत नाहीत असं कधीकधी वाटतं. मी त्यांच्यासाठी केलं याची खंत नाही, पण त्याच्या बदल्यात त्यांना माझ्यासाठी कधीच काही करावंसं वाटू नये, याचं आश्‍चर्य वाटतं.”—रिचर्ड.

 सांगायचा मुद्दा: एकटेपणा ही मुळात एक मानसिकता आहे. जॅनेट नावाची एक तरुणी म्हणते त्याप्रमाणे, “तो बाहेरच्या गोष्टींमुळे नाही, तर एका व्यक्‍तीच्या मनातल्या विचारांमुळे निर्माण होतो.”

 आपल्याला कुणीही मित्र नाही किंवा आपण अगदी एकटे आहोत, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता?

 कशी कराल या समस्येवर मात?

आत्मविश्‍वास वाढवण्याचा प्रयत्न करा.

 “एकटेपणा हा मुळात असुरक्षिततेच्या भावनेतून निर्माण होतो. दुसऱ्‍या व्यक्‍तीने आपल्यामध्ये इंट्रेस्ट घेण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर साहजिकच इतरांशी मैत्री करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावासा वाटणार नाही.”—जॅनेट.

 बायबल म्हणतं: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (गलतीकर ५:१४) चांगले मैत्रीसंबंध जोडण्यासाठी, काही प्रमाणात आत्मसन्मान असणं गरजेचं आहे. अर्थात, हा आत्मसन्मान कधीही स्वार्थी अहंकारात बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.—गलतीकर ६:३, ४.

स्वतःची कीव करू नका.

 “एकटेपणा हा दलदलीसारखा असतो. तुम्ही जितकं यात अडकून राहाल, तितकंच बाहेर पडणं मुश्‍कील होऊन बसेल. आणि मी एकटी आहे, एकटी आहे असाच जर तुम्ही सतत विचार करत राहिलात, तर कुणालाही तुमच्यासोबत राहावसं वाटणार नाही आणि मग तुम्ही आणखीनच एकटे व्हाल.”—एरिन.

 बायबल म्हणतं: “प्रेम . . . स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:५) खरं पाहता, आपण स्वतःबद्दल खूप जास्त विचार करतो, तेव्हा आपण इतरांना सहानुभूती दाखवू शकत नाही आणि अशा व्यक्‍तीशी साहजिकच कुणालाही मैत्री करावीशी वाटत नाही. (२ करिंथकर १२:१५) एक गोष्ट नक्की: इतर जण कसे वागतात यावरून जर तुम्ही तुमचं यश मोजणार असाल, तर तुम्ही कधीही यशस्वी ठरणार नाही! “मला कधीच कुणी कॉल करत नाही” किंवा “मला कुणीही पार्टीला इन्व्हाइट करत नाही” असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा खरंतर तुम्ही तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्‍यांच्या हातात देत असता. इतरांना आपल्यावर इतकं नियंत्रण करू देणं तुम्हाला योग्य वाटतं का?

मैत्री करण्यासाठी कुणीही चालेल अशी वृत्ती ठेवू नका.

 “कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं असं एकाकी लोकांना वाटत असतं; मग तो कुणी का असेना, असा विचार करण्याइतपत त्यांची केविलवाणी स्थिती होते. फक्‍त कुणालातरी आपण हवेहवेसे वाटावे असं त्यांना वाटत असतं. पण काही लोक असं भासवतील की तुम्ही त्यांना हवेहवेसे वाटता, आणि नंतर तुमचा गैरफायदा घेतील. मग तुम्हाला आधीपेक्षाही जास्त एकटं वाटेल.”—ब्रीयाना.

 बायबल म्हणतं: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) भुकेने कासावीस झालेला माणूस काहीही खायला तयार होतो. त्याच प्रकारे, जे मित्रांसाठी आसूसलेले असतात ते चुकीच्या ठिकाणी मित्र शोधण्याची शक्यता आहे. मैत्रीच्या नावाखाली इतरांचा फायदा घेणारे लोक अशा व्यक्‍तींना सहज आपले शिकार बनवू शकतात. एकटेपणामुळे निराश झालेली व्यक्‍ती अशा नात्यालाही नॉर्मल समजते. चांगल्या मैत्रीची मी अपेक्षाच करू शकत नाही, असा ती विचार करते.

 तात्पर्य: सर्वांनाच अधूनमधून एकटंएकटं वाटतं, कुणाला कमी प्रमाणात तर कुणाला जास्त. आणि एकटेपणाची भावना खूप दुःखदायक असली तरी शेवटी ती एक भावनाच असते. भावना या आपल्या विचारांतून जन्म घेतात आणि काय व कसा विचार करावा यावर नियंत्रण करणं हे सर्वस्वी  आपल्या हातात आहे.

 तसंच, इतरांकडून तुम्ही ज्या अपेक्षा करता त्यांबाबतीतही वाजवी असा. याआधी जिचा उल्लेख करण्यात आला होता ती जॅनेट म्हणते, “प्रत्येकच व्यक्‍ती काही कायमची तुमची बेस्ट फ्रेंड राहणार नाहीय. पण तुमच्याबद्दल काळजी असणारे लोक तुम्हाला नेहमीच सापडतील. आणि हेच खरंतर महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच तुमचा एकटेपणा दूर व्हायला मदत होईल.”

 आणखी मदत हवीय? मैत्रीविषयी मनातली भीती काढून टाकणं” हा लेख वाचा. तसंच, “वरकिंग थ्रू लोनलीनेस्‌” ही PDF सुद्धा डाऊनलोड करा.