व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थना कशी करावी?

प्रार्थना कशी करावी?

यहोवा हा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे. (स्तोत्र ६५:२) आपण कधीही आणि कुठेही त्याला प्रार्थना करू शकतो; अगदी मनातल्या मनातसुद्धा. आपण त्याला ‘पिता’ म्हणून हाक मारावी अशी त्याची इच्छा आहे. आणि खरंच तो सगळ्यात चांगला पिता आहे. (मत्तय ६:९) आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं म्हणून प्रार्थना कशी करावी हे तो प्रेमाने आपल्याला शिकवतो.

येशूच्या नावाने यहोवा देवाला प्रार्थना करा

“तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं, तरी तो माझ्या नावाने  तुम्हाला ते देईल.”—योहान १६:२३.

येशूच्या या शब्दांवरून स्पष्टपणे दिसून येतं, की आपण फक्‍त यहोवा देवाला प्रार्थना केली पाहिजे. तसंच, आपण मूर्तींद्वारे, प्रतिमांद्वारे, संतांद्वारे, स्वर्गदूतांद्वारे किंवा आपल्या पूर्वजांद्वारे नाही, तर येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे हेसुद्धा येशूच्या शब्दांवरून कळतं. आपण जेव्हा येशूच्या नावाने यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण हेच दाखवतो, की येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची आपल्याला जाणीव आहे. येशूने असंही म्हटलं होतं: “माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.”—योहान १४:६.

मनापासून प्रार्थना करा

“त्याच्यासमोर आपलं मन  मोकळं करा.”—स्तोत्र ६२:८.

आपण जसं आपल्या वडिलांशी बोलतो, तसंच प्रार्थनेत यहोवाशी बोललं पाहिजे. एखाद्या पुस्तकातून प्रार्थना वाचण्याऐवजी किंवा तोंडपाठ केलेल्या प्रार्थना म्हणण्याऐवजी आपण आदराने आणि मनापासून यहोवाला प्रार्थना केली पाहिजे.

देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करा

“त्याच्या इच्छेप्रमाणे  असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.”—१ योहान ५:१४.

देवाने आपली प्रार्थना ऐकावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे. त्याची इच्छा काय आहे, तो आपल्यासाठी काय करणार आहे आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं त्याने बायबलमध्ये सांगितलं आहे. ते जाणून घेण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली तर तो ती नक्कीच ऐकेल.

आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?

रोजच्या गरजांसाठी. आपण अन्‍न, वस्त्र आणि निवारा या रोजच्या गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो. तसंच, जीवनात योग्य निर्णय घेता यावेत म्हणून बुद्धीसाठी आणि कठीण परिस्थितींचा धीराने सामना करता यावा म्हणून बळासाठी आपण प्रार्थना करू शकतो. याशिवाय त्याने आपल्याला माफ करावं, आपल्याला मदत करावी आणि त्याच्यावरचा आपला विश्‍वास आणखी वाढवावा, म्हणूनही आपण प्रार्थना करू शकतो.—लूक ११:३, ४, १३; याकोब १:५, १७.

इतरांसाठी. मुलं एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे, आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांची काळजी घेतो तेव्हा यहोवालासुद्धा खूप आनंद होतो. कारण आपण सगळे त्याची मुलंच आहोत. म्हणून आपण आपल्या विवाहसोबत्यासाठी, मुलांसाठी, नातेवाइकांसाठी आणि मित्रांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि तेच बायबलमध्ये सांगितलं आहे: “एकमेकांसाठी प्रार्थना करा.”—याकोब ५:१६.

देवाचे आभार मानण्यासाठी. देव आपला निर्माणकर्ता आहे आणि त्याच्याबद्दल बायबल असं म्हणतं: ‘त्याने आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन, अन्‍नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.’ (प्रेषितांची कार्यं १४:१७) देवाने आपल्यासाठी किती काही केलं आहे याचा जर आपण विचार केला, तर प्रार्थनेत त्याचे आभार मानण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. याशिवाय, देवाच्या आज्ञांचं पालन करूनही आपण दाखवू शकतो की आपण त्याचे किती आभारी आहोत.—कलस्सैकर ३:१५.

