व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे

देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे

आपल्या निर्मितीवरून आपण काय शिकतो?

सहानुभूती म्हणजे “इतरांच्या जागी स्वतःला ठेवून कल्पनाशक्‍तीद्वारे त्यांच्या मनातली भावना किंवा परिस्थिती अनुभवण्याची क्षमता.” मानसिक आरोग्याचे तज्ज्ञ डॉ. रीक हॅनसन म्हणतात, “सहानुभूतीची भावना आपल्यात जन्मतःच असते.”

विचार करा: इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये नसलेली ही भावना आपल्यात का आहे? बायबल याचं उत्तर देतं. त्यात म्हटलं आहे, की देवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे. (उत्पत्ति १:२६) यामुळे आपण त्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि काही प्रमाणात त्याच्यासारखे चांगले गुण दाखवू शकतो. म्हणून जेव्हा सहानुभूतीमुळे दयाळू लोक इतरांची मदत करण्यासाठी प्रेरित होतात तेव्हा खरंतर ते आपला कनवाळू सृष्टिकर्ता, यहोवा देव याची सहानुभूती प्रतिबिंबित करत असतात.—नीतिसूत्रे १४:३१.

देवाच्या सहानुभूतीबद्दल बायबल आपल्याला काय शिकवतं?

देवाला आपल्या प्रत्येकाबद्दल सहानुभूती आहे. आपल्याला दुःख सहन करताना पाहून त्याला फार वाईट वाटतं. प्राचीन काळात इस्राएलच्या लोकांना इजिप्त देशात गुलामीत जगावं लागलं. त्यानंतर त्यांनी कठीण अशी ४० वर्षं अरण्यात काढली. त्यांच्याबद्दल बायबलमध्ये म्हटलं आहे: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:९) विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की देवाला त्यांचं दुःख माहीत असण्यासोबतच तो त्यांचं दुःख समजूही शकत होता. त्याने म्हटलं: “त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (निर्गम ३:७) देव म्हणतो, की “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखऱ्‍या २:८) जेव्हा इतर जण आपल्याला इजा पोहोचवतात तेव्हा देवालाही वेदना होतात.

आपण स्वतःला दोष देत असलो किंवा आपण देवाची सहानुभूती मिळण्याच्या पात्रेतेचे नाही असं जर आपल्याला वाटत असलं, तरी बायबल आपल्याला आश्‍वासन देतं, की “देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे आणि त्याला सर्वकाही माहीत आहे.” (१ योहान ३:१९, २०) आपण स्वतःला जितक्या चांगल्या प्रकारे ओळखत नाही तितक्या चांगल्या प्रकारे देव आपल्याला ओळखतो. आपली परिस्थिती, विचार, भावना त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्याला आपल्याबद्दल सहानुभूती आहे.

आपण सांत्वन, बुद्धी आणि साहाय्यासाठी देवाकडे मदत मागू शकतो कारण तो दुःखात असलेल्यांची मदत करतो

ही वचनं आपल्याला आश्‍वासन देतात

  • “तू हाक मारशील ती परमेश्‍वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे.”—यशया ५८:९.

  • “परमेश्‍वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.”—यिर्मया २९:११, १२.

  • “माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?”—स्तोत्र ५६:८.

देवाचं आपल्यावर लक्ष आहे आणि तो आपल्या भावना समजतो

देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे हे समजल्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी काही मदत होईल का? हे समजण्यासाठी मारीया नावाच्या स्त्रीच्या अनुभवाचा विचार करा:

“मला १८ वर्षांचा मुलगा होता. दोन वर्षं खूप वेदना सहन करून कॅन्सरशी लढल्यावर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जीवन जगणं मला अगदी कठीण वाटलं. असं वाटलं, माझ्यावर अन्याय झालाय. मला यहोवाचा राग आलेला. त्याने का त्याला बरं केलं नाही, काहीच का केलं नाही!

सहा वर्षांनंतर मंडळीतल्या एका प्रेमळ आणि दयाळू मैत्रिणीला मी माझ्या भावना सांगितल्या. यहोवाचं माझ्यावर प्रेम नाही असं मी तिला म्हटलं. बरेच तास काही न बोलता तिने माझं सर्वकाही ऐकून घेतलं. मग तिने मला एक वचन सांगितलं. ते माझ्या मनाला भिडलं. ते होतं १ योहान ३:१९, २०. तिथे म्हटलं आहे: ‘आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.’ तिने मला समजवलं की यहोवा आपलं दुःख समजतो.

इतकं समजवल्यावरही माझा राग काही शांत झाला नाही! मग मी स्तोत्र ९४:१९ वाचलं. तिथे म्हटलं आहे: ‘माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.’ मला वाटलं ही वचनं माझ्यासाठीच लिहिली आहेत! मग हळूहळू यहोवाशी आपल्या दुःखाबद्दल बोलल्यामुळे मला बरं वाटू लागलं. मला जाणीव झाली की तो माझं ऐकतो आणि मला समजतो.”

देव आपल्याला समजू शकतो आणि त्याला आपल्याबद्दल सहानुभूती आहे हे जाणल्यावर खरंच किती सांत्वन मिळतं! पण मग प्रश्‍न येतो की जगात इतकी दुःखं का आहेत? देव आपल्या वाईट कृत्यांची आपल्याला शिक्षा देत आहे का? दुःख-त्रास नाहीसं करण्यासाठी देव काही करणार आहे का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला पुढच्या लेखांत मिळतील.