व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मलेरिया—कसं वाचवाल स्वतःला या जीवघेण्या रोगापासून?

मलेरिया—कसं वाचवाल स्वतःला या जीवघेण्या रोगापासून?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१३ साली, अंदाजे १९,८०,००,००० पेक्षा अधिक लोकांना मलेरियाची लागण झाली होती आणि अंदाजे ५,८४,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मरण पावलेल्या लोकांमध्ये जवळजवळ ८३ टक्के मुलं होती जी पाच वर्षांखालील होती. जगभरातल्या जवळजवळ शंभरएक देशांत या रोगाचा धोका असल्यामुळं, ३,२०,००,००,००० लोकांचा जीव धोक्यात आहे.

१ मलेरिया म्हणजे काय?

मलेरियाला मराठीत हिवताप म्हटलं जातं. हा आजार जिवाणूंमुळं होतो. ताप, थंडी भरणं, घाम फुटणं, डोकंदुखी, अंगदुखी, मळमळ आणि उलट्या ही मलेरियाची लक्षणं आहेत. मलेरियाच्या कोणत्या जिवाणूंची लागण झाली आहे आणि ती किती काळापासून झाली आहे त्यानुसार ४८ ते ७२ तासांच्या काळांत ही लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये पुन्हा पुन्हा दिसतात.

२ हा रोग कसा पसरतो?

  1. अॅनॉफिलिस जातीच्या मादी डासानं चावल्यामुळं प्लाझमोडिया नावाचे मलेरियाचे जिवाणू माणसांच्या रक्तात शिरतात.

  2. हे जिवाणू रक्तातून यकृतात प्रवेश करतात आणि इथं या जिवाणूची संख्या वाढते.

  3. यकृतातील एखादी पेशी फुटते तेव्हा हे जिवाणू बाहेर पडतात आणि लाल रक्तपेशींत प्रवेश करतात. आणि लाल रक्तपेशींमध्ये यांची संख्या वाढू लागते.

  4. एखादी लाल रक्तपेशी फुटते तेव्हा त्यातून हे जिवाणू बाहेर पडून इतर लाल रक्तपेशींवर हल्ला करतात.

  5. लाल रक्तपेशींवरचा हल्ला होणं व त्यांचं फुटणं हे सतत चालू राहतं. मलेरियाची लागण झालेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशी जेव्हा जेव्हा फुटतात तेव्हा तेव्हा मलेरियाची लक्षणं दिसून येतात.

३ स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करू शकता?

मलेरियाचे जास्त रूग्ण असलेल्या देशांत तुम्ही राहत असाल तर . . .

  • मच्छरदाणी वापरा. या मच्छरदाणीवर

    • औषधं फवारलेली असावीत.

    • तिला छिद्रं किंवा ती कुठंही फाटलेली नसावी.

    • मच्छरदाणी बांधल्यावर तिच्या कडा गादीखाली व्यवस्थित खोचाव्यात.

  • मच्छरांसाठी असलेल्या औषधांचा घरात फवारा मारावा.

  • शक्य असेल तर, दारांना व खिडक्यांना जाळी बसवून घ्यावी. आणि, एसी व पंख्यांचा वापर करावा. यामुळं मच्छर अंगावर बसणार नाहीत.

  • अंग पूर्ण झाकेल अशा प्रकारचे सौम्य रंगाचे कपडे घालावेत.

  • डास सहसा दाट झाडींवर जमतात आणि साठलेल्या पाण्याच्या डबक्यात त्यांची पैदास होत असते. तेव्हा, शक्य असेल तर अशा दाट झाडीजवळ किंवा पाण्याच्या डब्यक्यांजवळ जायचं टाळा.

  • तुम्हाला मलेरिया झाला असेल तर लगेच औषधोपचार घ्या.

मलेरियाचे जास्त रूग्ण असलेल्या देशांत जाण्याची तुम्ही योजना करत असाल तर . . .

  • निघण्याआधी त्या देशातली सध्याची माहिती काढा. मलेरियाचे वेगवेगळे जिवाणू असल्यामुळं, एका भागात एका प्रकारच्या जीवाणूंचा उपद्रव जास्त असेल तर दुसऱ्या भागात दुसऱ्या जीवाणूंचा. त्यामुळं त्यानुसार तुम्हाला औषधं सोबत घ्यावी लागतील. शिवाय, तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही कोणकोणत्या गोष्टींत खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता.

  • मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांत कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासंबंधानं या लेखात दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन करा.

  • तुम्हाला मलेरिया झालाच तर लगेचच औषधोपचार सुरू करा. जिवाणूंची लागण होऊन एक ते चार आठवडे झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसू लागतात. ▪ (g15-E 07)