व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय म्हणतं?

सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?

सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?

भेदभाव न करता इतरांचा स्वीकार केल्यानं, त्यांना क्षमा केल्यानं व सहनशीलता दाखवल्यानं आपापसात शांतीमय नातेसंबंध टिकवून ठेवता येतात. पण मग आपण कुठवर सहनशीलता दाखवू शकतो?

सहनशीलता दाखवण्याचं मुख्य कारण

आजची परिस्थिती:

संपूर्ण जगभरातच लोक एकमेकांबरोबर जुळवून घ्यायला तयार नसल्याचं आपण पाहतो. त्यात वंश व जाती भेद, राष्ट्रवाद आणि धर्मभेद यांमुळे परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे.

बायबल काय म्हणतं?

येशू ख्रिस्त पृथ्वीवर सेवा करत असताना परिस्थिती काही वेगळी नव्हती. तेव्हाही लोक एकमेकांचा द्वेष करायचे. खासकरून यहूदी आणि शोमरोनी लोकांत ३६ चा आकडा होता. (योहान ४:९) स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी समजलं जायचं. यहूदी धार्मिक नेते साधारण लोकांना तुच्छ लेखायचे. (योहान ७:४९) पण येशू ख्रिस्त या लोकांपासून अगदी वेगळा होता. तो “पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो,” असं त्याचे विरोधक म्हणायचे. (लूक १५:२) तो दयाळू व सहनशील होता. कारण तो पृथ्वीवर लोकांचा न्याय करायला नव्हे तर त्यांना देवाबद्दल शिकवायला आला होता. आणि हे सर्व तो खरंतर लोकांबद्दल प्रेम होतं म्हणून करत होता.—योहान ३:१७; १३:३४.

सहनशीलता दाखवण्यात येशूनं सर्वोत्तम उदाहरण मांडलं. तो पृथ्वीवर लोकांचा न्याय करायला नव्हे तर त्यांना देवाबद्दल शिकवायला आला होता

आपल्यालादेखील लोकांबद्दल प्रेम असेल तर आपण सहनशीलता दाखवू. त्यांच्याशी जुळवून घेऊ. त्यांच्या हातून चुका झाल्या, त्यांचा स्वभाव विचित्र असला तरी आपण त्यांच्याबाबतीत सहनशीलता दाखवू. बायबलमधील कलस्सैकर ३:१३ या वचनात असं म्हटलं आहे: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.”

“मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते.”१ पेत्र ४:८.

पण सहनशीलता दाखवणं म्हणजे खपवून घेणं असं आहे का?

आजची परिस्थिती:

आज अनेक समाजात कायदा व व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळं, लोकांच्या वागणुकीवर वाजवी प्रमाणात बंधनं येतात.

बायबल काय म्हणतं?

प्रीती किंवा प्रेम “गैरशिस्त वागत नाही.” (१ करिंथकर १३:५) सहनशीलता दाखवण्यात येशूनं सर्वोत्तम उदाहरण मांडलं असलं तरी त्यानं गैरशिस्त, ढोंगीपणा किंवा इतर प्रकारचा दुष्टपणा खपवून घेतला नाही. उलट अशा गोष्टींचा त्यानं कडाडून विरोध केला. (मत्तय २३:१३) “जो कोणी वाईट कृत्ये करतो तो [सत्याच्या] प्रकाशाचा द्वेष करतो.”—योहान ३:२०.

येशूचं अगदी जवळून अनुकरण करणाऱ्या त्याच्या एका प्रेषितानं अर्थात पौलानं असं लिहिलं: “वाइटाचा वीट माना; बऱ्याला चिकटून राहा.” (रोमकर १२:९) त्यानं जसं लिहिलं तसं तो वागलादेखील. उदाहरणार्थ, काही यहूदी ख्रिश्चन, येशूचे शिष्य बनलेल्या गैरयहूद्यांबरोबर संगती करत नसत. आधी यहूदी असलेल्या पौलाच्या हे लक्षात आल्यावर त्यानं अगदी ठाम परंतु प्रेमळपणे या यहूदी ख्रिश्चनांना त्यांची चूक दाखवून दिली. (गलतीकर २:११-१४) त्याला माहीत होतं, की यहोवा देव “पक्षपाती नाही,” आणि तो आपल्या लोकांत कोणत्याही प्रकारचा जातीभेद खपवून घेत नाही.—प्रेषितांची कृत्ये १०:३५.

खरे ख्रिस्ती असलेले यहोवाचे साक्षीदार बायबलमधून सल्ला व मार्गदर्शन मिळवतात. (यशया ३३:२२) त्यामुळं त्यांच्यातील कुणीच दुष्टपणा खपवून घेत नाहीत. देवाच्या स्तरांनुसार वागत नसलेल्या लोकांना त्यांच्या मंडळ्यांतून काढून टाकलं जातं. कारण ही ख्रिस्ती मडंळी शुद्ध आहे आणि अशा लोकांनी ती भ्रष्ट होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. त्यामुळं यहोवाचे साक्षीदार, “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या,” या बायबलमधील सल्ल्याचं पालन करतात.—१ करिंथकर ५:११-१३.

“अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा.”स्तोत्र ९७:१०.

पण मग जगात चाललेली दुष्टाई देव कुठवर सहन करत राहील?

लोक काय म्हणतात?

मानवाचा स्वभाव आणि विचार जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत जगात दुष्टाई राहील.

बायबल काय म्हणतं?

हबक्कूक नावाचा यहोवा देवाचा एक संदेष्टा होता. त्यानं एकदा यहोवाला प्रार्थनेत विचारलं, की तो जुलूम का खपवून घेत आहे. आणि त्याला म्हटलं: “लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.” (हबक्कूक १:३) यहोवा देवानं आपल्या संदेष्ट्याच्या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. त्यानं त्याला वचन दिलं, की तो दुष्टांना त्यांच्या कृत्यांचा जाब नक्की विचारेल आणि तो दिवस लवकरच येईल, “त्याला विलंब लागावयाचा नाही.”—हबक्कूक २:३.

पण तो दिवस येईपर्यंत या दुष्ट लोकांना स्वतःमध्ये बदल करण्याची एक संधी दिली जात आहे. कारण, “दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष” होत नाही का? असं यहोवा म्हणतो. (यहेज्केल १८:२३) आपले वाईट मार्ग सोडून जे यहोवाचा शोध घेतात त्यांना भविष्यात एक चांगली आशा मिळू शकते. बायबलमधील नीतिसूत्रे १:३३ या वचनात म्हटलं आहे: “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”

लवकरच “दुर्जन नाहीसा होईल; . . . लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतसुखाचा उपभोग घेतील.”स्तोत्र ३७:१०, ११. ▪ (g15-E 08)