व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

किशोरवयात नैराश्य—का येतं? त्यावर मात कशी कराल?

किशोरवयात नैराश्य—का येतं? त्यावर मात कशी कराल?

अॅना * म्हणते, “जेव्हा मला कधीकधी, अनेक दिवस नैराश्याचा सामना करावा लागतो तेव्हा माझ्यात कोणतीच गोष्ट करण्याचा उत्साह उरत नाही, अशा गोष्टीसुद्धा ज्या सहसा मला खूप आवडतात. मला फक्त झोपावसं वाटतं. मला सारखं वाटत राहतं की माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, मी काहीच कामाची नाही आणि दुसऱ्यांना माझं ओझं होत आहे.”

जूलिया म्हणते, “मला आत्महत्या करावीशी वाटली. खरंतर मला मरायचं नव्हतं पण माझ्या मनात येणारे विचार थांबवायचे होते. तशी मी प्रेमळ आहे पण जेव्हा मी डिप्रेस्ड असते तेव्हा मी कोणाचीच आणि कशाचीच पर्वा करत नाही.”

जेव्हा अॅना आणि जूलिया यांना नैराश्याची लक्षणं जाणवली, तेव्हा अॅना जवळपास १३ वर्षांची होती आणि जूलियाचं वय जवळपास १४ होतं. काही किशोरवयीन मुलांना कधीकधी निराश वाटू शकतं पण अॅना आणि जूलिया यांना कधीकधी अनेक आठवडे किंवा अनेक महिने नैराश्याचा सामना करावा लागायचा. अॅना म्हणते, “असं वाटतं की तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत अडकलात आणि तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. जणू तुम्हाला वेड लागलं आहे आणि तुम्ही विचित्र वागत आहात.”

अॅना आणि जूलियाला जे वाटतं ते काही जगा वेगळं नाही. कित्येक किशोरवयीन मुलं नैराश्याचा सामना करत आहेत. आज ही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटना याबाबतीत असं म्हणते, नैराश्य हे “१० ते १९ वयोगटात असलेल्या मुला-मुलींच्या आजाराचं आणि अपंगत्वाचं मुख्य कारण आहे.”

नैराश्याची लक्षणं मुलं वयात येताना दिसायला सुरू होतात. कदाचित त्यांची झोप, भूक आणि वजन कमी-जास्त होऊ शकतं. आपली काहीच किंमत नाही, आपल्याला कसलीच आशा नाही असं त्यांना वाटू लागतं आणि ती दुःखी किंवा हताशदेखील होऊ शकतात. इतरही काही लक्षणं दिसू शकतात जसं की, एकटं राहणं, कुठल्याही गोष्टीवर लक्ष न लागणं किंवा विसरणं, आत्महत्येचे विचार येणं किंवा प्रयत्न करणं आणि याऐवजी अशी काही लक्षणं ज्यांचं वैद्यकिय स्पष्टीकरण देता येत नाही. एखाद्या व्यक्तीला नैराश्य आल्यासारखं वाटतं तेव्हा डॉक्टर, हे पाहतात की यांपैकी काही लक्षणं अनेक आठवड्यांपासून दिसत आहेत का? आणि त्यांचा त्या व्यक्तीच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे का?

किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य कशामुळे येऊ शकतं?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, “नैराश्याची खूप कारणं असू शकतात. जसं की, एखाद्याला दिलेली वागणूक, मानसिक तणाव किंवा इतर शारीरिक कारणं.” शारीरिक कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात:

शारीरिक कारणं. जूलियाच्या कुटुंबातल्या सदस्यांना नैराश्याचा त्रास होता, यावरून कळतं की, नैराश्य आनुवंशिक असू शकतं. नैराश्यामुळे आपल्या मेंदूत रासायनिक बदल घडतात. हृदयविकार, हार्मोन्समध्ये बदल, किंवा खूप काळापासून ड्रग्सचं व्यसन यांमुळे देखील नैराश्याचा धोका उद्‌भवू शकतो. या सर्वांमुळे नैराश्य येत नसलं तरी, असलेलं नैराश्य खूप प्रमाणात वाढू शकतं. *

तणाव. काही प्रमाणात तणाव आरोग्यासाठी चांगला असतो. पण अती प्रमाणात किंवा सतत तणाव असला तर तो शारीरिक आणि मानसिक रीतीने हानिकारक ठरू शकतो. याच तणावामुळे किशोरवयीन मुलं कधीकधी नैराश्याला बळी पडतात. असं असलं तरी नैराश्याचं अचूक कारण अजून कळलेलं नाही. पण वर दिलेल्या काही कारणांमुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे.

