व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा . . .

नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा . . .

सिएरा लियोन इथे राहणारे अन्ड्रू म्हणतात: “सुरुवातीला आम्हाला अगदी आशाहीन वाटलं. होतं नव्हतं ते सगळं आम्ही पुरामुळे आणि भूस्खलनामुळे गमावलं.”

वर्जिन बेटे इथे राहणारे डेवीड म्हणतात: “चक्रीवादळ संपल्यावर आम्ही घरी गेलो तेव्हा तिथे काहीच उरलं नव्हतं. सर्वकाही पाहून आम्हाला धक्काच बसला. माझी मुलगी तर धपकन खाली बसली आणि रडू लागली.”

तुम्हीही कधी नैसर्गिक विपत्तीचा सामना केला आहे का? असल्यास इतर लोकांसारखा तुमचाही गोंधळ उडाला असेल, तुम्हाला धक्का बसला असेल, नैराश्‍य आलं असेल आणि नंतर भयानक स्वप्नंही पडली असतील. बरेचसे पीडित जण खूप हताश होतात आणि पार थकून गेलेले असतात. दुःखातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छाच नसते.

एखाद्या विपत्तीत तुम्ही आपलं सर्वकाही गमावलं असेल, तर तुम्हालाही कदाचित वाटेल की आता पुरे झालं! हे सर्व माझ्या सहनशक्‍तीच्या पलीकडे आहे. जगण्यात काहीच अर्थ नाही असंही कदाचित तुम्हाला वाटेल. पण बायबल आपल्याला सांगतं, की तुमच्या जीवनाला नक्कीच अर्थ आहे  आणि चांगल्या भविष्याची एक पक्की आशा तुमच्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे.

बायबलमधून सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला आशा मिळते

उपदेशक ७:८ म्हणतं: “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.” विपत्तीनंतर सुरुवातीला तुम्हाला खूप आशाहीन वाटेल. पण जीवन हळूहळू पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्यावर तुम्हाला बरं वाटू लागेल.

बायबल पुढे येणाऱ्‍या अशा एका काळाबद्दल सांगतं, जेव्हा “शोकाचा व आकांताचा शब्द पुनः ऐकू येणार नाही.” (यशया ६५:१९) देवाचं राज्य या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल तेव्हा हे घडेल. (स्तोत्र ३७:११, २९) पुन्हा कधीच नैसर्गिक विपत्ती येणार नाही. नैसर्गिक विपत्तीमुळे प्रभावीत झालेल्या पीडितांना ज्या कटू आठवणी आणि शारीरिक किंवा मानसिक वेदना सहन कराव्या लागतात, त्या सर्व कायमच्या काढून टाकण्यात येतील. कारण आपल्या सर्वशक्‍तिमान देवाने वचन दिलं आहे: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”​—यशया ६५:१७.

जरा विचार करा: “तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे.” असं तुमचा निर्माणकर्ता म्हणतो. याचाच अर्थ, देवाच्या राज्यात तुम्हाला एक शांतीपूर्ण जीवन मिळेल. (यिर्मया २९:११, ईझी-टू-रीड व्हर्शन) हे सत्य माहीत झाल्यावर तुमच्या जीवनाला अर्थ आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आधीच्या लेखात उल्लेख केलेली सॅली म्हणते: “देवाचं राज्य आपल्यासाठी भविष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे हे स्वतःला आठवण करून दिल्यावर, तुम्हाला भूतकाळात घडलेल्या गोष्टी मागे सोडून द्यायला आणि सध्याच्या परिस्थितीचा सामना करायला मदत होईल.”

देवाचं राज्य मानवांसाठी लवकरच कोणकोणत्या गोष्टी करणार आहे याबद्दल जाणून घ्यायला आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. तुम्ही विपत्तीचा सामना केला असला तरी देवाच्या राज्याबद्दल शिकून घेतल्याने तुम्हाला एक पक्की आशा मिळते की आज जीवन जगण्याला अर्थ आहे, कारण लवकरच भविष्यात कोणतीही विपत्ती राहणार नाही. पण सध्या, विपत्तीमुळे झालेल्या परिणामांतून सावरायला मदतीच्या ठरतील अशा काही बायबलमधल्या व्यावहारिक मार्गदर्शनांवर आता आपण चर्चा करू या.