व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—न्यूयॉर्कमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—न्यूयॉर्कमध्ये

काही वर्षांपूर्वी, सेसार आणि त्यांची पत्नी रोसीयो हे कॅलिफोर्निया इथं राहत होते. सेसार हे एअर-कंडिशनिंगच्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करत होते, तर रोसियो ही एका डॉक्टरकडे अर्धवेळेची नोकरी करत होती. त्यांचं स्वतःचं घर होतं आणि त्या दोघांचा संसार अगदी सुरळीत चालला होता. पण काही काळानंतर असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्यांचं जीवन कायमचं बदलून गेलं. असं काय घडलं होतं?

२००९ च्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या शाखा कार्यालयानं त्या देशातील सर्व मंडळ्यांना एक पत्र पाठवलं. न्यूयॉर्कमधील वॉल्किलच्या शाखा कार्यालयाच्या इमारतींचा विस्तार करण्याच्या कार्यासंबंधी हे पत्र होतं. या कार्यात हातभार लावण्याकरता, बांधकामाचा अनुभव असलेले स्वयंसेवक तात्पुरत्या काळाच्या बेथेल सेवेसाठी अर्ज भरू शकतात, असं पत्रात म्हणण्यात आलं होतं. बेथेल सेवेकरता अर्ज भरण्यासाठी वयाची जी मर्यादा असते, त्यापेक्षा जास्त वय असलेले बांधवदेखील अर्ज करू शकतात, असंही या पत्रात सांगण्यात आलं होतं. सेसार व रोसीयो सांगतात, “आमच्या वयामुळे बेथेल सेवेसाठी तर आम्ही अर्ज करू शकणार नव्हतो. त्यामुळे बेथेल सेवा करण्याची अशी संधी कदाचित आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही याची जाणीव आम्हाला होती. आणि ही चालून आलेली संधी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नव्हती!” या जोडप्यानं लगेच आपले अर्ज भरून दिले.

वॉर्विक इथं काम करत असलेले काही स्वयंसेवक

यानंतर वर्ष उलटून गेलं तरीसुद्धा सेसार आणि रोसीयो यांना बेथेलला येण्याचं निमंत्रण मिळालं नव्हतं. तरीसुद्धा, त्यांनी आपलं राहणीमान साधं करण्याद्वारे, आपल्या ध्येयाच्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरवात केली. सेसार सांगतात, “आमचं घर भाड्यानं देता यावं म्हणून आम्ही आमच्या गॅरेजचं सिंगल बेडरूम फ्लॅटमध्ये रूपांतर केलं. खरंतर जिथं आम्ही राहत होतो, ते घर आम्ही अगदी आपल्या मनासारखं बांधून घेतलं होतं. काही वर्षांपूर्वीच ते बांधून पूर्ण झालं होतं. पण त्या सात खोल्यांच्या घरातून आम्ही एका खोलीच्या लहानशा घरात राहायला गेलो. हे बदल केल्यामुळे, पुढे जर आम्हाला बेथेलला बोलावण्यात आलंच, तर ते निमंत्रण स्वीकारणं सोपं जाईल असा आम्ही विचार केला.” पुढे काय झालं? रोसीयो सांगते, “आमच्या लहानशा फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर महिन्याभरातच आम्हाला वॉल्किलला तात्पुरते स्वयंसेवक म्हणून सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. यहोवा आपल्याला आशीर्वाद तर देतो, पण आपण आपलं ध्येय मिळवण्याकरता प्रयत्न करतो तेव्हाच. आम्ही आमचं राहणीमान साधं करण्यासाठी पावलं उचलल्यामुळेच यहोवानं आम्हाला हा आशीर्वाद दिला हे आम्हाला अगदी स्पष्टपणे जाणवलं.”

जेसन, सेसार, आणि विल्यम

स्वार्थत्यागी वृत्तीवर यहोवाचा आशीर्वाद

सेसार आणि रोसीयो यांच्याप्रमाणेच आणखी शेकडो बंधुभगिनींनी न्यूयॉर्क राज्यातील बांधकाम कार्यात सहभाग घेण्यासाठी अनेक त्याग केले आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण वॉल्किल इथं चाललेल्या विस्तार कार्यात हातभार लावत आहेत; तर, इतर अनेकांना वॉर्विक इथं चाललेल्या जागतिक मुख्यालयाच्या बांधकामात साहाय्य करण्याची विशेष सुसंधी मिळाली आहे. * या कार्यात सहभागी होण्याकरता बऱ्याच जोडप्यांना आपली आरामदायी घरं आणि चांगल्या नोकऱ्या सोडून यावं लागलं. काहींना आपल्या पाळीव प्राण्यांना सोडून येणं खूप कठीण गेलं, पण यहोवाच्या सेवेत जास्त प्रमाणात सहभाग घेण्यासाठी त्यांनी असं केलं. यहोवानं या सर्व बांधवांच्या स्वार्थत्यागी मनोवृत्तीवर आशीर्वाद दिला आहे का? नक्कीच दिला आहे!

