व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार विपत्कालीन साहाय्य देतात का?

यहोवाचे साक्षीदार विपत्कालीन साहाय्य देतात का?

 होय. यहोवाचे साक्षीदार नेहमी विपत्कालीन साहाय्य पुरवतात. आम्ही गलतीकर ६:१० या वचनात सांगितलेल्या सूचनेनुसार साक्षीदारांना तसेच साक्षीदार नसलेल्यांना व्यावहारिक साहाय्य देतो. त्या वचनात म्हटले आहे: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” विपत्तीत बळी पडलेल्यांना अशा वेळेला जिची नितांत गरज असते ती भावनिक व आध्यात्मिक मदतही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो.—२ करिंथकर १:३, ४.

नियोजन

 विपत्ती आलेल्या भागात मंडळ्या असतील तर वडील जन, मंडळ्यांतील सर्व बंधुभगिनी सुरक्षित आहेत किंवा नाहीत आणि त्यांना कशाची गरज आहे हे पाहण्यासाठी त्यांच्याशी होताहोईल तितका लवकर संपर्क साधायचा प्रयत्न करतात. त्यानंतर मग, त्यांनी घेतलेल्या परिस्थितीच्या आढाव्याचा आणि तातडीने पुरवलेल्या मदतीचा रिपोर्ट हे वडील जन यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक शाखा कार्यालयाला पाठवतात.

 स्थानिक मंडळ्या विपत्तीग्रस्त भागातील बंधुभगिनींना पुरेशी मदत देऊ शकत नसल्यास यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ ती मदत पुरवण्याची व्यवस्था करते. आरंभीच्या ख्रिश्‍चनांनीदेखील अशाच प्रकारे एकदा एका दुष्काळाच्या वेळी एकमेकांची काळजी घेतली होती. (१ करिंथकर १६:१-४) स्थानिक शाखा कार्यालय ही विपत्कालीन मदत पुरवण्याकरता विपत्कालीन साहाय्य समिती नेमते. या कामात मदत करण्यासाठी इतर ठिकाणांतील साक्षीदार आपला वेळ व आपला पैसा खर्च करून स्वखुशीने येतात.—नीतिसूत्रे १७:१७.

खर्च

 यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयांना पाठवल्या जाणाऱ्‍या अनुदानाचा उपयोग या एका मार्गाने विपत्तीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी केला जातो. (प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०; २ करिंथकर ८:१३-१५) हे सर्व काम बिनपगारी स्वयंसेवक करत असल्यामुळे, या कामासाठी असलेला सर्वच्या सर्व निधी, व्यवस्थापन कर्मचाऱ्‍यांसाठी नव्हे तर विपत्कालीन मदतीसाठीच वापरला जातो. सर्व निधीचा आम्ही जपून उपयोग करतो.—२ करिंथकर ८:२०.