व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

“माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो”

“माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो”
  • जन्म: १९४१

  • देश: ऑस्ट्रेलिया

  • माझा गतकाळ: धुम्रपान करणारा व मद्यपी

माझी पूर्व जीवनशैली:

मी न्यू साउथ वेल्स येथील वॉरियल्ड या लहानशा गावात मोठा झालो. इथं मेंढपाळ आणि गाईगुरांचा उद्योग करणाऱ्‍या तसेच धान्य आणि लहान पिकांची शेती करणाऱ्‍या विविध शेतकऱ्‍यांच्या जाती आहेत. हे गाव स्वच्छ आहे व येथे गुन्हेगारीचं प्रमाणही कमी आहे.

दहा भावंडांमध्ये सर्वात मोठा असल्यामुळं कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षापासूनच मला काम करावं लागलं. शिक्षण कमी असल्यामुळं मी शेतावर काम करू लागलो. आणि १५ वर्षांचा होईपर्यंत गुराखी म्हणून, जंगली घोड्यांना माणसाळविण्याचं काम करू लागलो.

शेतांवर काम करण्यात मला फार आनंद मिळायचा. मी करत असलेलं काम तर मला आवडायचंच त्यासोबतच शेतातील रम्य वातावरणही मला आनंदित करायचं. रात्रीच्या वेळी मी शेकोटीजवळ बसून चंद्रानं व ताऱ्‍यांनी प्रकाशलेलं आकाश पाहायचो, वाऱ्‍याच्या झुळकांसोबत येणारा रानातील सुगंधही मनाला तजेला द्यायचा. या सुंदर निसर्गाकडं पाहून मी नेहमी विचार करायचो, कुणीतरी निर्माणकर्ता नक्कीच असावा. पण त्याच वेळी त्या ठिकाणी वाईट गोष्टीही चालायच्या. मी बहुतेकदा लोकांना शिवीगाळ करताना ऐकायचो, तिथं सिगारेटीही सहज मिळायच्या. मग काय, मीसुद्धा धुम्रपान आणि शिवीगाळ करायला लागलो.

वयाच्या १८ व्या वर्षी मी सिडनीत राहायला गेलो. तिथं मी सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षण कमी असल्यामुळं मला घेतलं नाही. नंतर मला एक नोकरी मिळाली आणि मी सिडनीत एक वर्ष राहिलो. त्याच वेळी माझी भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. त्यांच्या सभेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मी स्वीकारलं, आणि मला लगेच जाणवलं की त्यांच्याच शिकवणी खऱ्‍या आहेत.

पण काही वेळानंतर मी पुन्हा शेतात जाण्याचं ठरवलं. मी क्वीन्झलँड मधील गुंडविंडाय या गावात गेलो. तिथं मला एक नोकरी मिळाली, माझं लग्न झालं पण दुःखाची गोष्ट म्हणजे दारू पिण्याची वाईट सवय मला लागली.

मला दोन मुलं झाली. माझ्या मुलांचा जन्म झाल्यावर, माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो. सिडनीत असताना साक्षीदारांच्या सभेत मी जे ऐकलं होतं ते मला आठवलं आणि त्याबद्दल काहीतरी करायचं मी ठरवलं.

मला टेहळणी बुरूज नियतकालिकाची एक प्रत सापडली, त्यात ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाचा पत्ता होता. मी त्या पत्त्यावर पत्र पाठवून मदत मागितली. त्या पत्राचं उत्तर मला मिळालं. एक दयाळू व प्रेमळ साक्षीदार आमच्या घरी आला आणि मी बायबल अभ्यास सुरू केला.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

बायबल अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की मला जीवनात बरेच बदल करावे लागतील. २ करिंथकर ७:१ या वचनाचा खासकरून माझ्या मनावर खोलवर प्रभाव पडला. “देहाच्या . . . सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध” केलं पाहिजे असं उत्तेजन त्यात देण्यात आलं आहे.

मी धुम्रपान व मद्यपान बंद करण्याचं ठरवलं. असं करणं सोपं नव्हतं कारण अनेक वर्षांपासून मला या सवयी होत्या. पण देवाला आनंद होईल असं जीवन जगण्याचा निश्‍चय मी केला होता. रोमकर १२:२ मध्ये दिलेलं तत्त्व लागू करण्याद्वारे मला खूप मदत मिळाली. त्यात म्हटलं आहे “या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” मला जर माझ्या सवयी बदलायच्या असतील तर मला माझे विचार बदलावे लागतील आणि देव जसा या सवयींना हानिकारक समजतो तसंच मीसुद्धा त्यांना समजलं पाहिजे, असं मला जाणवलं. यहोवाच्या मदतीमुळं मी धुम्रपान व मद्यपान करण्याच्या माझ्या सवयी सोडू शकलो.

“मला जर माझ्या सवयी बदलायच्या असतील तर मला माझे विचार बदलावे लागतील . . . असं मला जाणवलं”

शिवीगाळ करण्याची सवय सोडणं मात्र मला खूप कठीण जात होतं. मला बायबलमधील एक सल्ला माहीत होता जो इफिसकर ४:२९ मध्ये देण्यात आला आहे, त्यात म्हटलं आहे, “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो.” तरीपण मी शिवीगाळ करण्याची सवय लवकर सोडू शकलो नाही. यशया ४०:२६ मधील शब्दांवर मनन करण्याचा मला फायदा झाला. ताऱ्‍यांनी प्रकाशित झालेल्या आकाशाबद्दल त्यात म्हटलं आहे: “आपले डोळे वर करून पाहा; यांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणतो; तो त्या सर्वास नावांनी हाका मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.” मी विचार केला की जर देव, मला इतकं आवडत असलेलं भव्य विश्‍व निर्माण करू शकतो तर तो मला त्याला खूश करण्याकरता जीवनात बदल करण्याची शक्‍ती नक्कीच पुरवू शकतो. कळकळून केलेल्या प्रार्थनांमुळे आणि अनेक प्रयत्नांमुळे मी शिवीगाळ करण्याची सवय मोडू शकलो.

मला काय फायदा झाला:

गुराखी म्हणून मी ज्या शेतांत काम करत होतो तिथं कमी लोक असल्यामुळं मला लोकांशी बोलण्याची संधी मिळत नव्हती. पण यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेत जे प्रशिक्षण पुरवलं जातं त्यामुळं लोकांशी संवाद साधायला मी शिकलो. त्या प्रशिक्षणामुळं मी देवाच्या राज्याच्या संदेशाबद्दल इतरांशी कसं बोलायचं तेही शिकू शकलो.—मत्तय ६:९, १०; २४:१४.

गेल्या काही वर्षांपासून मी ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्यानं सेवा करण्याचा आनंद अनुभवत आहे. मंडळीतल्या बंधुभगिनींना मदत करण्याच्या या संधीला मी बहुमान समजतो. मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद हाच आहे की माझं संपूर्ण कुटुंब एकतेनं यहोवाची सेवा करत आहे.

माझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाला यहोवानं शिकवल्यामुळं मी त्याचा नेहमी आभारी असेन. (यशया ५४:१३) नीतिसूत्रे १०:२२ मधील शब्दांशी मी सहमत आहे, त्यात म्हटलं आहे: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो.” मी आणि माझं कुटुंब यहोवाबद्दल आणखी शिकून घेण्यास व त्याची सदासर्वकाळ सेवा करण्यास आतुर आहोत. ▪ (w१३-E ०८/०१)