तणावामुळे नैराश्य येण्याची बरीच कारणं असू शकतात जसं की, आईवडील विभक्त होणं किंवा त्यांचा घटस्फोट होणं, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, शारीरिक किंवा लैंगिक शोषण, मोठा अपघात, आजारपण, किंवा इतर मुलांपेक्षा हुशार नसल्यामुळे येणारी नकारात्मक भावना. मुलांनी नेहमीच चांगले मार्क्स मिळवावे अशा आईवडिलांच्या अवास्तव अपेक्षासुद्धा याला कारणीभूत असू शकतात. तसंच इतरही काही कारणं असू शकतात जसं की, वर्गसोबत्यांकडून त्रास, भविष्याबद्दल अनिश्‍चितता, मानसिक रीतीने खचलेल्या पालकाकडून होणारा भावनिक छळ किंवा पालकांचा स्वभाव. मग प्रश्न येतो की किशोरवयीन मुलं नैराश्यावर मात कशी करू शकतात?

शारीरिक आणि मानसिक काळजी घ्या

कमी-जास्त प्रमाणात आलेलं नैराश्य औषधोपचार करून किंवा मानसिक उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने * बरं होऊ शकतं. येशू ख्रिस्ताने म्हटलं: “निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर रोग्यास असते.” (मार्क २:१७) आजार हे फक्त शारीरिक नाही तर मानसिकसुद्धा असू शकतात. जीवनशैलीत बदल केल्यानेसुद्धा फायदा होऊ शकतो, कारण आपल्या शरीराचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे.

जर तुम्ही नैराश्याचा सामना करत असाल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची चांगली काळजी घ्या. उदाहरणार्थ, सकस आहार घ्या, चांगली झोप घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरात अशी रसायनं तयार होतात ज्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं, आपली शक्ती वाढते आणि झोपही चांगली लागते. शक्य असल्यास कोणत्या कारणांनी तुम्हाला नैराश्य येतं हे लवकरात-लवकर ओळखा आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता हे ठरवा. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला मनातल्या सर्व भावना सांगा. तुमच्या कुटुंबातले जवळचे सदस्य किंवा मित्र यांच्या मदतीने तुम्हाला नैराश्याचा प्रभावीपणे सामना करता येईल आणि त्याचे वाईट परिणाम थांबवता येतील. आधी उल्लेख केलेल्या जूलियाला आपले विचार आणि भावना डायरीमध्ये लिहून ठेवल्याने फायदा झाला, तसाच फायदा, तुम्हालाही आपले विचार लिहून ठेवल्याने होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष द्या. असं केल्याने जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पार बदलेल. कारण येशू ख्रिस्ताने म्हटलं: “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत.” —मत्तय ५:३, NW.

सकस आहार घ्या, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या

तुमची आध्यात्मिक गरज पूर्ण झाल्यावर तुम्हाला सांत्वन मिळेल

येशूचे शब्द अचूक आहेत, हे अॅना आणि जूलियाला पटलं. अॅना म्हणते: आध्यात्मिक कार्यांमुळे मी माझ्या समस्यांवर नाही तर इतर लोकांवर लक्ष केंद्रित करते. असं करणं नेहमीच सोपं नसतं पण त्यामुळेच मी आता खूप खूश आहे.” जूलियाला प्रार्थना आणि बायबल वाचन केल्यामुळे खूप बरं वाटतं. ती म्हणते, “देवाकडे आपलं मन मोकळं केल्याने मला शांत वाटतं. बायबलमुळे मला जाणवतं की देवाच्या नजरेत मी अनमोल आहे आणि त्याला माझी काळजी आहे. बायबल वाचन केल्यामुळे, मला भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत मिळाली आहे.”

यहोवा देव आपला सृष्टिकर्ता असल्यामुळे, आपलं संगोपन, आपल्या जीवनातले चांगले-वाईट अनुभव, आपली शारीरिक आणि भावनिक रचना यांचा आपल्या दृष्टिकोनावर आणि भावनांवर कसा परिणाम होतो, हे त्याला चांगलं माहीत आहे. म्हणूनच आपल्याला हवी असलेली मदत आणि सांत्वन तो समंजस आणि दयाळू लोकांच्या द्वारे देतो. इतकंच काय तर, लवकरच अशी वेळ येणार आहे जेव्हा देव आपले शारीरिक आणि मानसिक आजार बरे करेल. कारण यशया ३३:२४ मध्ये असं म्हटलं आहे, “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”

बायबलमध्ये देवाने वचन दिलं आहे की “तो त्यांच्या [आपल्या] डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) खरंच, हे ऐकून किती सांत्वन आणि दिलासा मिळतो! मानवजातीसाठी आणि या पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर jw.org ही वेबसाईट पाहा. तिथं तुम्हाला ऑनलाईन बायबल वाचता येईल. तसंच नैराश्य आणि इतर अनेक विषयांवर लेख वाचायला मिळतील.

^ परि. 3 नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 10 शेकडो आजार, औषधं, ड्रग्स यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम होऊ शकतो, ज्याचा वैद्यकिय उपचार करणं गरजेचं आहे.

^ परि. 14 सावध राहा! नियतकालिक कुठल्याही विशेष प्रकारच्या उपचार पद्धतीची किंवा थेरपीची शिफारस करत नाही.