व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | तरुण

रागावर ताबा कसा मिळवाल?

रागावर ताबा कसा मिळवाल?

एक समस्या

“मी माझ्या ताईवर खूप मोठ्यानं ओरडले आणि जाताना दार इतक्या जोरात आपटलं की दारामागचं हुक भिंतीत घुसलं आणि भिंतीला भोक पडलं. मी जेव्हा-जेव्हा ते भोक पाहते तेव्हा-तेव्हा मला आठवतं मी किती मूर्खपणे वागले होते!”—डायना. *

“रागाच्या भरात मी पप्पांना बोलले, ‘मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही!’ आणि जोरात दार बंद केलं. पण, दार बंद होताना मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि मला वाटलं मी असं का बोलले.”—लीना.

रागाच्या भरात नको ते बोलून गेल्यामुळं तुम्हालाही कधी असंच वाटलं का? असल्यास, हा लेख आवर्जून वाचा.

तुम्हाला माहीत आहे का?

तापट स्वभावामुळं लोक नावं ठेवतात. २१ वर्षांची ब्रेन्डा म्हणते: “लोक माझ्या तापट स्वभावाचा इतका बाऊ का करतात हेच मला कळायचं नाही. पण मग मी पाहिलं, की ज्या लोकांचा रागावर ताबा नसतो त्यांना इतर लोक मूर्ख समजतात. तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की लोक मलाही असंच समजत असतील!”

बायबल म्हणतं: “जो माणूस चटकन रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो.”—नीतिसूत्रे १४:१७, ईझी-टू-रीड व्हर्शन.

जसं ज्वालामुखीपासून लोक पळतात, तसं आपल्या तापट स्वभावामुळं लोक आपल्यापासून पळ काढतील

रागीट स्वभावामुळं लोक आपल्याला टाळतात. १८ वर्षांचा डॅनयल म्हणतो: “आपला पारा चढतो तेव्हा इतरांच्या नजरेतून आपण उतरतो.” त्याच्याच वयाच्या लिसालासुद्धा असंच वाटतं. ती म्हणते: “कुणावर भडकणं ही काही चांगली गोष्ट नाही. कारण यामुळं लोक आपल्याला घाबरतात, आपल्याला टाळतात.”

बायबल म्हणतं: “रागीष्टाशी मैत्री करू नको आणि संतापी मनुष्याची संगत धरू नको.”—नीतिसूत्रे २२:२४, पं.र.भा.

स्वभाव बदलू शकतो. १५ वर्षांची सारा म्हणते: “भावनांना ताब्यात ठेवणं नेहमीच आपल्या हातात नसतं; पण त्या व्यक्त कशा करायच्या हे मात्र आपल्या हातात असतं. त्यामुळं प्रत्येक वेळी भडकण्याची गरज नाही.”

बायबल म्हणतं: “महारथीपेक्षा मंदक्रोध बरा; नगरावर ताबा मिळवणाऱ्यापेक्षा मनावर ताबा मिळवणारा चांगला.”—नीतिसूत्रे १६:३२, मराठी कॉमन लँग्वेज.

हे करून पाहा

एक ध्येय ठेवा. “माझा स्वभावच असा आहे,” असं फक्त म्हणत बसू नका; तर एका विशिष्ट वेळात स्वतःमध्ये बदल करण्याचं ठरवा. तुम्ही स्वतःला सहा महिन्यांचा काळ देऊन पाहा. त्या काळात तुम्ही कितपत बदल केला याची नोंद ठेवा. जेव्हा-जेव्हा तुमचा राग अनावर होतो तेव्हा-तेव्हा (१) नेमकं काय घडलं, (२) तुम्ही कसे वागलात आणि (३) तुम्ही आणखी चांगलं कसं आणि का वागू शकला असता हे लिहून ठेवा. त्यासोबतच, तुम्ही किती यशस्वी झालात त्याचीही नोंद ठेवा! रागावर नियंत्रण ठेवल्यामुळं किती बरं वाटतं ते लिहा.—बायबलचं तत्त्व: कलस्सैकर ३:८.

बोलण्याआधी विचार करा. एखाद्या गोष्टीमुळं तुम्हाला राग येतो तेव्हा मनात येईल ते लगेच बोलू नका, तर थोडं थांबा. एक मोठा श्वास घ्या. १५ वर्षांचा एरिक म्हणतो: “मोठा श्वास घेतल्यामुळं विचार करायला थोडा वेळ मिळतो; आणि पस्तावा होईल असं काहीच माझ्या हातून घडत नाही.”—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे २१:२३.

सर्व बाजूंनी विचार करा. कधीकधी फक्त स्वतःच्या बाजूनं विचार केल्यामुळं राग येऊ शकतो. पण नाण्याची दुसरी बाजूही पाहण्याचा प्रयत्न करा. जेसिका नावाची एक तरुणी म्हणते: “लोक आपल्याशी खडूसपणे वागत असले, तरी त्यामागं सहसा काही ना काही कारण असतं. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळं त्यांच्याशी समजूतदारपणे वागणं मला सोपं जातं.”—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १९:११.

शक्य असल्यास, तिथून निघून जा. बायबल म्हणतं: “भांडण पेटण्यापूर्वी तिथून निघून जा.” (नीतिसूत्रे १७:१४, NW) या वचनावरून समजतं की परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटल्यास तिथून निघून जाणंच सगळ्यात चांगलं. तसंच, तोच तो विचार करून आणखी राग वाढवण्याऐवजी कशात तरी मन गुंतवा. डेझी नावाची एक तरुणी म्हणते: “व्यायाम केला की डोक्यावरचा ताण कमी होतो आणि त्यामुळं राग ताब्यात ठेवणं मला जमतं.”

विषय सोडून द्या. बायबल म्हणतं: “रागवा पण पाप करू नका; . . . आपल्या मनाशी विचार करा, शांत राहा.” (स्तोत्र ४:४, NW) राग येणं स्वाभाविक आहे. पण, त्यानंतर आपण काय करतो ते महत्त्वाचं. रिचर्ड नावाचा एक तरुण म्हणतो: “कोणी उचकवलं आणि आपल्याला लगेच राग आला, तर एका अर्थी आपण त्याचे गुलामच बनतो. त्यापेक्षा मोठ्यांसारखं वागून तो विषय सोडून देणं चांगलं नाही का?” लेखात सुचवलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर रागानं तुमच्यावर ताबा मिळवण्याआधी तुम्हीच रागावर ताबा मिळवाल! ▪ (g15-E 01)

^ परि. 4 या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.