व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेशेल्झ इथलं प्रॅसलीन बेट; जनरल गॉर्डन यांच्या मते १८८१ मध्ये त्यांना सापडलेली एदेन बाग

पृथ्वीवर नंदनवन—कल्पना की वास्तविकता?

पृथ्वीवर नंदनवन—कल्पना की वास्तविकता?

पर्यटक कंपनींच्या माहितीपत्रकांत “पॅरडाईस” सारख्या रम्य ठिकाणांबद्दल मोहून टाकणाऱ्या अनेक ऑफर्स येतात. त्यांच्या मते लांब कुठेतरी, एका पॅरडाईस किंवा नंदनवनसारख्या ठिकाणी तुम्ही निवांतपणे सुट्टीचा आनंद घेऊ शकता. शिवाय अशा ठिकाणी जाऊन तुम्ही आपली सर्व चिंता आणि दुःखही विसरून जाल, असं ते म्हणतात. पण आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे, की परत घरी आल्यावर आपल्याला वास्तविक जीवनाला सामोरं जावंच लागतं. कारण परिस्थिती काही बदललेली नसते.

असं असलं तरी नंदनवन किंवा पॅरडाईस ही कल्पनाच मोहून टाकणारी आहे. याबद्दल आपल्या मनात असे प्रश्न येतात: “नंदनवन” ही फक्त एक आनंददायी कल्पना आहे का? लोकांना त्याबद्दल एवढी उत्सुकता का वाटते? वास्तविकतेत पृथ्वी कधी नंदनवन बनेल का?

नंदनवनाची सुरुवात

नंदनवनाच्या कल्पनेने खूप शतकांपासून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. खासकरून बायबलमध्ये ‘पूर्व दिशेला एदेनात’ असलेल्या एका सुंदर बागेबद्दल वाचल्यामुळे, बऱ्याच लोकांमध्ये नंदनवनाबद्दल उत्सुकता जागृत झाली आहे. ही बाग इतकी सुंदर का होती? कारण बायबलच्या अहवालात म्हटलं आहे, की त्यात “देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे . . . जमिनीतून उगवली” होती. खरंच, ती बाग अतिशय रम्य होती. पण सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे या “बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड” होते.—उत्पत्ति २:८, ९.

त्या बागेतून चार नद्या वाहत होत्या, असंही बायबलमधल्या उत्पत्तिच्या अहवालात सांगितलं आहे. त्यातल्या दोन नद्या आजही अस्तित्वात आहेत. एक टाइग्रिस (किंवा हिद्दकेल) आणि दुसरी युफ्रेटीझ. (उत्पत्ति २:१०-१४) या दोन्ही नद्या इराकमधून वाहून पर्शियन उपसागराला जाऊन मिळतात. इराक हा देश आधी प्राचीन पर्शियाचा एक भाग होता.

या सर्व गोष्टींवरून आपल्याला हे समजतं, की पृथ्वीवरचं नंदनवन हे पर्शियाच्या संस्कृतीचा एक भाग का होतं. अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया इथल्या फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयात, १६ व्या शतकातला एक पर्शियन गालिचा ठेवण्यात आला आहे. या गालिच्यावर विणकाम करण्यात आलं आहे आणि त्यात फुलांनी आणि झाडांनी भरलेली एक कुंपण असलेली बाग दाखवण्यात आली आहे. पर्शियन भाषेत, कुंपण असलेल्या बागेचा अर्थ नंदनवन असा होतो. गालिच्यावरची ही बाग, बायबलमधल्या सुंदर आणि प्रशस्त एदेन बागेचं चित्र डोळ्यांसमोर उभं करतं.

खरं पाहता, नंदनवनाची गोष्ट जगभरातल्या बऱ्याच भाषांमध्ये आणि संस्कृतींमध्ये ऐकायला मिळते. माणसं पूर्ण पृथ्वीवर पसरत गेली आणि त्यांनी एदेन बागेचा मूळ अहवाल आपआपल्या पद्धतीने दुसऱ्यांना सांगितला. जसजशी शतकं उलटत गेली तसतसा त्या अहवालात त्यांच्या स्थानिक विश्वासांचा आणि घडलेल्या घटनांचा समावेश होत गेला. अशा प्रकारे मूळ अहवालात भरपूर बदल झाला. पण आजदेखील लोक जेव्हा एखाद्या सुंदर ठिकाणाबद्दल सांगतात, तेव्हा ते अगदी सहजच त्या ठिकाणाला नंदनवन किंवा पॅरडाईस असं नाव देतात.

