व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 जीवन कथा

मी शारीरिक कमजोरीतून बळ मिळवण्याचा प्रयत्न करते

मी शारीरिक कमजोरीतून बळ मिळवण्याचा प्रयत्न करते

माझं शरीर नाजूक असून वजन फक्त २९ किलो आहे. मला व्हीलचेअरवर बसलेलं पाहून कोणालाही असंच वाटेल की माझ्यात बिलकूल शक्ती नाही. माझं शरीर दिवसेंदिवस जरी कमजोर होत असलं, तरी आंतरिक शक्ती मला जीवन जगण्यास मदत करते. ते कसं हे मी तुम्हाला सांगू इच्छिते.

चार वर्षांची असताना

लहानपणाचा विचार केल्यास, दक्षिण फ्रान्समधील एका खेड्यात जिथं माझे आईबाबा राहायचे तिथल्या गोड आठवणी माझ्या मनात दाटून येतात. माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक झोका बनवला होता. मला बागेत इकडेतिकडे पळायला खूप आवडायचं. १९६६ मध्ये यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले आणि माझ्या वडिलांसोबत बऱ्याच वेळेपर्यंत त्यांनी चर्चा केली. याच्या सात महिन्यांनंतरच माझ्या बाबांनी यहोवाचे साक्षीदार बनण्याचा निश्चय केला. त्यानंतर लवकरच माझी आई, बाबांच्या पावलांवर पाऊल ठेवून यहोवाची साक्षीदार बनली. आणि अशा प्रकारे मी एका प्रेमळ कौटुंबिक वातावरणात लहानाची मोठी झाले.

माझे आईबाबा मुळात स्पेनचे. आम्ही स्पेनला परतल्याच्या काही काळानंतर माझ्या शारीरिक समस्या सुरू झाल्या. माझ्या हातांत आणि घोट्यांत तीव्र वेदना होऊ लागल्या. दोन वर्षं बऱ्याच डोक्टरांना दाखवल्यानंतर, एका नामवंत वातविकार तज्ज्ञानं असं म्हटलं: “आता खूप उशीर झाला आहे.” हे ऐकून माझी आई रडू लागली. “ऑटोइम्यून क्रोनिक इलनेस” व “ज्युवनाईल पॉलीआर्थरायटिस” * अशी विचित्र नावं माझ्या कानावर पडू लागली. मी दहा वर्षांची असल्यामुळं मला काहीच कळत नव्हतं, पण आपल्याला काहीतरी मोठा आजार झाला आहे हे मला जाणवलं.

डॉक्टरांनी सांगितलं की उपचारासाठी मला लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. मी जेव्हा तिथं पोहचले तेव्हा ती इमारत पाहून खूप घाबरून गेले. तिथं कडक शिस्त होती. तिथं असलेल्या नन्सनं माझे केस कापले आणि मला गबाळे कपडे घातले. मी रडकुंडीला आले व विचार करू लागले की ‘मी इथं जीवन कसं जगणार?’

यहोवा माझ्यासाठी एक खरी व्यक्ती बनली

माझ्या आईबाबांनी मला यहोवाची सेवा करण्यास शिकवलं होतं म्हणून त्या कॅथलिक हॉस्पिटलच्या प्रथांमध्ये सहभाग घेण्यास मी नकार द्यायचे. पण मी असं का करायचे हे तिथल्या नन्सला समजायचं नाही. ‘मला सोडू नको’ अशी कळकळीनं मी यहोवाला विनंती करायचे. आणि लवकरच मला जाणवू लागलं की एक प्रेमळ पिता जसा आपल्या मुलाला मिठीत घेतो तसं यहोवानं मला आपल्या सुरक्षित बाहूंमध्ये घेतलं आहे.

माझे आईबाबा मला शनिवारी काही वेळासाठी भेटायला येऊ शकत होते. जेव्हा ते यायचे तेव्हा वाचण्यासाठी ते बायबल प्रकाशनं आणायचे. यामुळं माझा विश्वास आणखी मजबूत झाला. सहसा त्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना स्वतःची पुस्तकं आणण्याची परवानगी नव्हती. मी दररोज बायबल वाचायचे म्हणून नन्सनी  मला ही प्रकाशनं माझ्या बायबलसोबत ठेवण्याची परवानगी दिली. मी इतर मुलींना सदासर्वकाळ जीवन जगण्याच्या आशेविषयी आणि जिथं कोणीही आजारी पडणार नाही अशा पृथ्वीवरील नंदनवनाविषयी सांगायचे. (प्रकटीकरण २१:३, ४) केव्हाकेव्हा मला खूप दुःखी व एकटं वाटायचं, पण तरीसुद्धा यहोवावरील माझा विश्वास दिवसेंदिवस आणखी मजबूत होऊ लागला आहे या गोष्टीमुळं मी खूप खूश होते.

