व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 सुखी कौटुंबिक जीवनासाठी . . .

वाद न घालता—तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला

वाद न घालता—तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला

“माझी मुलगी १४ वर्षांची झाली तेव्हापासून ती उद्धट बोलू लागली. मी जर तिला म्हटलं की ‘चल ना जेवणाची वेळ झाली,’ तर ती म्हणायची, ‘मला जेव्हा जेवायचं असेल तेव्हा मी जेवेन.’ ‘तुझी सगळी कामं झाली का?’ असं जर मी तिला विचारलं तर ती म्हणायची, ‘का माझ्या मागं लागलीस?’ बऱ्याच वेळा आमच्या दोघींचाही आवाज चढायचा आणि आम्ही एकमेकींवर ओरडायचो.”मोनिका, जपान. *

तुम्हाला जर किशोरवयीन मुले असतील तर पालक या नात्याने वाद सोडवणे हे तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असू शकते आणि त्यासाठी तुम्हाला पुष्कळ धीराची गरज भासू शकते. ब्राझीलमध्ये राहणारी मारीया, जिला १४ वर्षांची मुलगी आहे असे म्हणते: “एक आई या नात्यानं माझ्या भूमिकेवर माझी मुलगी जेव्हा प्रश्न करते तेव्हा माझं पित्त खवळतं. आम्ही दोघी इतकं चिडतो की एकमेकींवर दातओठ खाऊन उठतो.” इटलीतील कार्मेला अशाच परिस्थितीचा सामना करते. ती म्हणते: “मी आणि माझा मुलगा कधी शांतपणे बोलूच शकत नाही. आमच्यात इतके वाद होतात की शेवटी तो स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेतो.”

काही किशोरवयीन मुले इतकी भांडखोर का बनतात? त्यांच्या सोबत्यांमुळे? कदाचित. बायबल म्हणते की एका व्यक्तीवर तिच्या सोबत्यांचा खूप प्रभाव पडू शकतो, एकतर चांगला किंवा वाईट. (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) शिवाय, आज तरुणांसाठी तयार करण्यात आलेल्या बऱ्याचशा मनोरंजनात सर्रासपणे जो बंडखोरपणा व उद्धटपणा दाखवला जातो त्यामुळेसुद्धा मुले अशी बनतात.

पण मुले अशी का वागतात याच्या इतर कारणांचाही विचार करा. या कारणांचा तुमच्या किशोरवयीन मुलावर कसा प्रभाव पडू शकतो हे जर तुम्ही समजून घेतले तर त्यांना मदत करणे तुम्हाला सोपे जाईल. याची काही उदाहरणे विचारात घ्या.

मुले “तर्कशक्ती” विकसित करत असतात

प्रेषित पौलाने असे लिहिले: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या  आहेत.” (१ करिंथकर १३:११) पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की मुलांच्या आणि प्रौढ व्यक्तींच्या विचारसरणीत जमीनअस्मानाचा फरक असतो. कोणत्या अर्थाने?

मुले सहसा डोळ्यांना दिसते त्याप्रमाणेच विचार करतात. त्यांच्यासाठी एखादी गोष्ट एकतर बरोबर असू शकते किंवा चुकीची असू शकते. याच्या अगदी उलट प्रौढ व्यक्ती सहज न दिसणाऱ्या गोष्टींवर तर्क करू शकतात. कोणताही अनुमान काढण्याआधी किंवा निर्णय घेण्याआधी ते खोलवर विचार करतात. उदाहरणार्थ, प्रौढ व्यक्ती सहसा एखाद्या गोष्टीमागील नैतिक बाबी लक्षात घेतात आणि त्यांच्या कृत्यांचा इतरांवर कसा परिणाम होईल हेही विचारात घेतात. ही गोष्ट ते सवयीने करत असतात. पण किशोरवयीन मुलांसाठी ही गोष्ट नवीन असू शकते.

बायबल तरुणांना “विचारशक्ती” विकसित करण्याचे प्रोत्साहन देते. (नीतिसूत्रे १:४, NW) खरेतर सर्वांनीच आपल्या “तर्कशक्तीचा” वापर करावा असे बायबल आर्जवते. (रोमकर १२:१, २, NW; इब्री लोकांस ५:१४) पण, काही वेळा तुमचे किशोरवयीन मूल ज्या प्रकारे तर्क करते त्यामुळे कदाचित अगदी लहानसहान गोष्टींवरूनही वाद निर्माण होऊ शकतात. किंवा मग तुमचे मूल असे काही बोलेल जे अगदीच चुकीचे असेल. (नीतिसूत्रे १४:१२) अशा परिस्थितीत त्याच्याशी वाद घालण्याऐवजी तुम्ही तर्क कसा करू शकता?

