व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गंभीर आजार होतो तेव्हा . . .

गंभीर आजार होतो तेव्हा . . .

७१ वर्षांच्या लींडा म्हणतात: “मला जेव्हा कळलं की मला फुप्फुसांचा आणि आतड्यांचा कॅन्सर झाला आहे, तेव्हा वाटलं जणू कोणी मला मृत्युदंडाचीच शिक्षा सुनावत आहे. पण डॉक्टरांकडून घरी पोचल्यावर मी विचार केला, ‘मला वाटलं नव्हतं कधी माझ्यावर अशी परिस्थिती येईल. पण आता मला कोणत्या न कोणत्या मार्गाने तिचा सामना करावा लागेल.’”

४९ वर्षांच्या एलीस म्हणतात: “मला एक गंभीर आणि खूप वेदनादायक आजार आहे. याचा परिणाम माझ्या चेहऱ्‍याच्या डाव्या बाजूच्या नसांवर झाला. यामुळे कधीकधी तर मला इतका त्रास होतो की मला नैराश्‍य येतं. बऱ्‍याचदा मला एकटेपणा जाणवला होता आणि मी आत्महत्याचाही विचार केला.”

तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्‍तीला एखादा जीवघेणा आजार झाला असेल तर अशा परिस्थितीचा सामना करणं खूपच कठीण असतं. तसंच, आजारपणासोबतच त्या वेळी उद्‌भवणाऱ्‍या वेगवेगळ्या भावनांचाही आपल्याला सामना करावा लागतो. डॉक्टरांकडच्या सतत फेऱ्‍या, योग्य उपचार मिळवणं किंवा त्यासाठी लागणारा खर्च यांमुळे होणारी दगदग किंवा औषधांचा दुष्परिणाम यांमुळे भीती आणि चिंता आणखी वाढू शकते. गंभीर आजारपणासोबत या सर्व गोष्टींचा सामना करताना बराच मानसिक त्रास होऊ शकतो आणि मनावर दडपण येऊ शकतं.

मग अशा वेळी आपल्याला कुठून मदत मिळू शकते? बऱ्‍याच जणांना देवाला प्रार्थना केल्यामुळे आणि बायबलमधून सांत्वनदायक अहवाल वाचल्यामुळे खूप मदत झाली आहे. तसंच, कुटुंबाकडून आणि मित्रपरिवाराकडून आधार आणि प्रेम मिळाल्यामुळेही मदत होऊ शकते.

काहींना सावरायला कशामुळे मदत झाली?

५८ वर्षांचे रॉर्बट म्हणतात: “आजाराचा सामना करण्यासाठी आणि सर्व काही सहन करण्यासाठी देव तुम्हाला मदत करेल यावर विश्‍वास ठेवा. यहोवा देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या भावना त्याला सांगा. मदतीसाठी प्रार्थनेत त्याच्याकडे पवित्र आत्मा मागा. आजारपणादरम्यान सकारात्मक वृत्ती बाळगण्यासाठी, कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे मदत मागा.”

“अशा काळात कुटुंबाकडून मिळणारी भावनिक मदत खरंच खूप मोलाची असते. ‘तुम्ही कसे आहात?’ अशी विचारपूस करणारे दिवसातून एक-दोन जणांचे फोन मला येतात. माझे मित्र जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी मला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळतं. त्यांच्यामुळे जीवनाच्या प्रवासात पुढे चालत राहण्यासाठी मला एक अनोखं बळ मिळतं.”

लींडा म्हणतात: “तुम्ही आजारी व्यक्‍तीला भेटायला जात असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आजारी व्यक्‍तीला आपल्यासारखंच जीवन जगण्याची इच्छा असते आणि तिला नेहमी आपल्या आजारपणाबद्दल बोलायला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या सामान्य विषयांवर बोलतात त्या विषयांवरच बोला.”

देवाकडून मिळणारं बळ, शास्त्रवचनांतून मिळणारं सांत्वन, कुटुंब आणि मित्रांकडून मिळणाऱ्‍या प्रेमळ आधारामुळे आपण खात्रीने म्हणू शकतो, की जरी आपल्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागत असला तरी जीवन जगण्याला अर्थ आहे.