व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 बायबलने बदलले जीवन!

माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्यांनी बायबलमधून दिलं!

माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्यांनी बायबलमधून दिलं!
  • जन्म: १९५०

  • देश: स्पेन

  • माझा गतकाळ: कॅथलिक नन

माझी पूर्व जीवनशैली:

माझा जन्म झाला तेव्हा माझे आईवडील स्पेनच्या उत्तरपश्‍चिमेकडे असलेल्या गलेशियातील एका खेड्यात राहत होते. तिथं आमचा एक छोटासा मळा होता. आठ भावंडांपैकी मी चौथी होते. आमच्या घरातलं वातावरण अगदी खेळीमेळीचं होतं. स्पेनमध्ये त्या काळात प्रत्येक कुटुंबातून निदान एकतरी मूल पाळक बनण्यासाठी सेमिनरीला किंवा नन बनण्यासाठी कॉन्वेनटला जात असे. आमच्या कुटुंबातील तिघांनी तेच केलं.

माझी एक बहीण माद्रिदच्या कॉन्वेंटमध्ये नन होती; वयाच्या १३ व्या वर्षी मीसुद्धा नन बनण्यासाठी तिथं गेले. तिथलं वातावरण अगदीच निरस होतं. तिथं कोणी कोणाशी मैत्री करू शकत नव्हतं. नियम, प्रार्थना आणि कडक शिस्त इतकंच काय ते तिथं चालायचं. आम्ही दररोज पहाटे मनन करण्यासाठी चॅपलमध्ये (प्रार्थनागृह) एकत्र यायचो; बरेचदा तर मनन करण्यासारखं काहीच माझ्या डोक्यात नसायचं. त्यानंतर, आम्ही धार्मिक गीतं गायचो आणि मासविधी साजरा करायचो. हे सगळं लॅटिन भाषेत चालायचं, त्यामुळं त्यातलं काहीएक मला समजायचं नाही. देव आपल्यापासून खूप दूर आहे असं मला वाटायचं. अशा धीरगंभीर वातावरणात माझा एकेक दिवस जायचा. आम्ही दोघ्या बहिणी एकमेकींना भेटलो तरी “हेल प्युअरस्ट मेरी” (पवित्र मरियेची स्तुती असो) यापलीकडं काहीच बोलायचो नाही. तिथं सगळ्यांना जेवणानंतर फक्त अर्धा तास बोलायची परवानगी होती. माझ्या घरच्या खेळीमेळीच्या वातावरणापेक्षा हे किती वेगळं होतं! मला खूप एकटं-एकटं वाटायचं आणि मी नेहमी रडायचे.

मला कधीच देवाच्या जवळ असल्यासारखं वाटलं नाही; तरीसुद्धा वयाच्या १७ व्या वर्षी मी नन बनले. खरंतर, माझ्याकडून जे अपेक्षित होतं तेच मी केलं; पण, देवानं खरंच यासाठी आपल्याला निवडलं आहे का, असा प्रश्न मला भेडसावू लागला. तिथल्या नन्स म्हणायच्या की ज्यांच्या मनात अशा शंकाकुशंका येतात त्यांना नरकाग्नीत टाकलं जाईल. तरीसुद्धा माझ्या मनात अनेक प्रश्न घोळत राहिले. मला माहीत होतं, की येशू ख्रिस्त कधीच लोकांपासून फटकून राहिला नाही; उलट त्यांना शिकवण्यात आणि मदत करण्यात तो व्यस्त होता. (मत्तय ४:२३-२५) मी २० वर्षांची झाले तोपर्यंत माझी खातरी पटली की नन असण्यात काहीच अर्थ नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मदर सुपिरीयर (नन्सची प्रमुख) होती तिनं मला सांगितलं, की माझ्या मनाचा गोंधळ होत असेल तर मी लवकरात लवकर कॉन्वेन्ट सोडून जावं. तिला कदाचित असं वाटलं असावं की मी आणखी काही दिवस तिथं राहिले तर इतर नन्सनाही आपल्यासारखा विचार करण्यास भाग पाडेन. अशा प्रकारे मी कॉन्वेन्टमधून बाहेर पडले.

 कॉन्वेन्टमधून बाहेर पडल्यानंतर मी घरी गेले. माझे आईवडील खूप समजदार होते. त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. पण, आम्ही राहत होतो त्या खेड्यात उत्पन्नाचं कोणतंच साधन नसल्यामुळं मी जर्मनीला माझ्या भावाकडे राहायला गेले. स्पेनमधून आलेल्या लोकांच्या एका आवेशी साम्यवादी गटाचा तो सदस्य होता. कामगारांच्या हक्कांसाठी आणि स्त्री-समानतेसाठी लढणाऱ्या या लोकांमध्ये मी सहज मिसळून गेले. अशा प्रकारे मी एक साम्यवादी बनले आणि शेवटी त्याच गटातल्या एका सदस्याशी लग्न केलं. साम्यवादी साहित्याचं वाटप करून आणि निषेध दर्शवणाऱ्या मोर्च्यांमध्ये भाग घेऊन आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत असं मला वाटायचं.

