व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलाखत | फॅन यू

एक सॉफ्टवेअर इंजीनियर आपल्या विश्वासांबद्दल सांगतात

एक सॉफ्टवेअर इंजीनियर आपल्या विश्वासांबद्दल सांगतात

डॉ. फॅन यू यांनी बेइजिंगजवळच्या ‘चायना इन्सटिट्यूट ऑफ अॅटॉमिक एनर्जी’ इथे गणिती संशोधक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्या वेळी ते नास्तिक होते आणि त्यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांतावर विश्वास होता. पण डॉ. यू आता असा विश्वास करतात, की देव आपला निर्माणकर्ता आहे आणि त्यानेच जीवसृष्टीची रचना केली आहे. सावध राहा! या मासिकाच्या प्रतिनिधींनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना त्यांच्या विश्वासांबद्दल विचारलं.

तुमच्या पार्श्‍वभूमीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का?

१९५९ साली, चायनाच्या जियांगशी प्रांतातल्या फूचौ शहरात माझा जन्म झाला. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा संपूर्ण देशात एका क्रांतीचे परिणाम दिसत होते. त्या क्रांतीला आज सांस्कृतिक क्रांती (कल्चरल रेव्हल्यूशन) म्हणून ओळखलं जातं. माझे वडील सिव्हिल इंजीनियर होते. त्यांना दूर एका ओसाड ठिकाणी रेल्वे-मार्ग बनवण्याचं काम करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यामुळे, ते आम्हाला भेटायला वर्षातून फक्त एकदाच येऊ शकत होते आणि असं कितीतरी वर्षं चाललं. त्या वेळी मी माझ्या आईसोबत राहत होतो. ती एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. खरंतर आम्ही त्याच शाळेत राहायचो, जिथे ती शिक्षिका होती. १९७० साली आम्हाला लींचवॉन इथे जावं लागलं. आम्ही त्या जिल्ह्यात युफान नावाच्या एका खेडे गावात राहू लागलो. तिथले लोक खूप गरीब होते आणि तिथे खाण्या-पिण्याच्या गोष्टींचीही कमी होती.

तुमच्या कुटुंबाचा काय विश्वास होता?

माझ्या वडिलांना धर्मात किंवा राजकारणात काहीच आवड नव्हती. माझी आई बौद्ध धर्म मानायची. जीवन नैसर्गिक प्रक्रियेने अस्तित्वात आलं आहे, असं आम्हाला शाळेत शिकवलं जायचं. शाळेत जे शिकवलं जायचं त्यावर माझा विश्वास होता.

तुम्हाला गणित का आवडू लागलं?

गणितात तर्काच्या आधारावर योग्य निष्कर्षावर पोचलं जातं. याच कारणामुळे मला गणित आवडू लागलं. १९७६ साली सांस्कृतिक क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या माओ त्झ-तोंग यांचा मृत्यू झाला. त्याच्या काही काळानंतर मी विद्यापीठात शिकायला गेलो. माझा मुख्य विषय गणित होता. विद्यापीठातून मला पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर मी नोकरी करू लागलो. माझं पहिलं काम होतं अणू-ऊर्जा निर्माण करण्याच्या विज्ञानाशी संबंधित असलेलं संशोधन करणं.

बायबलबद्दल सुरुवातीला तुमचं काय मत होतं?

१९८७ साली मी अमेरिकेतील टेक्ससमधल्या ‘ए अॅन्ड एम’ विद्यापिठात डॉक्टरेटची पदवी मिळवण्यासाठी आलो. अमेरिकेतले बरेच लोक देवावर विश्वास ठेवतात आणि बायबल वाचतात ही गोष्ट मला माहीत होती. मी हेसुद्धा ऐकलं होतं, की बायबलमध्ये व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मी बायबल वाचण्याचा विचार केला.

बायबल वाचन सुरू केल्यानंतर बायबलच्या शिकवणी मला व्यावहारिक वाटल्या. पण, बायबलमधले काही भाग मला समजायला अवघड वाटले. त्यामुळे मी बायबल वाचण्याचं थांबवलं.

बायबलविषयी तुम्हाला पुन्हा एकदा आवड कशी निर्माण झाली?

आपला एक निर्माणकर्ता आहे ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती.

१९९० साली एक यहोवाची साक्षीदार आमच्या घरी आली. तिने मला सांगितलं, की मानवांना भविष्यात एक चांगलं जीवन मिळेल असं बायबल सांगतं. मग, मला बायबल समजण्यास मदत करण्यासाठी तिने एका जोडप्याला माझ्या घरी पाठवलं. नंतर, माझी पत्नी लीपिनसुद्धा बायबल अभ्यास करू लागली. ती आधी चायनामधल्या एका माध्यमिक शाळेत भौतिकशास्त्र शिकवायची आणि तीही माझ्यासारखी एक नास्तिक होती. जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल बायबल जे सांगतं ते आम्ही शिकलो. आपला एक निर्माणकर्ता आहे ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. त्यामुळे मी स्वतःच या विषयावर संशोधन करण्याचं ठरवलं.