हे करून पाहा: पालकांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे किशोरवयीन मूल नव्यानेच तर्क करण्यास शिकत असेल आणि आपली ही क्षमता आजमावण्याचा प्रयत्न करत असेल; त्यामुळे ते त्याच्या मतांवर कदाचित इतके ठामही नसेल. त्याला खरोखर काय वाटते ते जाणून घेण्यासाठी, सर्वात आधी तर्क करण्याच्या त्याच्या नवीन क्षमतेबद्दल त्याचे कौतुक करा. (“तू जे म्हणतोस त्या सगळ्याच गोष्टींशी मी सहमत नसलो तरी तू ज्या प्रकारे तुझे विचार मांडले ते मला आवडलं.”) त्यानंतर त्याला त्याच्या विचारसरणीचे परीक्षण करण्यास मदत करा. (“तू आता जे काही बोललास ते प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असं तुला वाटतं का?”) तुमचे किशोरवयीन मूल त्याच्या विचारांचे ज्या प्रकारे परीक्षण करते व सुधारणा करते ते पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल.

सावधगिरीचा एक इशारा: तुमच्या किशोरवयीन मुलासोबत तर्क करत असताना आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे काही बोलता ते तुमचे मूल लक्ष देऊन ऐकत नाही असे वाटत असले तरी तुमच्या नकळत त्याने बरेच काही ऐकले असेल; किंवा मग ते त्याची चूक मान्य करेल. काही दिवसांनी तुमच्या मुलाचा दृष्टिकोन कदाचित तुमच्यासारखाच झालेला असेल आणि हा आपला स्वतःचा दृष्टिकोन आहे असा दावाही ते करेल तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका.

“केव्हाकेव्हा मी आणि माझा मुलगा लहानसहान गोष्टींवर वाद घालत बसायचो. उदाहरणार्थ, नासाडी न करण्याबद्दल किंवा बहिणीला चिडवण्याबद्दल आमच्यात वाद व्हायचे. पण बऱ्याचदा त्याला असं वाटायचं की मी त्याला विचारावं की त्याला काय वाटतं आणि मी त्याला समजून घ्यावं व त्याला म्हणावं, ‘अच्छा असं आहे का?’ किंवा ‘अच्छा तर तू असा विचार करतोस?’ आज मागे वळून पाहताना मला असं वाटतं की मी इतकंच जरी बोलले असते तरी बरेच वाद टाळता आले असते.”—केन्जी, जपान.

मुले आपली मते बनवत असतात

मुले सहजपणे आपली मते मांडू शकतील असे वातावरण सुज्ञ पालक तयार करतात

तरुणांना लहानाचे मोठे करण्यात एक महत्त्वाची गोष्ट समाविष्ट आहे, ती म्हणजे त्यांना एक जबाबदार प्रौढ बनण्यास व स्वतःचा संसार थाटण्यास मदत करणे. (उत्पत्ति २:२४) यात स्वतःची एक ओळख तयार करणेदेखील समाविष्ट आहे. निरनिराळे गुण, विश्वास आणि मूल्ये या गोष्टी एखाद्या व्यक्तीची ओळख तयार करत असतात. तुमच्या किशोरवयीन मुलाने आधीच स्वतःची एक ओळख तयार केल्यामुळे, त्याच्यावर जेव्हा चुकीची गोष्ट करण्याचा दबाव येतो तेव्हा तो फक्त परिणामांचाच नव्हे तर इतर गोष्टींचाही विचार करेल. तो स्वतःला असेही विचारेल: ‘मी कशा प्रकारची व्यक्ती आहे? माझी मूल्ये काय आहेत? ही मूल्ये जोपासणारी व्यक्ती अशा परिस्थितीत काय करेल?’—२ पेत्र ३:११.

बायबलमध्ये योसेफ नावाच्या एका तरुणाविषयी सांगितले आहे ज्याने स्वतःची एक ओळख तयार केली होती. उदाहरणार्थ, पोटीफरच्या पत्नीने योसेफाला आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची गळ घातली तेव्हा योसेफ म्हणाला: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ति ३९: ९) त्या काळात इस्राएली लोकांना व्यभिचाराचा निषेध करणारा नियम जरी देण्यात आला नव्हता, तरी योसेफाने देवाचा दृष्टिकोन काय आहे हे ओळखले. शिवाय, “मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” या शब्दांवरून दिसते की त्याने देवाच्या दृष्टिकोनाला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनवला होता.—इफिसकर ५:१.

तुमचे किशोरवयीन मूलसुद्धा स्वतःची एक ओळख तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक चांगली गोष्ट आहे कारण त्याने बनवलेली मते त्याला त्याच्या सोबत्यांकडून येणाऱ्या दबावाचा सामना करण्यास आणि आपल्या मतांवर ठाम राहण्यास मदत करेल. (नीतिसूत्रे १:१०-१५) पण दुसरीकडे पाहता, स्वतःची एक ओळख तयार केल्यामुळे तुमचे मूल तुमच्याविरुद्धही उभे राहू शकते. असे झाल्यास तुम्ही काय करू शकता?

