व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?

सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?

एक समस्या

“आमच्यावर एक समस्या आली तेव्हा माझ्या बायकोनं लगेच तिच्या आईवडिलांना सांगितलं. मग काय, तिच्या वडिलांचा फोन आला आणि ते मला उपदेश देऊ लागले. मला ते बिलकूल आवडलं नाही.”—जेम्स. *

“माझ्या सासूचं आपलं एकचं असतं, ‘माझा मुलगा माझ्यासाठी हे करायचा, माझा मुलगा माझ्यासाठी ते करायचा.’ ती असं म्हणते तेव्हा मला अपराध्यासारखं वाटतं; असं वाटतं जणू मी तिच्या मुलाला तिच्यापासून तोडलंय.”—नताशा.

सासूसासऱ्यांसोबतचं नातं आणि जोडीदारासोबतचं नातं या दोन गोष्टी वेगळ्या ठेवणं शक्य आहे का?

काही गोष्टी लक्षात घ्या

विवाहामुळं एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. बायबल म्हणतं की लग्नानंतर “पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील.” तसंच, स्त्रीच्या बाबतीतही बायबल म्हणतं, की तिचं लग्न झाल्यानंतर ती आणि तिचा पती “एकदेह” होतात. त्यांच्यापासून एक नवीन कुटुंब तयार होतं.—मत्तय १९:५.

आईवडिलांपेक्षा विवाह महत्त्वाचा. विवाह सल्लागार जॉन एम. गॉटमन यांचं असं मत आहे की, “विवाहात ‘तुझं-माझं’ न करता ‘आपण-आपलं’ ही भावना निर्माण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी कदाचित दोघांनाही आपापल्या घरच्यांसोबत असलेली जवळीक थोडीफार कमी करावी लागेल.” *

काही आईवडिलांना जुळवून घ्यायला जड जातं. एक तरुण पती म्हणतो: “लग्नाआधी माझी बायको नेहमी तिच्या आईवडिलांच्या म्हणण्यानुसार वागायची. पण आमच्या लग्नानंतर हे चित्र बदललं. ही गोष्ट स्वीकारणं माझ्या सासूला खूप कठीण गेलं.”

काही नवविवाहितांनाही जड जातं. आधी उल्लेख करण्यात आलेला जेम्स म्हणतो: “आपण मित्रांना निवडतो तसं सासूसासऱ्यांना निवडता येत नाही. जसं एकानं म्हटलंय, ‘तुम्हाला आवडत असो अगर नसो, सासूसासऱ्यांच्या रूपात तुम्हाला दोन नवीन मित्र मिळतात.’ त्यांचं वागणं तुम्हाला पटत नसलं तरी तुम्हाला ते स्वीकारावं लागतं कारण शेवटी ते तुमच्या कुटुंबाचाच भाग आहेत.”

हे करून पाहा

सासूसासऱ्यांसंबंधी एखाद्या विषयावरून तुमच्यात मतभेद झाले तर एकत्र मिळून ते सोडवा. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे नेहमी शांती राखण्याचा प्रयत्न करा.—स्तोत्र ३४:१४.

त्यासाठी काही परिस्थिती विचारात घ्या. प्रत्येक परिस्थिती पतीच्या किंवा पत्नीच्या दृष्टीतून मांडली आहे. पण त्यात सांगितलेल्या समस्या दोघांपैकी कोणावरही येऊ शकतात. तसंच, त्यात दिलेली तत्त्वं समस्या सोडवण्यास तुम्हाला मदत करू शकतात.

तुमची बायको म्हणते: “कधीतरी नीट वागा माझ्या आईशी!” पण, तुम्हाला ते कठीण वाटतं.

असं करा: याबद्दल मोकळ्या मनानं बायकोशी बोला. नमतं घ्यायला तयार असा. तुम्हाला तुमच्या सासूबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या पत्नीबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं. शेवटी, तिच्यावर आयुष्यभर प्रेम करण्याचं वचन तुम्ही तिला दिलं होतं. सासूसोबतचा नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्या काही गोष्टी करू शकता हे निश्‍चित करा आणि त्यानुसार वागा. तुम्ही प्रयत्न करत आहात हे पाहून तुमच्या बायकोला तुमच्याबद्दल आणखी आदर वाटेल.—बायबलचं तत्त्व: १ करिंथकर १०:२४.

तुमचा नवरा म्हणतो: “तुला नुसतं तुझ्या आईवडिलांचंच पडलेलं असतं, माझ्याकडं तुझं लक्षच नाही!”

असं करा: याबद्दल नवऱ्याशी मोकळेपणानं बोला आणि स्वतःला त्याच्या जागी ठेवून विचार करा. मुलगी या नात्यानं जर तुम्ही आईवडिलांना मान देत असाल तर त्याबद्दल त्याला असुरक्षित वाटायला नको. (नीतिसूत्रे २३:२२) पण तुमच्या शब्दातून, कृतीतून तुम्हाला त्याला याचं आश्वासन द्यावं लागेल, की तुमच्यासाठी तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आईवडिलांपेक्षासुद्धा. हे आश्वासन मिळालं तर तुमचं त्याच्याकडं लक्ष नाही असं त्याला वाटणार नाही.—बायबलचं तत्त्व: इफिसकर ५:३३.

“माझी बायको प्रत्येक गोष्ट आईवडिलांना विचारून करते, मला काही किंमतच नाही.”

असं करा: याबद्दल मनमोकळेपणे आपल्या बायकोशी बोला आणि समजूतदारपणे काही गोष्टी ठरवा. जसं की, एखाद्या समस्येबद्दल आईवडिलांशी बोलणं नेहमीच चुकीचं आहे का? कोणत्या समस्येबद्दल त्यांच्याशी बोलणं योग्य राहील? हे जर ठरवलं तर तुमच्यात समस्या निर्माण होणार नाही.—बायबलचं तत्त्व: फिलिप्पैकर ४:५. ▪ (g15-E 03)

^ परि. 4 या लेखातली नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 9 द सेवेन प्रिन्सिपल्स फॉर मेकिंग मॅरेज वर्क या पुस्तकातून.