व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांती की निर्मिती?

मधमाश्यांचं पोळं

मधमाश्यांचं पोळं

एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात मेणापासून आपलं पोळं तयार करते; ते तयार करण्यासाठी लागणारं मेण मधमाश्यांच्या पोटावरील ग्रंथींत असतं. मधमाश्यांचं पोळं म्हणजे एक उत्कृष्ट रचनाच! असं का म्हणता येईल?

तुम्हाला माहीत होतं का? मधमाश्यांचं पोळं षट्कोनी आकाराच्या असंख्य खोल्यांनी बनलेलं असतं. कमीतकमी साहित्य वापरून जागेचा जास्तीत जास्त वापर करायचा असेल तर दुसऱ्या कोणत्याही आकारापेक्षा षट्कोनी आकार सगळ्यात चांगला आहे असं अनेक शतके गणिताच्या अभ्यासकांना वाटायचं. पण, याचं नेमकं कारण त्यांना स्पष्ट करता आलं नाही. पुढं १९९९ मध्ये, प्राध्यापक थॉमस सी. हेल्स यांनी या गोष्टीचा पुरावा सादर केला. त्यांनी दाखवून दिलं, की कमीतकमी साहित्य वापरून जागेचं समान भागांत विभाजन करण्यासाठी एकसारखे षट्कोन सगळ्यात उत्तम असतात.

खोल्यांच्या षट्कोनी रचनेमुळं उपलब्ध जागेचा पुरेपूर उपयोग करणं, कमीतकमी मेण वापरून हलकं तरीही मजबूत पोळं तयार करणं आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त मध साठवणं मधमाश्यांना शक्य होतं. म्हणूनच, मधमाश्यांच्या पोळ्याला “एक अप्रतिम रचना” असं जे म्हटलं आहे त्याचं आपल्याला नवल वाटू नये.

आज शास्त्रज्ञ मजबूत आणि जागेचा पुरेपूर उपयोग केला जाईल अशा गोष्टी तयार करण्यासाठी मधमाश्यांच्या पोळ्याची नक्कल करत आहेत. उदाहरणार्थ, याच रचनेच्या आधारावर तयार केलेल्या लांब पट्ट्या वापरून इंजिनियर्स आता कमी इंधन लागणारी, हलकी व मजबूत विमानं तयार करत आहेत.

तुम्हाला काय वाटतं? मधमाश्यांच्या पोळ्यांची ही उत्कृष्ट रचना उत्क्रांतीमुळं अस्तित्वात आली, की तिच्यामागं कोणी रचनाकार असावा? ▪ (g15-E 01)