व्हिडिओ पाहण्यासाठी

स्वर्गात कोण जातात?

स्वर्गात कोण जातात?

बायबलचं उत्तर

 देव विश्‍वासू ख्रिश्‍चनांपैकी काही लोकांना निवडतो, जे मृत्यूनंतर पुनरुत्थान होऊन स्वर्गात जातील. त्यांची संख्या मर्यादित आहे. (१ पेत्र १:३, ४) त्यांची निवड झाल्यानंतरही त्यांनी शेवटपर्यंत आपला विश्‍वास आणि शुद्ध आचरण टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे, नाहीतर ते स्वर्गातल्या जीवनाचं बक्षीस गमावून बसतील.​—इफिसकर ५:५; फिलिप्पैकर ३:१२-१४.

जे स्वर्गात जातात ते तिथे काय करतील?

 ते येशूसोबत राजे आणि याजक म्हणून १,००० वर्षं राज्य करतील. (प्रकटीकरण ५:९, १०; २०:६) ते एका स्वर्गीय सरकारचा भाग बनतील. याला “नवीन आकाश” म्हटलंय. आणि ते ‘नवीन पृथ्वीवर’ म्हणजेच एका नवीन मानवसमाजावर राज्य करतील. स्वर्गातून राज्य करणारे हे राजे, देवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे मानवजातीला परिपूर्ण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीपर्यंत पोहोचायला मदत करतील.​—यशया ६५:१७; २ पेत्र ३:१३.

किती लोकांचं स्वर्गात राहण्यासाठी पुनरुत्थान होईल?

 बायबल सांगतं की १,४४,००० लोकांचं स्वर्गात राहण्यासाठी पुनरुत्थान होईल. (प्रकटीकरण ७:४) प्रकटीकरण १४:१-३ यात दिलेल्या दृष्टान्तात प्रेषित योहानला “कोकरा सीयोन पर्वतावर उभा असलेला . . . दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते.” या दृष्टान्तात “कोकरा” हा पुनरुत्थान झालेल्या येशूला सूचित करतो. (योहान १:२९; १ पेत्र १:१९) तर ‘सीयोन पर्वत’ येशू आणि त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करणाऱ्‍या १,४४,००० जणांच्या उच्च गौरवी स्थानाला सूचित करतो.​—स्तोत्र २:६; इब्री लोकांना १२:२२.

 ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी “जे बोलवण्यात आलेले, निवडलेले” लोक आहेत, त्यांना ‘लहान कळप’ असं म्हणण्यात आलंय. (प्रकटीकरण १७:१४; लूक १२:३२) यावरून दिसून येतं, की येशूच्या सगळ्या मेंढरांच्या तुलनेत त्यांची संख्या फार कमी असेल.​—योहान १०:१६.

जे स्वर्गात जातात त्यांच्याबद्दल काही गैरसमज

 गैरसमज: सगळे चांगले लोक स्वर्गात जातात.

 खरी माहिती: देवाने वचन दिलंय की चांगल्या लोकांपैकी बहुतेक जणांना पृथ्वीवर कायमचं जीवन मिळेल.​—स्तोत्र ३७:११, २९, ३४.

  •   येशूने म्हटलं: “कोणीही [मनुष्य] वर स्वर्गात गेला नाही. (योहान ३:१३) येशूच्या या शब्दांवरून दिसून येतं, की त्याच्या आधी ज्या चांगल्या लोकांचा मृत्यू झाला होता, जसं की अब्राहाम, मोशे, ईयोब आणि दावीद ते स्वर्गात गेले नव्हते. (प्रेषितांची कार्यं २:२९, ३४) उलट त्यांना पुनरुत्थान होऊन पृथ्वीवर राहण्याची आशा होती.​—ईयोब १४:१३-१५.

  •   स्वर्गात राहण्यासाठी होणाऱ्‍या पुनरुत्थानाला बायबलमध्ये ‘पहिलं पुनरुत्थान’ म्हटलंय. (प्रकटीकरण २०:६) यावरून कळतं की आणखी एक पुनरुत्थान होणार आहे. ते पृथ्वीवरच्या जीवनासाठी असेल.

  •   बायबल सांगतं की देवाच्या राज्यात “मरण राहणार नाही.” (प्रकटीकरण २१:३, ४, तळटीप) हे वचन पृथ्वीवरच्या जीवनाबद्दलच असलं पाहिजे, कारण स्वर्गात कधीच मरण नव्हतं.