वे

व्यवसायानं इलेक्ट्रिशियन असणारे वे, आणि त्यांची पत्नी डेब्रा यांचं उदाहरण पाहा. दोघांचं वय ५५ ते ६० च्या आसपास आहे. त्यांनी कॅन्झस इथं असलेलं आपलं घर आणि इतर मालकीच्या वस्तू विकून टाकल्या आणि कम्युटर (घरून येऊन-जाऊन करणारे) बेथेल सेवक म्हणून सेवा करण्यासाठी ते वॉल्किलला राहायला आले. * यासाठी साहजिकच त्यांना आपल्या जीवनात अनेक फेरबदल करावे लागले. पण, त्यांना जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांपुढे हे त्याग काहीच नाहीत असं त्यांना वाटतं. बेथेलमध्ये सेवा करण्याच्या संदर्भात डेब्रा म्हणते: “आपल्या प्रकाशनांमध्ये सहसा नंदनवनात चाललेल्या बांधकामाची चित्रं येतात. अशाच एखाद्या चित्रात मी पाऊल ठेवलं आहे असं मला कधीकधी वाटतं.”

मेल्विन आणि शॅरन यांनी वॉर्विकच्या बांधकाम प्रकल्पात साहाय्य करता यावं म्हणून दक्षिण कॅरोलाइना इथं असलेलं आपलं घर आणि मालमत्ता विकली. या गोष्टींचा त्याग करणं त्यांच्यासाठी सोपं नसलं तरी अशा ऐतिहासिक प्रकल्पात सहभाग घ्यायला मिळणं ही त्यांना एक अतिशय सन्मानाची गोष्ट वाटते. ते म्हणतात: “जगभरातल्या बांधवांना ज्यामुळे फायदा होणार आहे अशा कार्याला आपण हातभार लावत आहोत, या जाणिवेमुळे एक वेगळाच आनंद मिळतो.”

केनेथ

सेवानिवृत्त बांधकाम ठेकेदार असलेले केनेथ आणि त्यांची पत्नी मॉरीन यांचं वय ५०-५५ च्या आसपास आहे. ते वॉर्विकच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी कॅलिफोर्निया इथून आले आहेत. इथं येण्यासाठी त्यांनी आपल्या घराची देखभाल करण्याची जबाबदारी मंडळीतल्या एका बहिणीवर सोपवली. तसंच, केनेथ यांच्या वृद्ध वडिलांची काळजी घेण्यास मदत करावी म्हणून त्यांनी आपल्या इतर कुटुंबीयांना विनंती केली. बेथेलला येऊन सेवा करण्यासाठी हे सर्व त्याग केल्याबद्दल त्यांना कधी पस्तावा झाला का? नाही! उलट, केनेथ म्हणतात, “या अनुभवामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे. समस्या नाहीत, असं नाही. पण या कार्यातून खूप समाधान मिळतं. जर कुणी विचारलं तर आम्ही अगदी मनापासून त्यांनाही ही सेवा स्वीकारण्याचा सल्ला देऊ.”

समस्यांवर मात

या कार्यासाठी स्वेच्छेनं पुढे आलेल्यांपैकी बहुतेक जणांना काही समस्यांवर मात करावी लागली. ६०-६२ च्या आसपास वय असलेल्या विल्यम आणि सॅन्ड्रा यांचं उदाहरण घ्या. पेन्सिल्वेनिया इथं या दोघांचं जीवन अगदी सुरळीत चाललं होतं. यंत्राचे सुटे भाग तयार करण्याची त्यांची एक लहानशी कंपनी होती. त्यांच्या या कंपनीत १७ लोक कामाला होते आणि कंपनीचं काम अगदी चांगल्या प्रकारे चाललं होतं. ते ज्या मंडळीत सेवा करत होते, त्याच ठिकाणी खरंतर ते लहानाचे मोठे झाले होते आणि त्यांचे बहुतेक नातेवाईकही याच भागात राहत होते. त्यामुळे, वॉल्किलला जाऊन सेवा करण्याची संधी त्यांच्यासमोर आली तेव्हा आपली सर्व जवळची माणसं आणि हा ओळखीचा परिसर सोडून जावं लागणार याची त्यांना जाणीव होती. विल्यम म्हणतात, “हे आरामदायी जीवन आणि सवयीचं झालेलं वातावरण सोडून जाणं हेच आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.” पण, याबद्दल सतत यहोवाकडे प्रार्थना केल्यानंतर या जोडप्यानं वॉल्किलला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्याचा त्यांना मुळीच पस्तावा होत नाही. विल्यम म्हणतात, “बेथेल कुटुंबातल्या सदस्यांच्या सहवासात राहून आणि त्यांच्यासोबत मिळून काम केल्यामुळे जो आनंद मिळतो तो आणखी कोणत्याच कामात मिळाला नसता. खरं सांगायचं तर, सॅन्ड्रा व मी पूर्वी कधीच इतके आनंदी नव्हतो!”

