व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | लवकरच भ्रष्टाचारमुक्त सरकार!

देवाचं राज्य—एक भ्रष्टाचारमुक्त सरकार

देवाचं राज्य—एक भ्रष्टाचारमुक्त सरकार

सरकारी भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणं अशक्य का आहे हे सांगताना निकाराग्वा या देशाच्या एका मुख्य अधिकाऱ्यानं म्हटलं: “भ्रष्टाचाराचं मूळ कारण म्हणजे समाज. समाजच भ्रष्ट असेल, तर सरकारी अधिकारी तरी कसे वेगळे असतील? शेवटी, तेही समाजाचाच भाग आहेत.”

तुम्हीही मान्य कराल की समाज भ्रष्ट असेल, तर त्यातून येणारं कोणतंही सरकार भ्रष्टच असेल. म्हणूनच, मानव समाजातून भ्रष्टाचारमुक्त सरकार येणं शक्य नाही; ते एका वेगळ्या माध्यमातून आलं पाहिजे. नेमक्या अशाच एका सरकारबद्दल बायबल आपल्याला सांगतं. ते म्हणजे देवाचं राज्य. हे तेच सरकार आहे ज्यासाठी येशूनं आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं होतं.—मत्तय ६:९, १०.

देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार असून ते स्वर्गातून राज्य करतं. लवकरच ते सर्व मानवी सरकारांची जागा घेईल. (स्तोत्र २:८, ९; प्रकटीकरण १६:१४; १९:१९-२१) देवाच्या राज्यात आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. त्यांपैकी एक आशीर्वाद म्हणजे, सरकारी भ्रष्टाचाराचं निर्मूलन. हे नक्कीच घडेल याची खातरी त्या राज्याच्या सहा वैशिष्ट्यांवरून आपल्याला मिळते.

१. ताकद

समस्या: मानवी सरकारं, जनतेकडून कराच्या किंवा शुल्काच्या रूपात मिळणाऱ्या पैशावर चालतात. काही अधिकाऱ्यांना, सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या या पैशावर हात मारण्याचा मोह होतो. तर काही जण, कर किंवा शुल्क चुकवणाऱ्यांकडून लाच घेतात. मग, या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकार करवाढ करतं आणि त्यामुळं भ्रष्टाचाराला आणखीनच खतपाणी मिळतं. हे दुष्ट चक्र असंच चालू राहतं. याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो प्रामाणिक लोकांना.

उपाय: देवाचं राज्य हे सर्वात शक्तिशाली देव, यहोवा याच्या ताकदीवर चालतं. * (प्रकटीकरण ११:१५) हे राज्य चालवण्यासाठी कुणाकडूनही कर किंवा शुल्क घेण्याची गरज पडत नाही. उलट, देवाच्या अमर्याद शक्तीमुळं आणि विशाल उदारतेमुळं आपल्याला याची खातरी मिळते की ते राज्य आपल्या प्रजेच्या सर्व गरजा अशा प्रकारे पूर्ण करेल, की त्यात कसलीच कमी पडणार नाही.—यशया ४०:२६; स्तोत्र १४५:१६.

२. राज्यकर्ता

समस्या: भ्रष्टाचार काढून टाकण्याचा प्रयत्न आधी “वरून” झाला पाहिजे, असं आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या सूझन रोझ-अॅकरमन यांचं म्हणणं आहे. पोलीस किंवा कस्टम अधिकारी यांच्यातला भ्रष्टाचार काढून टाकण्याचा सरकार प्रयत्न करतं, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार खपवून घेतं तेव्हा ते जनतेचा भरवसा गमावून बसतं. अगदी स्वच्छ कारभार करणारा मानवी राज्यकर्तासुद्धा कधी ना कधी चुकतोच; कारण आपण सगळेच मुळात चुका करणारे आहोत. बायबल म्हणतं: “सदाचाराने वागणारा . . . धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.”—उपदेशक ७:२०.