 गैरसमज: स्वर्गातलं जीवन मिळेल की पृथ्वीवरचं हे प्रत्येक जण स्वतः निवडू शकतो.

 खरी माहिती: विश्‍वासू ख्रिश्‍चनांपैकी कोणाला “स्वर्गातल्या जीवनाचं बक्षीस” मिळेल हे देवच ठरवतो. (फिलिप्पैकर ३:१४) एखाद्या व्यक्‍तीला स्वर्गात राहायची इच्छा असल्यामुळे तिला निवडलं जातं, असं नाही.​—मत्तय २०:२०-२३.

 गैरसमज: पृथ्वीवर कायम जगण्याची आशा ही एक कमी दर्जाची आशा आहे. ज्यांची स्वर्गात जाण्याची योग्यता नाही, त्यांना पृथ्वीवरचं जीवन दिलं जातं.

 खरी माहिती: ज्यांना पृथ्वीवर कायमचं जीवन मिळेल त्यांना देव ‘माझे लोक,’ “माझे निवडलेले लोक” आणि “यहोवाने आशीर्वादित केलेली संतती” असं म्हणतो. (यशया ६५:२१-२३) मानवांसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्यात सहभागी होण्याचा बहुमान त्यांना मिळेल. ते पृथ्वीवरच्या नंदनवनात परिपूर्ण जीवनाचा कायम आनंद घेतील.​—उत्पत्ती १:२८; स्तोत्र ११५:१६; यशया ४५:१८.

 गैरसमज: प्रकटीकरणात उल्लेख केलेली १,४४,००० ही संख्या खरी नसून ती लाक्षणिक आहे.

 खरी माहिती: प्रकटीकरण या पुस्तकात बऱ्‍याच लाक्षणिक संख्या दिल्या आहेत हे खरंय. पण त्यात काही खरोखरच्या संख्यासुद्धा आहेत. उदाहरणार्थ, त्यात “कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं” असं एका ठिकाणी म्हटलंय. (प्रकटीकरण २१:१४) ही संख्या लाक्षणिक नाही, तर खरोखरची आहे. त्याच प्रकारे, १,४४,००० ही संख्यासुद्धा खरोखरची आहे. आपण असं का म्हणू शकतो हे आता पाहू या.

 प्रकटीकरण ७:४ यात “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला [किंवा, ज्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी निवडण्यात आलंय] त्यांची संख्या” दिलेली आहे. ती संख्या “१,४४,०००” इतकी आहे असं तिथे म्हटलंय. या वचनानंतर लगेच पुढच्या काही वचनांमध्ये एका दुसऱ्‍या गटाबद्दल सांगितलंय. “कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय” असं या गटाला म्हटलंय. या ‘मोठया लोकसमुदायालाही’ देवाकडून तारण मिळतं असं सांगितलंय. (प्रकटीकरण ७:९, १०) जर १,४४,००० ही संख्या लाक्षणिक असती, म्हणजेच ती अमर्यादित असती तर मग या गटात आणि मोठ्या लोकसमुदायात फरक राहिलाच नसता. यावरून आपण म्हणू शकतो, की १,४४,००० ही संख्या लाक्षणिक नसून ती खरोखरची संख्या आहे. a

 शिवाय, १,४४,००० जणांना “पहिलं फळ म्हणून मानवजातीतून विकत घेण्यात आलं” असं म्हटलंय. (प्रकटीकरण १४:४) “पहिलं फळ” हे शब्द निवडक लोकांच्या एक छोट्या गटाला सूचित करतात. यावरून स्पष्ट होतं, की १,४४००० लोकांचा हा छोटा गट, पृथ्वीवर राहणाऱ्‍या अगणित लोकांवर ख्रिस्तासोबत मिळून स्वर्गातून राज्य करेल.​—प्रकटीकरण ५:१०.

a प्राध्यापक रॉबर्ट एल. थॉमस यांनीही प्रकटीकरण ७:४ मधल्या १,४४,००० या संख्येबद्दल असं लिहिलं: “ही संख्या एक निश्‍चित संख्या आहे, पण याउलट प्रकटीकरण ७:९ यात दिलेली संख्या अनिश्‍चित आहे. १,४४,००० ही संख्या लाक्षणिक आहे असं जर आपण म्हटलं, तर मग प्रकटीकरण या पुस्तकातली कोणतीच संख्या खरोखरची आहे असं म्हणता येणार नाही.​—प्रकटीकरण १-७: स्पष्टीकरण आणि माहिती (इंग्रजी), पान क्र. ४७४.