व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”—याकोब ४:८

देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?

देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?

‘देव खरंच माझ्या प्रार्थना ऐकतो का,’ असा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. कारण बऱ्‍याचदा देवाला प्रार्थना करूनसुद्धा त्यांच्या समस्या सुटलेल्या नसतात. मग याचा अर्थ असा होतो का, की देव आपल्या प्रार्थनांकडे लक्ष देत नाही? मुळीच नाही. बायबल आपल्याला असं सांगतं, की आपण जर योग्य पद्धतीने प्रार्थना केली, तर देव आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल. याबद्दल बायबल काय म्हणतं ते आपण पाहू.

देव खरंच  आपली प्रार्थना ऐकतो.

“हे प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.”—स्तोत्र ६५:२.

काही जणांचा देवावर विश्‍वास नसतो, पण तरीसुद्धा ते प्रार्थना करतात. कारण प्रार्थना केल्यावर त्यांना बरं वाटतं, त्यांचं मन हलकं होतं. पण प्रार्थना ही फक्‍त बरं वाटण्यासाठी केली जाणारी गोष्ट नाही. बायबल म्हणतं, की ‘यहोवा * त्याला प्रामाणिकपणे हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ असतो. तो त्यांची मदतीची याचना ऐकतो.’—स्तोत्र १४५:१८, १९.

यामुळे आपल्याला याची खातरी मिळते, की यहोवा देव त्याची उपासना करणाऱ्‍या लोकांच्या प्रार्थना नक्की ऐकतो. तो आपल्याला हे प्रेमळ आश्‍वासन देतो: “तुम्ही मला हाक माराल, माझ्याकडे येऊन प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन.”—यिर्मया २९:१२.

आपण देवाला प्रार्थना करावी अशी त्याची इच्छा आहे.

“प्रार्थना करत राहा.”—रोमकर १२:१२.

बायबल म्हणतं: “प्रार्थना करत राहा.” आणखी एका ठिकाणी ते असं म्हणतं: ‘प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करत राहा.’ यावरून कळतं, की आपण यहोवा देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं.—मत्तय २६:४१; इफिसकर ६:१८.

पण देवाला असं का वाटतं? एका उदाहरणाचा विचार करा: प्रत्येक वडिलाला माहीत असतं, की आपल्या मुलाला कशाची गरज आहे. पण जेव्हा ते मूल वडिलांकडे मदत मागतं  तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. यावरून दिसून येतं, की त्या मुलाला आपल्या वडिलांवर भरवसा आहे आणि वडिलांसोबत त्याचं जवळचं नातं आहे. त्याच प्रकारे, आपण जेव्हा यहोवा देवाला प्रार्थना करतो तेव्हा त्याच्यावर आपला पूर्ण भरवसा आहे आणि त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातं जोडायची आपली इच्छा आहे हे दिसून येतं.—नीतिवचनं १५:८; याकोब ४:८.

देवाला नक्कीच आपली काळजी आहे.

“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.

आपण देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्याला आपली काळजी आहे. त्याला आपल्या समस्या आणि चिंता चांगल्या प्रकारे माहीत आहेत. आणि त्यांचा सामना करता यावा म्हणून त्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे.

प्राचीन काळात देवाचा एक भक्‍त होता. त्याचं नाव होतं दावीद. तो नेहमी यहोवा देवाला मदतीसाठी प्रार्थना करायचा आणि त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायचा. (स्तोत्र २३:१-६) या भक्‍ताबद्दल देवाला कसं वाटायचं? देवाचं दावीदवर खूप प्रेम होतं आणि त्यामुळे त्याने त्याच्या प्रार्थना ऐकल्या. (प्रेषितांची कार्यं १३:२२) त्याचप्रमाणे आज देव आपल्याही प्रार्थना ऐकतो, कारण त्याला आपली काळजी आहे आणि आपल्यावर त्याचं प्रेम आहे.

‘माझं यहोवावर प्रेम आहे कारण तो माझी हाक ऐकतो’

हे शब्द, बायबलमधलं एक स्तुतिगीत लिहिणाऱ्‍या कवीचे आहेत. देव आपल्या प्रार्थना ऐकतो यावर त्याला पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे त्याला देवासोबतचं त्याचं नातं, एका मित्रासोबत असलेल्या घनिष्ठ नात्यासारखं वाटलं. तसंच, समस्यांचा सामना करायचं बळही त्याला मिळालं.—स्तोत्र ११६:१-९.

देव आपल्या प्रार्थना ऐकतो यावर जर आपला पूर्ण विश्‍वास असेल, तर आपण नेहमी त्याला प्रार्थना करू. स्पेनमध्ये राहणाऱ्‍या पेड्रो नावाच्या एक माणसाचा अनुभव लक्षात घ्या. एका ॲक्सिडेन्टमध्ये त्याच्या १९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आपल्या दुःखातून सावरण्यासाठी त्याने काय केलं? त्याने आपलं दुःख देवाला सांगितलं. आपल्याला दिलासा आणि आधार मिळावा म्हणून त्याने वारंवार देवाला प्रार्थना केली. तर मग देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं का? नक्कीच दिलं. त्याबद्दल पेड्रो म्हणतो: “आमच्या मित्रांनी मला आणि माझ्या पत्नीला खूप दिलासा आणि आधार दिला. आणि हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर होतं.”

दिलासा आणि आधार देणाऱ्‍या प्रेमळ मित्रांद्वारे देव सहसा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो

हे खरं आहे, की प्रार्थनेमुळे पेड्रोला त्याचा मुलगा परत मिळाला नाही. पण त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एका वेगळ्या प्रकारे मदत मिळाली. त्याबद्दल त्याची बायको मरीया कार्मेन म्हणते: “प्रार्थनेमुळेच मला माझ्या दुःखातून बाहेर यायला मदत झाली. मी प्रार्थना करायचे तेव्हा माझं मन शांत व्हायचं आणि मला खूप बरं वाटायचं. त्यावरून मला जाणवायचं, की यहोवा देवाला माझं दुःख कळतंय.”

तर, बायबलमध्ये दिलेल्या माहितीवरून आणि अनेकांच्या अनुभवांवरून आपल्याला कळतं, की देव नक्कीच आपल्या प्रार्थना ऐकतो. पण देव सगळ्याच प्रार्थना ऐकत नाही. असं का बरं?

^ परि. 5 यहोवा हे देवाचं नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.