सहा महिन्यांच्या दीर्घकाळानंतर डॉक्टरांनी मला घरी पाठवलं. माझा आजार बरा झाला नव्हता, पण आता आईबाबांसोबत राहता येईल या गोष्टीमुळं मी खूप आनंदी होते. माझे सांधे आणखीनच सुजू लागले आणि मला जास्त वेदना होऊ लागल्या. मी किशोरवयात पदार्पण केलं तोपर्यंत मी खूपच अशक्त झाले होते. तरीसुद्धा, आपल्या स्वर्गातील पित्याची होता होईल तितकी सेवा करण्याचा मी दृढनिश्चय केला आणि वयाच्या १४ व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. पण, मी कधीकधी त्याच्यावर नाराज व्हायचे. मी प्रार्थनेत त्याला म्हणायचे: “मलाच हा आजार का? प्लीज मला बरं कर. मला किती वेदना होत आहेत हे तुला जाणवत नाही का?”

किशोरावस्थेतील काळ हा माझ्यासाठी फार कठीण होता. कारण, मी केव्हाच बरी होणार नाही या गोष्टीचा स्वीकार करून मला जीवन जगावं लागणार होतं. मी स्वतःची तुलना माझ्या सुदृढ मित्रमैत्रिणींशी करू लागले जे आनंदी जीवन जगत होते. मी इतरांसारखी नाही म्हणून मला स्वतःबद्दल कमीपणा वाटायचा आणि त्यामुळं मी शांत शांत राहू लागले. पण, माझ्या कुटुंबानं व मित्रमैत्रिणींनी माझी साथ केव्हाही सोडली नाही. आलीस्या जी माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठी आहे, तिला मी कधीच विसरू शकत नाही. कारण, ती माझी एक खरी मैत्रीण बनली. तिनं मला माझ्या आजाराबद्दल विचार करण्याऐवजी आणि स्वतःच्या समस्यांबद्दल सतत कुढत बसण्याऐवजी इतरांमध्ये आवड दाखवण्यास मदत केली.

अर्थपूर्ण जीवन जगता यावं म्हणून मी काही मार्ग शोधू लागले

जेव्हा मी १८ वर्षांची होते तेव्हा मला आणखी जास्त त्रास होऊ लागला. ख्रिस्ती सभांना गेल्यामुळंसुद्धा मला खूप थकवा यायचा. अशा परिस्थितीतदेखील मी माझ्या फावल्या वेळेचा उपयोग करून बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करायचे. बायबलमधील ईयोब व स्तोत्र या दोन पुस्तकांमधून मला ही गोष्ट शिकायला मिळाली की सध्या यहोवा देव आपली शारीरिक रीत्या नव्हे तर आध्यात्मिक रीत्या काळजी घेतो. मी सतत यहोवा देवाला प्रार्थना करत असल्यामुळं मला सहन करण्याची शक्ती आणि “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” अनुभवायला मिळाली.—२ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:६, ७.

वयाच्या २२ व्या वर्षी मला ही गोष्ट स्वीकारावीच लागली की मी आता कायमची व्हीलचेअरला खिळलेली राहणार. लोक माझ्याकडे व्हीलचेअरवर बसलेली एक आजारी स्त्री या दृष्टिकोनातून पाहतील अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. पण, व्हीलचेअरमुळं मी काही प्रमाणात स्वतंत्र होते. सुरुवातीला मला असं वाटलं की व्हीलचेअरवरचं जीवन जगणं खूप वाईट असेल, पण खरं पाहता तो एक आशीर्वाद ठरला. ईसाबेल नावाच्या माझ्या एका मैत्रिणीनं असं सुचवलं की मी तिच्यासोबत एका महिन्यासाठी प्रचार कार्यात ६० तास खर्च करण्याचं ध्येय ठेवावं.

तिनं असं म्हटलं तेव्हा हा वेडेपणा आहे असं मला वाटलं. पण मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि माझ्या कुटुंबाच्या व मित्रमैत्रिणींच्या साहाय्यानं मी हे ध्येय गाठू शकले. तो व्यस्त महिना भरभर निघून गेला. तेव्हा मला जाणीव झाली की मी माझ्या भीतीवर व अडथळ्यांवर मात केली आहे. मला त्या महिन्यात इतका आनंद मिळाला होता की १९९६ मध्ये मी एक सामान्य पायनियर बनण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ मला सेवाकार्यात दर महिन्याला ९० तास भरावे लागणार होते. माझा हा निर्णय सर्वोत्तम होता कारण यामुळं देवासोबतचा माझा नातेसंबंध आणखी मजबूत झाला आणि मला शारीरिक शक्तीही मिळाली. सेवाकार्यात भाग घेतल्यामुळं मी अनेक लोकांना माझ्या विश्वासाबद्दल सांगू शकले आणि काही लोकांना देवाचे मित्र बनण्यासही मदत करू शकले.

