व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न २

मी कशी दिसते यावर मी इतका का विचार करते?

मी कशी दिसते यावर मी इतका का विचार करते?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

आरशात दिसत असलेल्या गोष्टींपेक्षाही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: जुलिया जेव्हा आरशात पाहते तेव्हा तिला ती किती जाड झाली आहे असं वाटत राहतं. तिचे आई-बाबा आणि मित्र-मैत्रिणी म्हणतात, ती “छान, स्लिम-ट्रिम दिसते,” पण ती म्हणते “नाही, मला आणखी वजन कमी करावं लागेल.”

अलीकडेच जुलियाने टोकाचं पाऊल उचललं. तिने आणखी काही किलो कमी करायचं ठरवलं. आणि यासाठी ती काही दिवस चक्क उपाशी राहणार होती.

तुम्हालाही जुलियासारखं वाटतं का? तुम्ही तिच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

स्वतःबद्दलचं तुमचं मत, अशा प्रतिबिंबासारखं असू शकतं जे तुम्ही वेडंवाकडं प्रतिबिंब दाखवणाऱ्या आरशात बघत आहात

आपल्या दिसण्याबद्दल काळजी करणं चुकीचं नाही. बायबलमध्येसुद्धा अशा काही स्त्री-पुरुषांबद्दल सांगितलं आहे जे दिसायला सुंदर आणि देखणे होते. जसं सारा, राहेल, अबीगईल योसेफ आणि दावीद. बायबलमध्ये अबीशग नावाच्या स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे, की ती “फार सुंदर होती.”—१ राजे १:४.

पण कित्येक तरुण-तरुणी आपल्या दिसण्याबद्दल प्रमाणाबाहेर चिंता करतात. आणि याचे वाईट परिणाम होऊ शकतात. उदाहरणं पाहा:

  • एका सर्वेमध्ये असं पाहण्यात आलं की, ५८ टक्के मुली लठ्ठ असल्याचं दावा करत होत्या पण खरंतर त्यातल्या फक्त १७ टक्केच लठ्ठ होत्या.

  • दुसऱ्या एका सर्वेनुसार, खूप बारीक असलेल्या ४५ टक्के स्त्रियांना वाटत होतं की त्या खूप जाड आहेत.

  • वजन कमी करण्याच्या नादात कित्येक तरुण-तरुणी ‘अॅनॉरेक्सीया’ला बळी पडले आहेत. ‘अॅनॉरेक्सीया’ हा एक मनोविकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती इतकी उपाशी राहते की तिचा जीव धोक्यात येऊ शकतो.

तुमच्यामध्ये अॅनॉरेक्सीयाची लक्षणं दिसत असतील किंवा इतर कोणत्या कारणांमुळे तुम्हाला भूक लागत नसेल, तर शांत बसू नका. आपल्या आई-बाबांशी किंवा जवळच्या मोठ्या व्यक्तीशी याविषयी बोला. बायबलमध्ये म्हटलं आहे, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.

हेच खरं सौंदर्य आहे!

आपण सुंदर आहोत की नाही हे खरंतर आपल्या स्वभावावरून ठरतं. राजा दाविदाचा मुलगा अबशालोम याच्याविषयी बायबलमध्ये काय म्हटलं आहे ते पाहा:

“सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता; त्याच्या ठायी नखशिखांत काही दोष नव्हता.”—२ शमुवेल १४:२५.

असं असलं तरी हा तरुण गर्विष्ठ, महत्त्वाकांक्षी आणि विश्वासघातकी होता. बायबलमध्ये अबशालोम हा वाईट असल्याचं सांगितलं आहे. कारण तो निर्लज्ज, बेईमान होता आणि त्याच्यात बदला घेण्याची तीव्र भावना होती.

म्हणूनच बायबलमध्ये असा सल्ला दिला आहे:

तुम्ही “नवा मनुष्य. . . धारण” करा.—कलस्सैकर ३:१०.

“तुमची शोभा. . . बाहेरून दिसणारी नसावी,. . . तर अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची” असावी.—१ पेत्र ३:३, ४.

आपण चांगलं दिसायला हवं असा विचार करण्यात काहीच चूक नाही. पण तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्त्व चांगलं असणं जास्त महत्त्वाचं आहे. सुदृढ शरीर किंवा चांगली फिगर यापेक्षा तुमच्या चांगल्या गुणांमुळे तुम्ही इतरांना जास्त आकर्षक वाटाल. “सुंदर असलो की सर्वांचं लक्ष पटकन तुमच्याकडे जातं. पण तुमचे चांगले गुण आणि स्वभाव हेच लोकांच्या नेहमी लक्षात राहतं,” असं फिलिशिया नावाची एक मुलगी म्हणते.

तुम्ही कसे दिसता याकडे एक नजर

तुमच्या दिसण्याबद्दल तुम्ही सारखे निराश असता का?

स्वतःमधील कमीपणा लपवण्यासाठी तुम्ही कधी कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा किंवा अती प्रमाणात डायटिंग करण्याचा विचार केला आहे का?

तुम्हाला जर तुमच्या दिसण्यात काही बदल करण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणते बदल कराल? (जे बदलायचं आहे ते निवडा)

  • उंची

  • वजन

  • केस

  • बांधा

  • चेहरा

  • रंग

  • इतर

वर दिलेल्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही ‘हो’ निवडली असतील आणि तिसऱ्या प्रश्‍नातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय निवडले असतील तर याचा अर्थ, तुम्ही इतरांपेक्षा स्वतःबद्दल जास्त नकारात्मक विचार करता असा होऊ शकतो. आपल्या दिसण्याबद्दल गरजेपेक्षा जास्त विचार आणि चिंता आपल्या मनात सहजच येऊ शकतात.—१ शमुवेल १६:७.