धीर धरा आणि प्रार्थना करत राहा

कधीकधी मनापासून प्रार्थना करूनही आपण निराश होऊ शकतो. कारण आपल्याला कदाचित लगेच आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल. मग याचा अर्थ असा होतो का, की देवाला आपली काळजी नाही? मुळीच नाही. पुढे दिलेल्या उदाहरणांवरून दिसून येतं, की अशा वेळी आपण निराश न होता प्रार्थना करत राहिलं पाहिजे.

पहिल्या लेखात आपण स्टीवचा अनुभव पाहिला होता. तो आता म्हणतो: “मी जर देवाला प्रार्थना करत राहिलो नसतो, तर मला नाही वाटत की मी आयुष्यात पुन्हा कधी आनंदी झालो असतो.” तो असं का म्हणू शकला? कारण नंतर त्याने बायबलचा अभ्यास केला. अभ्यासातून त्याला समजलं की प्रार्थना करत राहणं किती महत्त्वाचं आहे. स्टीव पुढे म्हणतो: “मी देवाला प्रार्थना करतो आणि माझ्या जवळच्या मित्रांनी मला जो आधार दिला त्याबद्दल त्याचे आभार मानतो. आता मी पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे.”

त्याच लेखात आपण जेनीचाही अनुभव पाहिला होता. तिला स्वतःबद्दल असं वाटायचं, की देवाने तिच्या प्रार्थना ऐकाव्यात एवढीसुद्धा तिची लायकी नाही. त्याबद्दल ती म्हणते: “मी जेव्हा कमीपणाच्या भावनेमुळे अगदीच खचून जायचे, तेव्हा मी देवाला कळकळून प्रार्थना करायचे. ‘मला असं का वाटतं हे समजायला मला मदत कर,’ असं मी त्याला म्हणायचे.” प्रार्थना केल्यामुळे जेनीला कशी मदत झाली? ती म्हणते: “देवाशी बोलल्यामुळे मी स्वतःला देवाच्या नजरेतून पाहू लागले. मी जरी स्वतःबद्दल वाईट विचार करत असले, तरी देव माझ्याबद्दल तसा विचार करत नाही हे माझ्या लक्षात आलं. प्रार्थनेमुळे मला जीवन जगण्याचं बळ मिळालं. तसंच, यहोवा माझ्यासाठी एक खरा देव, एक प्रेमळ पिता आणि काळजी घेणारा मित्र बनला. आणि मी जर त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न करत राहिले, तर तो नेहमी माझ्या पाठीशी राहून मला मदत करेल याचा मला भरवसा आहे.”

इसाबेलचा मुलगा जेरार्ड अपंग असूनही आनंदी आहे. हे पाहून ती म्हणते, “देवाने माझी प्रार्थना ऐकली याबद्दल मला जराही शंका नाही.”

आता इसाबेलच्या अनुभवाचा विचार करा. ती गरोदर होती तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं, की जन्माला येणारं तिचं बाळ अपंग असेल. हे ऐकून तिला धक्काच बसला. काहींनी तर तिला गर्भपात करायचा सल्ला दिला. इसाबेल म्हणते: “हे सगळं ऐकून मी इतकी दुःखी झाले की त्या दुःखातच जाते की काय, असं मला वाटलं.” मग त्यातून सावरायला तिने काय केलं? ती म्हणते: “मी दिवसरात्र देवाकडे प्रार्थना करत राहिले.” पुढे तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव जेरार्ड. तो अपंग जन्माला आला. पण असं असूनही इसाबेलला वाटतं की देवाने तिची प्रार्थना ऐकली. कोणत्या अर्थाने? इसाबेल म्हणते: “आज माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. आणि अपंग असूनही तो आनंदी आहे. देवाने मला दिलेला तो सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकली याबद्दल मला जराही शंका नाही.”

या अनुभवांवरून आपल्याला बायबलमधल्या एका कवीचे शब्द आठवतात. त्याने आपल्या कवितेत असं म्हटलं: “हे यहोवा, तू नम्र लोकांची विनंती ऐकशील. तू त्यांचं मन स्थिर करशील आणि त्यांच्याकडे लक्ष देशील.” (स्तोत्र १०:१७) खरंच, देवाला प्रार्थना करत राहण्याची किती चांगली कारणं आपल्याकडे आहेत!

येशूने केलेल्या अनेक प्रार्थना आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. त्यांपैकी एक तर अनेकांना माहीत आहे. ती म्हणजे येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?