आजपर्यंत देण्यात आलेली सगळ्यात मोठी लाच येशूनं धुडकावून लावली

उपाय: पण देवाच्या राज्याचा राजा म्हणून ज्याला नियुक्त करण्यात आलं आहे तो येशू ख्रिस्त मानवी राज्यकर्त्यांपेक्षा अगदीच वेगळा आहे. त्याच्या हातून चुका होणं शक्यच नाही. असं आपण का म्हणू शकतो? जगाचा शासक असलेल्या सैतानानं एकदा त्याला “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देण्याचा प्रयत्न केला होता. इतकी मोठी लाच आजपर्यंत कुणीही कुणाला दिली नसेल! त्याच्या बदल्यात येशूला फक्त एकदाच सैतानाच्या पाया पडून त्याला नमन करायचं होतं. पण, येशूनं ती लाच धुडकावून लावली. (मत्तय ४:८-१०; योहान १४:३०) पुढं, वधस्तंभावर मरण-यातना सोसताना येशूला एक विशिष्ट पेय देण्यात आलं होतं. त्या पेयामुळं त्याला यातना जाणवल्या नसत्या आणि तो पूर्णपणे शुद्धीवर राहिला नसता. पण, शेवटपर्यंत प्रामाणिक राहण्याचा येशूचा निर्धार इतका पक्का होता, की त्यानं ते पेय नाकारलं. (मत्तय २७:३४) त्याचा मृत्यू झाल्यानंतर देवानं त्याला पुन्हा जिवंत केलं आणि आज तो स्वर्गात आहे. या सगळ्या गोष्टींवरून सिद्ध होतं, की राज्यकर्ता म्हणून येशूच योग्य आहे.—फिलिप्पैकर २:८-११.

३. स्थिरता

समस्या: अनेक देशांमध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. अशा वेळी जनतेला भ्रष्टाचारी अधिकाराऱ्यांना पदावरून काढून टाकण्याची संधी असते. पण, अगदी प्रगतिशील देशांमध्येसुद्धा निवडणुका आणि प्रचार यांतच भ्रष्टाचार होत असल्याचं दिसून येतं. अशा कार्यांसाठी लागणारा पैसा श्रीमंतांच्या खिशातून पुरवला जातो. या लोकांवरच, चालू आणि भावी सत्ताधाऱ्यांचं राजकीय भविष्य अवलंबून असतं.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन पॉल स्टिवन्स यांनी असं म्हटलं, की अशा बड्या लोकांच्या वशिलेबाजीमुळं “सरकारची योग्यता आणि दर्जाच फक्त धोक्यात येतो असं नाही, तर जनतेच्या विश्वासालाही तडा जातो.” म्हणूनच, राजकीय पक्ष सगळ्यात भ्रष्ट असतात असं जे अनेकांना वाटतं त्याचं आपल्याला आश्चर्य वाटू नये.

उपाय: देवाचं राज्य स्थिर आणि कायम टिकणारं आहे. त्याला प्रचाराची किंवा निवडणुकांची गरज नाही; त्यामुळं भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उरत नाही. (दानीएल ७:१३, १४) तसंच, ते जनतेच्या मतांवर अवलंबून नाही; आणि त्यास उलथवून टाकणंही जनतेच्या हातात नाही; कारण त्याच्या राज्यकर्त्याला देवानं निवडलं आहे. देवाचं राज्य स्थिर असल्यामुळं ते जे काही करेल ते नेहमी लोकांच्या हिताचंच असेल.

४. कायदे-कानून

देवाचं राज्य हे स्वर्गातून राज्य करणारं एक खरोखरचं सरकार आहे

समस्या: तुम्ही कदाचित विचार कराल, की नवीन कायदे लागू केल्यानं परिस्थिती बदलू शकते. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की जितके जास्त कायदे, तितका जास्त भ्रष्टाचार! शिवाय, भ्रष्टाचार रोखण्यासाठी बनवण्यात आलेले कायदे अंमलात आणल्यानं फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो.

उपाय: देवाच्या राज्याचे कायदे मानवी सरकारांनी बनवलेल्या कायद्यांपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहेत. उदाहरणार्थ, नियमांची लांबलचक यादी देण्याऐवजी येशूनं एकच नियम दिला, ज्याला सुवर्ण नियम असं म्हणतात. त्यानं म्हटलं: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) देवाच्या कायद्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात कृतीलाच नव्हे, तर हेतूंनाही महत्त्व आहे. उदाहरणार्थ, येशूनं म्हटलं: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्तय २२:३९) अर्थात, अशा आज्ञा देवच बनवू शकतो, कारण तो लोकांची मनं ओळखतो.—१ शमुवेल १६:७.

