व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार हा एक पंथ आहे का?

यहोवाचे साक्षीदार हा एक पंथ आहे का?

 नाही. यहोवाचे साक्षीदार हा एक पंथ नाही. तर ते ख्रिश्‍चन आहेत जे येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा व त्याच्या शिकवणींनुसार जगण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात.

पंथ म्हणजे काय?

 “पंथ” या शब्दाची व्याख्या प्रत्येक जण आपापल्या परीने देतो. परंतु, त्याचे दोन अर्थ होऊ शकतात आणि हे दोन्ही अर्थ यहोवाच्या साक्षीदारांना का लागू होत नाहीत ते पाहू या.

  •   काहींच्या मते, पंथ म्हणजे एक नवीन धर्म. यहोवाच्या साक्षीदारांनी एका नवीन धर्माची सुरुवात केलेली नाही. उलट त्यांची उपासना पद्धत, बायबलमध्ये उल्लेखलेल्या पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या उपासना पद्धतीसारखी आहे; उपासनेच्या बाबतीत ते त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करतात आणि हे ख्रिश्‍चन पाळत असलेल्या शिकवणी मानतात. (२ तीमथ्य ३:१६, १७) उपासनेच्या बाबतीत स्वीकारयोग्य पद्धत कोणती आहे हे सांगण्याचा अधिकार फक्‍त बायबलचा आहे, असे ते मानतात.

  •   काहींच्या मते पंथ म्हणजे एक घातक धार्मिक गट ज्याचा मानवी नेता आहे. यहोवाचे साक्षीदार कोणत्याही मानवाला आपला नेता मानत नाहीत. तर, “तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे,” असे येशूने आपल्या अनुयायांना जे सांगितले ते हे मान्य करतात.—मत्तय २३:१०, पं.र.भा.

 यहोवाचे साक्षीदार घातकी पंथ तर मुळीच नाहीत उलट ते अशा धर्माचे पालन करतात ज्यामुळे त्यांचा आणि समाजातील इतरांचा फायदाच होईल. जसे की, ते करत असलेल्या सेवेमुळे अनेक लोकांना अंमली पदार्थ व मद्यपान यांसारख्या हानीकारक सवयींपासून मुक्‍त होण्यास मदत मिळाली आहे. तसेच, ते जगभरात साक्षरतेचे वर्ग चालवून हजारो लोकांना लिहा-वाचायला शिकवतात. विपत्ती मदत कार्यातही ते जोमाने भाग घेतात. येशूने आपल्या अनुयायांना लोकांवर चांगला प्रभाव पाडण्याचे उत्तेजन दिले; यहोवाचे साक्षीदार अगदी हेच करत आहेत.—मत्तय ५:१३-१६.