व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

कदर कशी दाखवाल?

कदर कशी दाखवाल?

हे कठीण का आहे?

विवाह यशस्वी होण्यासाठी एकमेकांची कदर करणं खूप महत्त्वाचं आहे. कित्येक पती-पत्नी आपल्या जोडीदारांच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे एकमेकांचं कौतुक करणंही कमी होतं. इमोशनल इनफिडिलिटी नावाच्या पुस्तकात एका सल्लागाराने, त्याला भेटायला येणाऱ्या बऱ्याच जोडप्यांबद्दल असं म्हटलं की, “त्यांचे विवाहसोबती कोणत्या गोष्टी करतात, यापेक्षा कोणत्या गोष्टी करत नाहीत, याबद्दलच त्यांना जास्त तक्रार असते. ते मला येऊन सांगतात की माझ्या विवाहसोबत्याने अमुक गोष्टी बदलायला हव्यात पण हे सांगत नाहीत की, कोणत्या गोष्टी तशाच राहायला हव्यात. माझ्याकडे येणारं प्रत्येक जोडपं एका बाबतीत चुकत होतं, ते प्रेमाने एकमेकांचं कौतुक करत नव्हतं.”

तुम्ही आणि तुमचा विवाहसोबती एकमेकांसाठी कदर कशी दाखवाल?

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे

कौतुकाचे बोल वैवाहिक जीवनातला तणाव कमी करू शकतात. जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांचे चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करतात आणि त्याबद्दल कौतुक करतात तेव्हा त्यांचं नातं आणखीन घनिष्ठ होतं. जेव्हा विवाहसोबत्याला याची जाणीव होते की आपला जोडीदार आपली कदर करतो, तेव्हा विवाहात कितीही तणाव असला तरी तो कमी होऊ शकतो.

पत्नींसाठी. “आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचं भरपूर दडपण पुरुषांवर असतं, याकडे बऱ्याच स्त्रिया दुर्लक्ष करतात,” असं आधी उल्लेख केलेल्या इमोशनल इनफिडिलिटी या पुस्तकात म्हटलं आहे. काही देशात जिथे पती-पत्नी दोघंही कमवतात तिथेही हे दडपण असू शकतं.

पतींसाठी. घराचा सांभाळ करण्यासाठी स्त्रिया जी मेहनत करतात, जसं की, मुलांचं संगोपन करणं किंवा घर नीट-नेटकं ठेवणं. ही कामं बऱ्याच पतींना क्षुल्लक वाटू शकतात. फियोना *, जिच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत ती म्हणते: “आपण सर्वच चुकतो आणि जेव्हा मी चुकते तेव्हा मला त्याचं फार वाईट वाटतं. अशा वेळी माझे पती मी घरात जी मेहनत करते, त्याबद्दल माझं कौतुक करतात. तेव्हा मला जाणीव होते की, माझ्यात उणीवा असल्या तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. यामुळे ते नेहमी माझ्या पाठीशी आहेत हे मला जाणवतं आणि याचा मला आनंद होतो.”

या उलट, कित्येक विवाहसोबती आपल्या जोडीदारांची कदर करत नाहीत. त्यामुळे त्यांचा विवाह धोक्यात येऊ शकतो. वॅलेरी नावाची पत्नी असं म्हणते, “जेव्हा तुमच्या विवाहसोबत्याला तुमची कदर नसते तेव्हा तुम्ही खूप सहज अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता जिला तुमची कदर आहे असं तुम्हाला वाटतं.”

तुम्ही काय करू शकता

आपल्या विवाहसोबत्याकडे लक्ष द्या. तुमच्या विवाहसोबत्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत, ते येत्या आठवड्यात जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचं घर सुरळीत चालण्यासाठी तुमचा सोबती कोणत्या गोष्टी करत आहे ते पाहा. कदाचित या अशा गोष्टी असतील ज्यांकडे तुम्ही याआधी इतकं लक्ष दिलं नसेल. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी एक लिस्ट बनवा (१) तुमच्या विवाहसोबत्यामध्ये असलेल्या कोणत्या चांगल्या गुणांचं तुम्हाला कौतुक करावंसं वाटतं आणि (२) तुमच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या विवाहसोबत्याने केल्या आहेत.—बायबल तत्त्व: फिलिप्पैकर ४:८.

विवाहसोबत्याकडे लक्ष देणं का गरजेचं आहे? एरीका नावाची पत्नी म्हणते, “लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराची कदर करायचं सोडून देता. तो काय चांगलं करत आहे, त्यापेक्षा तो काय करत नाही यावरच तुमचं जास्त लक्ष असतं.”

स्वतःला विचारा: ‘माझा विवाहसोबती जी मेहनत करतो त्याला मी क्षुल्लक लेखतो का?’ उदाहरणार्थ, जर तुमच्या पतीने घरातली कामं केली तर तुम्ही त्यांना थँक्यू बोलता का? की तुम्हाला वाटतं, ही तर त्याची जबाबदारीच आहे? जर तुम्ही पती आहात आणि तुमची पत्नी मुलांसाठी मेहनत करते, तर त्यासाठी तुम्ही तिची प्रशंसा करता का? की तुम्हाला वाटतं, हे तर तिने करायलाच हवं. तुमच्या कुटुंबासाठी तुमचा विवाहसोबती जी छोटी-मोठी कामं करतो, ती लक्षात ठेवण्याचा आणि त्यांची कदर करण्याचं ध्येय ठेवा.—बायबल तत्त्व: रोमकर १२:१०.

भरभरून कौतुक करा. आपल्यात फक्त कृतज्ञतेची भावना असणं पुरेसं नाही, तर आपण कृतज्ञता दाखवलीही पाहिजे असं बायबल आपल्याला सांगते. (कलस्सैकर ३:१५) त्यामुळे तुमच्या सोबत्याला नेहमी “थँक्यू” म्हणण्याची सवय ठेवा. जेम्स नावाचे पती म्हणतात: “जेव्हा माझी पत्नी मी केलेल्या कामाबद्दल माझं कौतुक करते, तेव्हा मी चांगला पती बनण्यासाठी आणखी मेहनत करतो आणि आमचं नातं मजबूत करण्यासाठी जास्त मेहनत घेतो.”—बायबल तत्त्व: कलस्सैकर ४:६.

पती आणि पत्नी जेव्हा एकमेकांचं कौतुक करतात तेव्हा त्यांचं वैवाहिक नातं आणखीन घनिष्ठ होतं. मायकल नावाचे पती म्हणतात, “मला वाटतं जर पती-पत्नींनी, त्यांना एकमेकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात, यावर लक्ष दिलं तर बरेच विवाह तुटण्यापासून वाचू शकतात. मग जेव्हा विवाहात समस्या निर्माण होतात तेव्हा त्यांचा विवाहसोबती किती अनमोल आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवल्यामुळे ते लगेच वेगळे होण्याचा विचार करणार नाहीत.”

^ परि. 9 काही नावं बदलण्यात आली आहेत.