पण काही काळानंतर मी पुन्हा निराश झाले. मला वाटलं की साम्यवादी लोक शिकवतात तसं सहसा वागत नाहीत. १९७१ मध्ये आमच्या गटातील काही तरुणांनी फ्रँकफुर्टमधील स्पॅनिश दूतावासाला आग लावली तेव्हा या गोष्टीची मला आणखीनच खातरी पटली. हुकूमशाही असलेल्या स्पेनमध्ये होणाऱ्या अन्यायाबद्दल निषेध दर्शवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होतं. पण आपला संताप व्यक्त करण्याचा हा काही मार्ग नाही असं मला वाटलं.

आमचं पहिलं मूल झालं तेव्हा मी माझ्या पतीला सांगून टाकलं की इथून पुढं मी साम्यवाद्यांच्या सभांना जाणार नाही. माझ्या पूर्वीच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही मला किंवा माझ्या बाळाला भेटायला आलं नाही; त्यामुळं मला खूप एकाकी वाटू लागलं. जीवन जगण्याचा उद्देश काय?, समाज-सुधारणा करण्यात खरंच काही अर्थ आहे का? असे प्रश्न मला सतावू लागले.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

१९७६ साली यहोवाचे साक्षीदार असलेलं एक स्पॅनिश जोडपं आमच्या घरी आलं आणि बायबलवर आधारित काही साहित्य त्यांनी आम्हाला दिलं. ते दुसऱ्यांदा आमच्या घरी आले तेव्हा मी एका पाठोपाठ एक अनेक प्रश्नांचा त्यांच्यावर भडिमार केला; जीवनातील दुःख, असामनता आणि अन्याय यांबद्दलचे ते प्रश्न होते. पण, माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्यांनी बायबलमधून दिलं तेव्हा मी अवाकच राहिले! मी लगेच बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली.

सुरुवातीला फक्त ज्ञान घेण्याच्या उद्देशानं मी अभ्यास करायचे. पण, मी आणि माझे पती यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात सभांना जाऊ लागलो तेव्हा सगळंच बदललं. तोपर्यंत आम्हाला दोन मुलं झाली होती. सभांच्या दिवशी ते साक्षीदार जोडपं आम्हाला त्यांच्या गाडीतून सभांना घेऊन जायचं आणि सभांमध्ये मुलांना सांभाळण्यास आम्हाला मदत करायचं. लवकरच, साक्षीदारांबद्दल आम्हाला खूप प्रेम वाटू लागलं.

असं असलं तरी धर्माबद्दल अजूनही माझ्या मनात काही शंका होत्या. त्यामुळं मी स्पेनमध्ये माझ्या कुटुंबाला जाऊन भेटण्याचा विचार केला. मी बायबलचा अभ्यास करू नये म्हणून पाळक असलेल्या माझ्या काकांनी काही कमी प्रयत्न केले नाही. पण, तिथल्या साक्षीदारांनी मला खूप मदत केली. जर्मनीतल्या साक्षीदारांप्रमाणेच त्यांनीसुद्धा माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर बायबलमधून दिलं. त्यामुळं जर्मनीत परतल्यानंतर बायबलचा अभ्यास पुन्हा सुरू करायचा असं मी ठरवलं. माझ्या पतीनं बायबलचा अभ्यास बंद केला; पण मी मात्र ठरवल्याप्रमाणे पुन्हा बायबलचा अभ्यास सुरू केला. १९७८ मध्ये एक यहोवाची साक्षीदार म्हणून माझा बाप्तिस्मा झाला.

मला काय फायदा झाला:

बायबलमधील सत्याचं अचूक ज्ञान घेतल्यामुळं माझ्या जीवनाला एक स्पष्ट उद्देश आणि दिशा मिळाली. उदाहरणार्थ, १ पेत्र ३:१-४ ही वचने पत्नींना असं प्रोत्साहन देतात, की त्यांनी मनापासून आपापल्या पतींचा आदर करावा व त्यांच्या “अधीन” राहावं; तसंच, त्यांनी एक “सौम्य” मनोवृत्तीही विकसित करावी, कारण हा गुण देवाच्या नजरेत “बहुमूल्य” आहे. अशा तत्त्वांनी मला एका पत्नीची आणि आईची भूमिका पार पाडण्यास मदत केली आहे.

आज मला यहोवाची साक्षीदार होऊन सुमारे ३५ वर्षे झाली आहेत. देवाची उपासना करणाऱ्या एका जगव्याप्त बंधुसमाजाचा भाग असल्याचा मला खूप आनंद होतो. तसंच, माझ्या पाच मुलांपैकी चार मुलं त्याचा भाग आहेत याचाही मला आनंद होतो. ▪ (w14-E 04/01)