५. मानसिकता

समस्या: भ्रष्टाचाराची मूळ कारणं म्हणजे लोभ आणि स्वार्थ. हे गुण सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सर्रासपणे दिसून येतात. आधीच्या लेखात, मॉल कोसळलेल्या दुर्घटनेबद्दल जे सांगण्यात आलं होतं त्यात काय झालं ते लक्षात घ्या. बांधकामात उच्च प्रतीचा माल वापरणं आणि नियमांप्रमाणे बांधकाम करणं कॉन्ट्रॅक्टर्सना जास्त खर्चीक वाटलं; त्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांना पैसा चारण्याचा स्वस्त मार्ग त्यांनी निवडला!

त्यामुळं भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी मनात ठासून भरलेल्या लोभावर आणि स्वार्थावर मात करण्यास लोकांना शिकवणं गरजेचं आहे. पण, अशा प्रकारचा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याची मानवी सरकारांमध्ये ना इच्छा आहे, ना क्षमता.

उपाय: देवाचं राज्य भ्रष्टाचाराची मूळ कारणंच नाहीशी करतं. ते कसं? भ्रष्टाचाराला चालना देणारी मानसिकता बदलण्यास लोकांना शिकवण्याद्वारे. * या शिक्षणामुळं, त्यांना आपली मानसिकता बदलणं शक्य होतं. (इफिसकर ४:२३) लोभ आणि स्वार्थ याऐवजी, आहे त्यात समाधानी राहायला आणि दुसऱ्याचं हित पाहायला ते शिकतात.—फिलिप्पैकर २:४; १ तीमथ्य ६:६.

६. प्रजा

समस्या: परिस्थिती कितीही चांगली असली आणि लोकांना कितीही चांगलं नैतिक शिक्षण दिलं, तरी काही जण भ्रष्ट ते भ्रष्टच राहतील. त्यामुळं भ्रष्टाचार नाहीसा करणं मानवी सरकारांना अशक्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मानवी सरकार फार तर भ्रष्टाचाराचं प्रमाण आणि परिणाम कमी करू शकतात.

उपाय: द युनायटेड नेशन्स कन्वेंशन अगेंस्ट करपशन (जागतिक भ्रष्टाचारविरोधी ठराव) यात सांगितल्याप्रमाणे, भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी सरकारनं लोकांमध्ये “खरेपणा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना” वाढीस लावली पाहिजे. हे नक्कीच एक चांगलं पाऊल आहे. पण, या बाबतीत देवाचं राज्य एक पाऊल पुढं जातं. ते असे गुण केवळ वाढीस लावत नाही, तर आपल्या प्रजेत ते असलेच पाहिजेत अशी अपेक्षाही करतं. म्हणूनच बायबल म्हणतं की “लोभी” आणि “लबाड” लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही.—१ करिंथकर ६:९-११; प्रकटीकरण २१:८.

अशा उच्च नैतिक स्तरांचं पालन करणं लोकांना नक्कीच शक्य आहे. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांच्या उदाहरणावरून ते समजतं. आपल्याला पवित्र आत्म्याचं दान मिळावं म्हणून शिमोन नावाच्या एका व्यक्तीनं येशूच्या शिष्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ती साफ नाकारली आणि म्हटलं: “या आपल्या दुष्टतेचा पश्‍चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर.” आपली ही इच्छा किती चुकीची होती हे शिमोनाच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं शिष्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं.—प्रेषितांची कृत्ये ८:१८-२४.

देवाच्या राज्याची प्रजा बनण्यासाठी . . .

तुम्ही कोणत्याही देशाचे नागरिक असलात, तरी देवाच्या राज्याची प्रजा बनण्याची संधी तुम्हाला आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) लोकांना या संधीचा फायदा घेता यावा म्हणून जगभरात एक शैक्षणिक कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे मोफत गृह बायबल अभ्यास. हा अभ्यास दर आठवडी कमीत कमी दहा मिनिटांचा असू शकतो. तो कसा केला जातो हे दाखवायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंदच होईल. या अभ्यासातून तुम्हाला देवाच्या राज्यात मिळणाऱ्या अनेक आशीर्वादांविषयी शिकायला मिळेल. देवाचं राज्य सरकारी भ्रष्टाचार कसा काढून टाकेल हेही तुम्हाला शिकायला मिळेल. (लूक ४:४३) याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, कृपया तुमच्या भागात राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट द्या. ▪ (w15-E 01/01)

तुम्हाला मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे का?

^ परि. 8 बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.

^ परि. 22 उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या १ मे २००० च्या अंकातला, “आत्म्याच्या तलवारीने भ्रष्टाचाराशी लढणे,” हा लेख पाहा.