यहोवानं माझी काळजी घेतली

२००१ च्या उन्हाळ्यात एका मोठ्या कार अपघातात माझे दोन्ही पाय मोडले. हॉस्पिटलमधील पलंगावर मला तीव्र वेदना होत होत्या, तेव्हा मी मनातल्या मनात यहोवाला कळकळीनं अशी प्रार्थना केली: “यहोवा प्लीज मला सोडू नको.” माझी प्रार्थना संपताच जवळच्याच पलंगावर असलेल्या एका स्त्रीनं मला विचारलं, “तू एक यहोवाची साक्षीदार आहेस का?” माझ्याजवळ उत्तर द्यायचीसुद्धा शक्ती नव्हती म्हणून मी मान हालवून हो म्हणाले. त्यावर ती म्हणाली, “मला तुम्हा लोकांबद्दल माहीत आहे. तुमची मासिके मी वाचते.” ते शब्द ऐकून मला खूप सांत्वन मिळालं. अशा दयनीय स्थितीतही मी यहोवाबद्दल साक्ष देऊ शकले. खरंच, किती मोठा सन्मान!

जेव्हा मला थोडं बरं वाटायला लागलं तेव्हा मी आणखी काही जणांना साक्ष देण्याचं ठरवलं. माझ्या दोन्ही पायांना प्लास्टर लावलं होतं. तरीसुद्धा मी व्हीलचेअरवर बसायचे आणि आई मला हॉस्पिटलमधील इतर रुग्णांकडे घेऊन जायची. दररोज आम्ही काही रुग्णांना जाऊन भेटायचो, त्यांची विचारपूस करायचो आणि त्यांना काही बायबल आधारित प्रकाशनं द्यायचो. अशा भेटी केल्यामुळं मी खूप थकून जायचे, पण यहोवा देवानं मला आवश्यक असलेलं बळ दिलं.

२००३ साली माझ्या आईबाबांसोबत

अलीकडच्या काही वर्षांत माझं दुखणं खूप वाढलं आहे. आणि  बाबांच्या मृत्यूमुळं माझ्या दुःखात आणखी भर पडली आहे. तरीसुद्धा मी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करते. तो कसा? जेव्हा केव्हा शक्य असते तेव्हा मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत व नातेवाइकांसोबत राहण्याचा प्रयत्न करते. यामुळं मला माझ्या समस्यांबद्दल विचार न करण्यास मदत मिळते. आणि जेव्हा मी एकटी असते तेव्हा मी बायबलचं वाचन व अभ्यास करते किंवा मग फोनवरून इतरांना प्रचार करते.

मी केव्हाकेव्हा माझे डोळे बंद करते आणि देवानं दिलेल्या नवीन जगाबद्दलच्या अभिवचनाविषयी विचार करते

मी छोट्या छोट्या गोष्टींचाही आनंद घेते. उदाहरणार्थ, हवेची झुळूक, फुलांचा सुवास मला खूप आवडतो. अशा लहानसहान गोष्टींबद्दल मी यहोवाचे आभार मानते. विनोदी स्वभाव असणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. एकदा प्रचार कार्यात असताना, माझी मैत्रीण माझी व्हीलचेअर ढकलत होती तेव्हा ती काही नोंदी घेण्यासाठी थांबली. रस्ता उतार असल्यामुळं माझी व्हीलचेअर अगदी जोरात जाऊन पार्क केलेल्या एका कारला धडकली. आम्ही दोघीही घाबरून गेलो, पण काहीही गंभीर घडलं नाही असं जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला हसूच आवरेना.

जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी करू शकत नाही. मी त्यांना माझ्या अपूर्ण इच्छा असं म्हणते. मी केव्हाकेव्हा माझे डोळे बंद करते आणि देवानं दिलेल्या नवीन जगाबद्दलच्या अभिवचनाविषयी विचार करते. (२ पेत्र ३:१३) त्या नवीन जगात माझं आरोग्य चांगलं आहे, मी चालू शकत आहे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे अशी मी कल्पना करते. दावीद राजाचे पुढील शब्द मला मनापासून आवडतात: “परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर.” (स्तोत्र २७:१४) जरी माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत असलं, तरीसुद्धा माझ्या कमजोर स्थितीतही मी बळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यहोवा मला मदत करत आहे. ▪ (w14-E 03/01)

^ परि. 6 ज्युवनाईल पॉलीआर्थरायटिस हा एक दीर्घकालिक स्वरूपाचा वातविकार आहे जो लहान मुलांना होतो. यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींवर हल्ला करते व त्यांचा नाश करते; त्यामुळे सांधे सुजतात आणि खूप वेदना होतात.