रिकी हे पूर्वी हवाई इथं बांधकाम क्षेत्रात मॅनेजर पदावर काम करत होते. त्यांना वॉर्विक इथं चाललेल्या प्रकल्पात कम्युटर बेथेल सेवक म्हणून काम करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यांनी ही संधी सोडू नये असं त्यांची पत्नी केंड्रा हिला मनापासून वाटत होतं. पण त्यांना एकाच गोष्टीची चिंता होती, आणि ती अगदी समजण्याजोगी होती. न्यूयॉर्कला राहायला गेल्यास आपला ११ वर्षांचा मुलगा जेकब याला तिथल्या अगदीच नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला जमेल का, अशी काळजी त्यांना वाटत होती.

रिकी म्हणतात, “सर्वात आधी आम्हाला अशी एक मंडळी शोधायची होती, जिथं आध्यात्मिक रीत्या चांगली प्रगती करत असलेले बरेच तरुण असतील. कारण, जेकबला चांगला सहवास मिळावा अशी आमची इच्छा होती.” शेवटी, ज्या मंडळीत ते गेले तिथं मुलं तर फार कमी होती, पण बेथेलमध्ये सेवा करणारे बांधव भरपूर होते. रिकी सांगतात, “जेकबच्या वयाची मुलं या मंडळीत नसल्यामुळे, पहिल्या सभेनंतर मी त्याला नवीन मंडळी आवडली का, असं विचारलं. पण तो मला म्हणाला, ‘डॅड, तुम्ही मुळीच काळजी करू नका. बेथेलचे तरुण बांधव आहेत ना, त्यांच्याशी मी मैत्री करेन.’”

जेकब व त्याचे आईवडील त्यांच्या मंडळीतल्या बेथेल सेवकांच्या सहवासाचा आनंद घेताना

आणि खरोखरच, बेथेलमध्ये सेवा करणारे अनेक तरुण बांधव जेकबचे मित्र बनले आहेत. जेकबवर याचा कसा परिणाम झाला आहे? रिकी सांगतात, “एकदा रात्रीच्या वेळी जेकबच्या खोलीजवळून जात होतो तेव्हा त्यानं अजूनही लाईट विझवलेली नाही असं माझ्या लक्षात आलं. मला वाटलं कदाचित तो एखादा व्हिडिओ गेम खेळत असेल. पण पाहतो तर काय, तो बायबल वाचत बसला होता! जेव्हा मी त्याला याविषयी विचारलं तेव्हा जेकब म्हणाला, ‘बेथेलला येणाऱ्या नवीन बांधवांसारखं मीसुद्धा एका वर्षात पूर्ण बायबल वाचून काढणार आहे.’” रिकी आणि केंड्रा किती खूश असतील याची तुम्ही कल्पना करू शकता! रिकी यांना वॉर्विकच्या बांधकाम प्रकल्पात सहभागी होता आलं याचा तर त्यांना आनंद आहेच; पण, इथं आल्यामुळे त्यांच्या मुलाची आध्यात्मिक प्रगती इतक्या उत्तम रीत्या होत आहे याचंही त्यांना खूप समाधान वाटतं.—नीति. २२:६.

उद्याची चिंता नाही!

लूईस व डेल

वॉल्किल आणि वॉर्विक इथं चाललेले बांधकाम प्रकल्प आज ना उद्या पूर्ण होतील. त्यामुळे, या प्रकल्पांत मदत करण्यासाठी ज्यांना बोलावण्यात आलं होतं, त्यांना आपली बेथेल सेवा फक्त तात्पुरत्या काळाची आहे याची पूर्ण कल्पना आहे. मग, यानंतर आपण कुठं जाऊ किंवा काय करू याची चिंता या बांधवांना व बहिणींना सतावते का? अजिबात नाही! त्यांच्यापैकी अनेकांच्या भावना फ्लोरिडा इथून आलेल्या दोन मध्यमवयीन जोडप्यांसारख्या आहेत. जॉन हे पूर्वी बांधकाम क्षेत्रात मॅनेजर होते. ते व त्यांची पत्नी कार्मेन वॉर्विक इथं तात्पुरत्या काळासाठी स्वयंसेवक म्हणून बांधकामात साहाय्य करत आहेत. ते म्हणतात: “आजपर्यंत यहोवानं आमच्या सर्व गरजा पुरवल्या आहेत. आणि ज्याअर्थी त्यानं आम्हाला इथपर्यंत आणलं आहे, त्याअर्थी तो नक्कीच पुढेही आमची काळजी घेईल.” (स्तो. ११९:११६) लूईस हे अग्निरोधक यंत्रणांचे डिझाइनिंग करतात. ते व त्यांची पत्नी केनिया वॉल्किल इथं सेवा करत आहेत. ते म्हणतात: “यहोवा किती उदारतेनं आपल्या गरजा भागवतो, हे आम्ही स्वतः अनुभवलं आहे. तो पुढे नेमक्या कशा प्रकारे आमची काळजी घेईल हे तर माहीत नाही; पण, तो आम्हाला कधीच सोडणार नाही याची मात्र आम्हाला पूर्ण खात्री आहे.”—स्तो. ३४:१०; ३७:२५.

“जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद”

जॉन व मेल्विन

न्यूयॉर्कला येऊन बांधकामात साहाय्य केलेल्यांपैकी बरेच जण खरंतर इथं न येण्यासाठी अनेक कारणं देऊ शकले असते. पण, यहोवानं दिलेलं वचन किती खरं आहे हे त्यांनी स्वतः अजमावून पाहण्याचं ठरवलं. यहोवानं आपल्या सगळ्यांनाच असं आवाहन केलं आहे: “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.”—मला. ३:१०.

तुम्हालाही यहोवानं दिलेल्या या वचनाची सत्यता अजमावून पाहायला आणि त्याचा विपुल आशीर्वाद अनुभवायला आवडेल का? तर मग, यहोवाच्या संघटनेत चाललेल्या कार्यात, मग ते न्यूयॉर्क इथं चाललेलं बांधकाम असो किंवा इतर बांधकाम प्रकल्प असोत, या रोमांचक कार्यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा प्रार्थनापूर्वक विचार करा. आणि, यहोवा तुमच्यावरही आशीर्वादांचा वर्षाव करतो की नाही हे स्वतः अजमावून पाहा.—मार्क १०:२९, ३०.

गॅरी

अॅलाबॅमा इथं सिव्हिल इंजिनियर असलेले डेल आणि त्यांची पत्नी कॅथी वॉल्किलला स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. ते सर्वांनाच या सेवेसाठी पुढे येण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात: “सवयीच्या झालेल्या आरामदायी वातावरणातून बाहेर पडायला धाडस लागतं. पण तुम्ही हे धाडस केलं, तर यहोवाचा आत्मा कसा कार्य करतो हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल.” अशा प्रकारच्या सेवेसाठी पुढे येण्याकरता काय करण्याची गरज आहे? डेल म्हणतात: “आपली जीवनशैली शक्य तितकी साधी करा, गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टी होता होईल तितक्या कमी करा. तुम्हाला कधीच असं केल्याचा पस्तावा होणार नाही!” उत्तर कॅरोलाइना इथून आलेले गॅरी यांना बांधकाम क्षेत्रातील व्यवस्थापनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. ते व त्यांची पत्नी मॉरीन सांगतात की वॉर्विकला आल्यामुळे त्यांना जो सर्वात मोठा आशीर्वाद अनुभवायला मिळाला तो म्हणजे, “अशा बांधवांना व बहिणींना भेटणं आणि त्यांच्यासोबत काम करणं, ज्यांनी बेथेलमध्ये यहोवाची सेवा करण्यासाठी आयुष्य वाहून घेतलं आहे.” गॅरी म्हणतात: “बेथेलमध्ये सेवा करणारे बांधव अगदी साधं जीवन जगतात आणि सध्याच्या जगात हेच सर्वात चांगल्या प्रकारचं जीवन आहे.” एका इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करणारे जेसन आणि त्यांची पत्नी जेनिफर हे इलिनोई इथून वॉल्किलच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आले आहेत. बेथेलच्या बांधकाम प्रकल्पात काम करण्याविषयी ते म्हणतात की “इथं काम करताना नव्या जगातलं जीवन कसं असेल याची कल्पना येते.” जेनिफर म्हणते, “आपण जे काही करतो त्याची यहोवा कदर करतो आणि तो आपल्या लोकांकरता भविष्यात जे काही करणार आहे त्यासाठी आपलं हे काम उपयोगी पडेल या जाणिवेमुळे मन भरून येतं. खरंच, यहोवाची सेवा करणाऱ्यांना तो भरभरून आशीर्वाद देतो.”

^ परि. 6 इयरबुक ऑफ जेहोवाज विट्नेसेस २०१४, पृष्ठे १२-१३ पाहा.

^ परि. 7 पार्ट-टाईम कम्युटर बेथेल सेवक आठवड्यातले फक्त काही दिवस बेथेलमध्ये सेवा करतात. त्यांचा घरभाड्याचा आणि बाकीचा खर्च ते स्वतः पाहतात.