व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 बायबलने बदलले जीवन!

पृथ्वी एक नंदनवन बनेल या अभिवचनामुळं माझं जीवन बदललं

पृथ्वी एक नंदनवन बनेल या अभिवचनामुळं माझं जीवन बदललं
  • जन्म: १९७४

  • देश: लॅट्विया

  • माझा गतकाळ: धोकादायक मोटर-सायकल रेसिंगमध्ये भाग घेणारा

माझी पूर्व जीवनशैली:

माझा जन्म लॅट्विया देशाची राजधानी असलेल्या रीगा या शहरात झाला. आईनं माझं व माझ्या मोठ्या बहिणीचं संगोपन केलं. आई जरी कॅथलिक धर्म मानणारी असली, तरी आम्ही फक्त धार्मिक सुट्टीच्या दिवशीच चर्चला जायचो. देव आहे यावर माझा नेहमीच विश्वास होता; पण, तरुण असताना मी जगातील कितीतरी गोष्टींकडे आकर्षित झालो आणि त्या मिळवण्याचा मी प्रयत्न करू लागलो.

मी मोठा होत होतो तेव्हा आईच्या लक्षात आलं, की मी अगदी सहजपणे एखाद्या वस्तूचे भाग वेगळे करायचो आणि ते पुन्हा एकत्र जोडायचो. घरात अशा खूप साऱ्या वस्तू होत्या ज्यांना अशा प्रकारे वेगळं केलं जाऊ शकत होतं. म्हणून आई मला कधीही एकटं सोडायची नाही. माझ्या हातून एखादी वस्तू खराब होईल याची तिला नेहमी चिंता लागलेली असायची. त्यामुळं, तिनं मला एक खेळणं आणून दिलं जे मला खूप आवडलं. कारण, त्या खेळण्यातील भाग मी वेगळे करू शकत होतो आणि ते पुन्हा जोडू शकत होतो. या आवडीसोबतच मला मोटर-सायकल रेसिंगचंदेखील वेड लागलं. आईनं माझं नाव झॅल्टा मोपाट्स (सुवर्ण मोपेड) नावाच्या एका मोटर-सायकल रेसिंगमध्ये नोंदवलं. मी आधी हलक्या मोटर-सायकल रेसिंगमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, आणि नंतर अतिवेगवान अशा मोटर-सायकलींच्या रेसिंगमध्ये भाग घेऊ लागलो.

मी रेसिंग बाईक्स चालवण्यात तरबेज झालो आणि या वेगवान आणि धोकादायक खेळात खूप यशस्वी ठरलो. मी तीनदा विविध गटाच्या मोटर-सायकल रेसिंगसाठी असलेली लॅट्वियन चॅम्पियनशिप आणि दोनदा ‘बाल्टिक स्टेट्स चॅम्पियनशिप’ जिंकली.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

मी रेसिंग करियरच्या शिखरावर असताना माझी खास मैत्रीण एविया (जी नंतर माझी पत्नी बनली) यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आली. त्यांच्या एका प्रकाशनात बायबल अभ्यासाची विनंती करण्यासाठी एक कूपन दिलेलं होतं. तिनं ते कूपन भरून पाठवलं. त्यानंतर लवकरच दोन साक्षीदार स्त्रियांनी तिची भेट घेतली आणि ती त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागली. या बाबतीत माझी काहीही हरकत नव्हती; पण, त्या वेळी धार्मिक गोष्टींत मला मुळीच रस नव्हता.

काही काळानं, त्या साक्षीदारांनी एवियासोबत मलादेखील बायबल अभ्यासासाठी बसायला सांगितलं. त्यांच्या सांगण्यानुसार मी बसलो, आणि मी जे काही ऐकलं ते मला आवडलं. मला खासकरून जी गोष्ट आवडली होती, ती  म्हणजे पृथ्वी एक नंदनवन बनेल याविषयी बायबलमध्ये देण्यात आलेलं अभिवचन. उदाहरणार्थ, त्यांनी मला बायबलमधून स्तोत्र ३७:१०, ११ मध्ये असलेला उतारा दाखवला, ज्यात असं म्हटलं आहे: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” हे अभिवचन माझ्या मनाला भिडलं.

