व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिली गोष्ट

आत्मसंयम बाळगण्याचे फायदे

आत्मसंयम बाळगण्याचे फायदे

आत्मसंयम म्हणजे काय?

आत्मसंयम या गुणामध्ये पुढील पैलूंचा समावेश होतो:

  • गोष्टी मिळण्यासाठी थांबून राहणं

  • आपल्या इच्छांवर आळा घालणं

  • न आवडणारी कामं पूर्ण करणं

  • आपल्यापेक्षा इतरांना आणि त्यांच्या गरजांना जास्त महत्त्व देणं

आत्मसंयम असणं महत्त्वाचं का आहे?

ज्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आत्मसंयम हा गुण असतो ते मोहाचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात; जरी त्या मोहामुळे क्षणिक आनंद मिळत असला तरीही. याउलट, ज्या मुलांमध्ये हा गुण कमी प्रमाणात असतो ती सहसा मोठी झाल्यावर,

  • रागीट बनतात

  • त्यांना नैराश्‍य येतं

  • त्यांना दारू, सिगरेट किंवा ड्रग्सचं व्यसन लागतं

  • त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसतात

एका अभ्यासानुसार ज्या मुलांमध्ये आत्मसंयमाचा गुण जास्त प्रमाणात असतो त्यांना मोठं होऊन शारीरिक आणि आर्थिक समस्या कमी प्रमाणात सहन कराव्या लागू शकतात. तसंच, ते नियमांनुसार चालणारेदेखील बनतात. या अभ्यासावरून यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया याच्या प्राध्यापिका अँजेला डकवर्थ यांनी निष्कर्ष काढला की, “आत्मसंयम बाळगणं कधीच हानिकारक नसतं.”

मुलांना आत्मसंयम बाळगण्यासाठी कसं शिकवावं?

‘नाही’ म्हणायला शिका आणि त्यानुसार वागा.

बायबल तत्त्व: “त्यामुळे तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं.”—मत्तय ५:३७.

लहान मुलं सर्वांसमोर हट्ट करून किंवा रडून आईवडिलांच्या धीराची परीक्षा घेऊ शकतात. जर आईवडिलांनी त्यांच्यासमोर हात टेकले तर मुलांना वाटेल की आपण असं दर वेळी केलं तर आपले सर्व हट्ट पूर्ण केले जातील.

दुसरीकडे पाहता, जर आईवडिलांनी मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला नाही तर त्यांना जीवनाचं एक मूलभूत सत्य समजेल ते म्हणजे, आपल्याला जे हवं असतं ते नेहमीच मिळत नाही. डॉक्टर डेवीड वॉल्श म्हणतात: “ज्यांनी हा धडा शिकला आहे ते त्या लोकांपेक्षा जास्त सुखी असतात ज्यांना जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतात. आपण मुलांना जेव्हा सांगतो की हव्या असलेल्या सर्वच गोष्टी त्यांना मिळतील तेव्हा आपण खरंतर त्यांच्या भल्याचा विचार करत नसतो.” *

तुम्ही जर तुमच्या मुलाला आज नाही म्हटलं, तर त्याला मोठं झाल्यावर वाईट गोष्टींना नाही म्हणायला सोपं जाईल. उदाहरणार्थ, ड्रग्सचं सेवन करणं, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं किंवा इतर नुकसानदायक गोष्टी करणं यांना तो नकार देईल.

मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टींचे परिणाम समजण्यासाठी मदत करा.

बायबल तत्त्व: “कारण एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.”—गलतीकर ६:७.

आपल्या वागण्या-बोलण्याच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आत्मसंयम बाळगला नाही तर त्याचे वाईट परिणाम घडू शकतात हे तुमच्या मुलांनी समजणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाला वाईट वाटल्यावर लगेच राग येत असेल तर इतर जण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. पण याउलट इतरांनी त्याला चिथवण्याचा प्रयत्न केला असताना, त्याने जर स्वतःवर ताबा ठेवला किंवा मध्येच बोलण्याऐवजी समोरच्याचं धीराने ऐकून घेतलं तर लोक त्याला पसंत करतील. तुमच्या मुलाने आत्मसंयम बाळगला तर सहसा त्याचे चांगले परिणाम घडून येतील हे त्याला समजायला मदत करा.

कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत हे आपल्या मुलांना शिकवा.

बायबल तत्त्व: “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”—फिलिप्पैकर १:१०.

आत्मसंयम म्हणजे फक्‍त वाईट गोष्टी करण्यापासून स्वतःला रोखणं असं नाही तर गरजेच्या गोष्टी करणंदेखील त्यात सामील आहे; मग त्या गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरीही. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे ठरवणं आणि त्या गोष्टी आधी करणं हे तुमच्या मुलांनी शिकणं महत्त्वाचं आहे. जसं की, खेळ आणि होमवर्क यांपैकी त्याने आधी होमवर्क पूर्ण केला पाहिजे.

चांगलं उदाहरण मांडा.

बायबल तत्त्व: “जसं मी तुमच्यासाठी केलं, तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे.”—योहान १३:१५.

हे लक्षात असू द्या की चीड किंवा राग आणणाऱ्‍या परिस्थितीत तुम्ही कसे वागता हे तुमची मुलं पाहतात. तेव्हा अशा परिस्थितीत आत्मसंयम बाळगल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतात हे तुमच्या मुलांना पाहू द्या. उदाहरणार्थ, तुमची मुलं तुमच्या सहनशक्‍तीचा अंत पाहतात तेव्हा तुम्ही रागवता की शांत राहता?

^ परि. 20 हे वाक्य, आईवडील ‘नाही’ म्हणायला कसं शिकू शकतात याविषयावर आधारित असलेल्या एका पुस्तकातलं आहे.