हे करून पाहा: वाद घालत बसण्याऐवजी त्याचे मत काय आहे ते जाणून घ्या. (“तू जे बोलतोस ते मला कळतंय की नाही हे मला आधी पाहू दे. तुला असं म्हणायचंय का . . . ”) मग प्रश्न विचारा. (“तुला असं का वाटतं?” किंवा “कोणत्या गोष्टींमुळं तुला असं वाटतं?”) तुमच्या किशोरवयीन मुलाच्या मनात काय आहे ते  जाणण्याचा प्रयत्न करा. त्याला त्याची मते मांडू द्या. तो जे म्हणत असेल ते चुकीचे नसेल; तो केवळ आवडीनिवडीचा प्रश्न असेल. अशा वेळी त्याला याची जाणीव करून द्या की तुम्हाला त्याचे मत पूर्णपणे पटत नसले तरी तुम्ही त्याची कदर करता.

स्वतःची एक ओळख तयार करणे, ज्यात मते बनवणेही समाविष्ट आहे ही केवळ सर्वसामान्य गोष्टच नव्हे तर फायदेकारकही आहे. कारण बायबल ख्रिश्चनांना असा सल्ला देते की त्यांनी बाळांसारखे असू नये जे “प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे” असतात. (इफिसकर ४:१४) तर मग, तुमच्या किशोरवयीन मुलाला स्वतःची एक ओळख तयार करण्याची व ठाम मते बनवण्याची अनुमती आणि प्रोत्साहन द्या.

“मी जेव्हा माझ्या मुलींना दाखवते की मला त्यांचं ऐकून घेण्याची इच्छा आहे तेव्हा माझा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा वेगळा जरी असला तरी ते सहसा माझाही दृष्टिकोन विचारात घेण्यास तयार असतात. त्यांनी माझ्यासारखाच विचार करावा अशी जबरदस्ती न करता मी त्यांना त्यांची मतं बनवण्याचं प्रोत्साहन देते.”—ईवॉना, चेक रिपब्लिक.

ठाम असण्यासोबतच समजूतदारही असा

लहान मुले सहसा हट्ट करून हवी ती गोष्ट मिळवतात; काही तरुण नेमके हेच करतात. तुमच्या घरात असे होत असेल तर काळजी घ्या. तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केल्यामुळे काही काळ परिस्थिती सुधारली तरी तुमच्या किशोरवयीन मुलाला असे वाटेल की वाद घातला तर हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल. मग यावर काही उपाय? येशूच्या सल्ल्याचे पालन करा: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात असे तुमच्या किशोरवयीन मुलांना दिसते तेव्हा ते तुमच्याशी जास्त वाद घालणार नाहीत.

पण ठाम असण्यासोबतच समजूतदारही असा. उदाहरणार्थ, तुमच्या किशोरवयीन मुलाने एका विशिष्ट वेळेत घरी यावे असा एक नियम कदाचित तुम्ही तुमच्या घरात केला असेल. पण एखाद्या वेळेस त्यात काही फेरबदल करावा असे त्याला वाटते तेव्हा त्याला त्याचे कारण विचारा. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्या दबावाला बळी पडत नसता, तर बायबलच्या सल्ल्याचे पालन करत असता: “तुम्ही . . . समजूतदार आहात, हे प्रत्येकाला दिसू द्या.”—फिलिप्पैकर ४:५, सुबोधभाषांतर.

हे करून पाहा: कोणत्या वेळी घरी यावे व घरातील इतर नियम यांबाबत एक कुटुंब मिळून चर्चा करा. निर्णय घेण्याआधी तुम्ही तुमच्या मुलांचे म्हणणे ऐकण्यास आणि सर्व बाजूंनी विचार करण्यास तयार आहात हे त्यांना दाखवा. ब्राझीलमध्ये राहणारा रॉबर्टो जो एक पिता आहे, असे म्हणतो: “बायबलच्या कोणत्याही तत्त्वांचं उल्लंघन होत नसेल तर आपले पालक आपली मागणी पूर्ण करण्यास तयार असतात हे मुलांना दिसून आलं पाहिजे.”

अर्थात, कोणतेही पालक परिपूर्ण नाहीत. बायबल म्हणते: “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” (याकोब ३:२) तुम्हाला जर असे जाणवते की काही प्रमाणात तुम्ही एखाद्या वादासाठी जबाबदार आहात, तर तुमच्या किशोरवयीन मुलाची क्षमा मागण्यास कचरू नका. चुका कबूल करण्याद्वारे नम्रता दाखवण्याबाबत तुम्ही एक उत्तम उदाहरण मांडता आणि हे पाहून तुमचे मूलदेखील तुमची माफी मागण्यास प्रवृत्त होऊ शकते.

“एकदा माझा माझ्या मुलाबरोबर वाद झाला; काही वेळानं शांत झाल्यावर माझ्या अशा वागणुकीबद्दल मी त्याला माफी मागितली. यामुळं तोही शांत झाला आणि माझं ऐकून घेण्यास त्याला आणखी सोपं गेलं.” —केन्जी, जपान. ▪ (w13-E 11/01)

^ परि. 3 या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

स्वतःला विचारा . . .

  • कोणकोणत्या कारणांमुळं माझ्या किशोरवयीन मुलासोबत माझा वाद होण्याची शक्यता आहे?

  • माझ्या किशोरवयीन मुलाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या लेखातील माहितीचा मी कसा उपयोग करू शकतो?

  • वाद न घालता—मी माझ्या किशोरवयीन मुलाशी संवाद कसा साधू शकतो?