आध्यात्मिक गोष्टींबद्दलची माझी आवड पुढेही वाढत राहिली. मला हळूहळू याची जाणीव होऊ लागली की जगात कितीतरी खोट्या धार्मिक शिकवणी आहेत. पण, याच्या अगदी उलट, मी हे पाहून अत्यंत प्रभावित झालो, की बायबलच्या शिकवणी तर्कसंगत आणि सुस्पष्ट आहेत.

मी जसजसा बायबलचा अभ्यास करू लागलो, तसतसं मला शिकायला मिळालं, की यहोवा देवाच्या नजरेत जीवन खूप मौल्यवान आहे. (स्तोत्र ३६:९) याचा माझ्या रेसिंगवर परिणाम झाला. आता मी माझं जीवन धोक्यात घालू इच्छित नव्हतो. त्याऐवजी, मी आपल्या जीवनाद्वारे यहोवाचा महिमा करू इच्छित होतो. म्हणून, रेसिंगमुळं मिळणारं नाव, प्रसिद्धी आणि रेसिंगमधील रोमांच या गोष्टी आता मला महत्त्वाच्या वाटत नव्हत्या.

मला याची जाणीव झाली, की जीवन देणाऱ्या यहोवा देवाप्रती माझी काही जबाबदारी आहे

१९९६ मध्ये मी एस्टोनिया देशातील टालिन या शहरात भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो; पूर्वी मी ज्या स्टेडियमवर मोटार-सायकल रेसिंगमध्ये भाग घ्यायचो त्यापासून हे ठिकाण फारसं दूर नव्हतं. त्या अधिवेशनात मी पाहिलं, की वेगवेगळ्या देशांतील लोक एकमेकांसोबत मैत्रिभावानं आणि शांतीनं वागत होते. उदाहरणार्थ, एका साक्षीदार स्त्रीची पर्स हरवली होती. मला वाटलं, की तिला तिची पर्स कधीच सापडणार नाही. पण, लवकरच दुसऱ्या एका साक्षीदार स्त्रीला पर्स सापडली आणि तिनं ती परत केली; पर्समधील सर्व वस्तू जशाच्या तशा होत्या. हे पाहून मी अवाक झालो! आता मला कळलं, की यहोवाचे साक्षीदार खरोखरच बायबलमधील उच्च स्तरांनुसार जगतात. मी आणि एविया बायबल अभ्यासात प्रगती करत राहिलो, आणि १९९७ मध्ये आम्ही यहोवाचे साक्षीदार या नात्यानं बाप्तिस्मा घेतला.

मला काय फायदा झाला:

धोकादायक रेसिंगमुळं माझे काही मित्र मरण पावले आहेत. बायबलच्या अभ्यासाद्वारे मला याची जाणीव झाली, की जीवन देणाऱ्या यहोवा देवाप्रती माझी काही जबाबदारी आहे. कदाचित या जाणिवेमुळंच आज मी जिवंत आहे.

मला आणि एवियाला एक सुहक्क लाभला. आम्ही दोघांनी रीगामध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात पूर्ण वेळचे सेवक म्हणून चार वर्षं सेवा केली. आता आम्ही आनंदानं आमची मुलगी आलिसे हिचं संगोपन करत आहोत आणि तिला यहोवावर प्रेम करायला शिकवत आहोत. शिवाय, आठवड्यातून एकदा भाषांतर कार्यालयात काम करण्याचा सुहक्कदेखील मला लाभला आहे; मी तिथं गाड्या आणि बिघडलेल्या वस्तू दुरुस्त करतो. लहान असताना मी जी कौशल्ये शिकली होती त्यांचा वापर अशा उपयोगी कामांसाठी होत आहे याचा मला खूप आनंद होतो! हो, मी आजदेखील वसतूंचे भाग एकमेकांपासून वेगळे करत आहे आणि ते पुन्हा एकत्र जोडत आहे!

माझ्या कुटुंबासोबत मिळून एकमात्र खऱ्या देवाबद्दल इतरांना सांगण्याचा जो सुहक्क मला लाभला आहे त्याची मी विशेष कदर करतो. याचं सर्व श्रेय बायबलमधून शिकलेल्या गोष्टींनाच जाते. आज मी आनंदानं म्हणू शकतो, की पृथ्वी एक नंदनवन बनेल या अभिवचनामुळंच माझं जीवन पार बदलून गेलं! ▪ (w14-E 02/01)