तुम्ही संशोधन कसं केलं?

एक गणितज्ञ म्हणून घटनांच्या संभाव्यतेची गणना करण्याचं मला प्रशिक्षण मिळालं होतं. तसंच, जीवनाची आपोआप आणि अचानक सुरुवात होण्यासाठी, प्रथिने आधीच अस्तित्वात असणं गरजेचं आहे हेसुद्धा मी शिकलो होतो. म्हणून, कोणीही नियंत्रण न केलेल्या प्रक्रियेद्वारे एक प्रथिन अस्तित्वात येण्याच्या संभाव्यतेची गणना करण्याचा मी प्रयत्न केला. प्रथिन हे आतापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या सर्वात जटील रेणूंपैकी एक आहे. सजीव पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हजारो प्रथिने असू शकतात. असं असलं तरी, त्यांच्यात कधीच गडबड होत नाही. ते सोबत मिळून आपलं काम अचूकपणे करतात. इतरांप्रमाणे मलाही हे जाणवलं, की प्रथिन खूप झपाट्यानं बनतं आणि त्यामुळे त्याच्या संभाव्यतेची गणना करणं जवळजवळ अशक्यच आहे. अतिशय जटील असलेले हे रेणू स्वतःच स्वतःची रचना कशी करू शकतात, याचं समाधानकारक स्पष्टीकरण मला अजूनही उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळालेलं नाही. एका सजीव प्राण्याच्या शरीरात असलेल्या या अगदी क्षुद्र रेणूच्या संभाव्यतेचं स्पष्टीकरण देणं जर इतकं कठीण आहे, तर मग संपूर्ण शरीराच्या रचनेच्या संभाव्यतेचं स्पष्टीकरण कसं काय देता येईल? या सर्व पुराव्यांचं परीक्षण केल्यावर मी या निष्कर्षावर पोचलो, की नक्कीच एक निर्माणकर्ता असावा.

बायबल हे देवाकडून आलेलं पुस्तक आहे याची खात्री तुम्हाला कशामुळे पटली?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत असताना मी बायबलमधल्या भविष्यवाण्यांबद्दल शिकलो. बायबलमध्ये अशा बऱ्याच भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या ज्यात अगदी सविस्तर माहिती दिली होती आणि त्या सर्व भविष्यवाण्या अगदी तंतोतंत पूर्ण झाल्या. तसंच, बायबलमध्ये जी तत्त्वं दिली आहेत त्यांचं पालन केल्यानेही मी जीवनात बरेच फायदे अनुभवले. यामुळे माझ्या मनात असा प्रश्न यायचा, की ‘बायबल लेखकांनी हजारो वर्षांआधी लिहिलेले सल्ले आज आपल्या काळातही व्यावहारिक कसे काय असू शकतात?’ मग हळूहळू मला याची खात्री पटली, की बायबल हे खरोखरच देवाकडून आलेलं पुस्तक आहे.

आपला एक निर्माणकर्ता आहे याची खात्री आजही तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे पटते?

जेव्हा मी निसर्गातल्या तत्त्वांचा विचार करतो, तेव्हा आपला एक निर्माणकर्ता आहे या गोष्टीवर माझा भरवसा आणखीन वाढतो. सध्या मी कंप्युटरसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम करतो. पण, कंप्युटर प्रोग्रामच्या तुलनेत आपला मेंदू कितीतरी पटीनं अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतो हे पाहून मी सहसा थक्क होतो. उदाहरणार्थ, आपल्या मेंदूची आवाज ओळखण्याची क्षमता आपल्याला चक्रावून टाकते. आपल्यापैकी बहुतेक लोक अगदी सहज रीत्या आवाज किंवा इतरांचं बोलणं ओळखू शकतात. जसं की अपूर्ण वाक्य, हसणं, खोकला, तोतरे बोलणं, बोलण्याची वेगवेगळी लकब, प्रतिध्वनी, आजूबाजूचा आवाज किंवा टेलीफोनमधला खरखर आवाज. तुम्हाला कदाचित या गोष्टी इतक्या विलक्षण वाटत नसतील. पण, सॉफ्टवेअर डिझाइन करणारे मात्र यांचं महत्त्व समजू शकतात. आवाज ओळखण्याचं सर्वात उच्च दर्जाचं सॉफ्टवेअरसुद्धा मानवाच्या मेंदूतल्या या क्षमतेपुढे खूप क्षुल्लक आहे.

आपला मेंदू भावना समजू शकतो, बोलण्याची विशिष्ट लकब ओळखू शकतो आणि आवाजावरून बोलणाऱ्या व्यक्तीलाही ओळखू शकतो. अगदी जटील कंप्युटरसुद्धा या गोष्टी ओळखू शकत नाही. कंप्युटरमध्ये मानवांच्या मेंदूप्रमाणे आवाज ओळखण्याची क्षमता कशी तयार करता येईल, यावर सॉफ्टवेअर डिझाइनर संशोधन करत आहेत. असं करून ते खरंतर देवाच्या हस्तकृतीचा अभ्यास करत आहेत, याची मला खात्री आहे.