नंदनवनाचा शोध

काही शोधकर्त्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी हरवलेलं नंदनवन शोधून काढलं आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश सैन्याचे जनरल चार्ल्स गॉरडन जेव्हा १८८१ मध्ये सेशेल्झला गेले, तेव्हा तिथलं वाली द मे हे अतिशय सुंदर ठिकाण पाहून ते खूप प्रभावित झाले. इतके, की हीच ती एदेन बाग आहे असं त्यांनी जाहीर केलं. वाली द मे या ठिकाणाला आज जागतिक वारसा स्थान म्हणून ओळखलं जातं. १५ व्या शतकात इटलीचा शोधकर्ता क्रिस्टफर कोलंबस, हिसपॅनिओला या बेटावर पोहोचला. त्या वेळी त्याला वाटलं, की कदाचित इथेच एदेन बाग असावी आणि आपण लवकरच तिचा शोध लावू. हिसपॅनिओला आज डोमिनिकन प्रजासत्ताक आणि हैटी या नावांनी ओळखलं जातं.

मॅपींग पॅरडाईस, एक आधुनिक इतिहासाचं पुस्तक आहे. त्यात १९० पेक्षा जास्त प्राचीन नकाशांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. त्यातल्या बऱ्याचशा नकाशांमध्ये, आदाम आणि हव्वा एदेन बागेत असल्याचं दाखवलं आहे. त्यात १३ व्या शतकातल्या बिटस ऑफ लेबाना या हस्तलिखिताच्या प्रतींतला एक असामान्य नकाशासुद्धा आहे. त्या नकाशाच्या वरच्या बाजूला एक चौकोन आहे आणि त्याच्या मध्यभागी नंदनवन दाखवलं आहे. नंदनवनातून “टाइग्रिस”, “युफ्रेटीझ”, “पिसन” आणि “जीऑन” या चार नद्या चौकोनाच्या टोकांच्या दिशेने वाहतात. जगाच्या चारही टोकांना झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला कदाचित त्या सूचित करतात. या वर्णनावरून आपल्याला कळतं, की खरोखरच्या नंदनवनाचं ठिकाण आज जरी माहीत नसलं, तरी त्याबद्दलच्या कथा ज्या आपल्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत त्यांनी नंदनवनाबद्दलची मानवांची उत्सुकता टिकवून ठेवली आहे.

१७ व्या शतकातला इंग्रजी कवी जॉन मिल्टन हा पॅरडाईस लॉस्ट (गमावलेलं नंदनवन) या कवितेसाठी प्रसिद्ध आहे. बायबलच्या उत्पत्ति या पुस्तकातल्या एका अहवालावर ही कविता आधारलेली आहे. हा अहवाल आदाम आणि हव्वाने केलेल्या पापाबद्दल आणि त्यांना एदेन बागेतून बाहेर काढून टाकण्याबद्दलचा आहे. मानवांना या पृथ्वीवर पुन्हा एकदा नेहमीचं जीवन मिळेल या अभिवचनावर मिल्टनने या कवितेत जोर दिला आहे. त्या कवितेत असं म्हटलं आहे: “मग ही संपूर्ण पृथ्वी एक नंदनवन बनेल.” त्यानंतर मिल्टनने पॅरडाईस लॉस्ट या कवितेचा दुसरा भाग लिहिला. त्याचं शीर्षक होतं पॅरडाईस रीगेन्ड् (परत मिळालेलं नंदनवन).

दृष्टिकोनात झालेला बदल

एकेकाळी पृथ्वीवर एक नंदनवन होतं, या संकल्पनेचं मानवी इतिहासात नेहमीच महत्त्व राहिलं आहे. मग आज त्याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे? याच्या मूळ कारणाविषयी मॅपींग पॅरडाईस या पुस्तकात म्हटलं आहे: “धर्म शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांनी . . . नंदनवन नेमकं कुठे होतं याविषयाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.”

चर्चमध्ये जाणाऱ्या कित्येक जणांना शिकवलं जातं, की ते या पृथ्वीवर नंदनवनात जगणार नाहीत तर ते स्वर्गात जातील. पण बायबलमध्ये स्तोत्र ३७:२९ या वचनात म्हटलं आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” पण आज हे जग एक नंदनवन नाही. मग पृथ्वी नंदनवन बनेल हे अभिवचन पूर्ण होईल याची आपण खात्री कशी बाळगू शकतो? *

पूर्ण पृथ्वीवर नंदनवन एक वास्तविकता असेल

यहोवा देवाने सुरुवातीला बनवलेलं नंदनवन मानवांनी गमावलं. पण या पृथ्वीला पुन्हा एकदा नंदनवन बनवण्याचं वचन त्याने दिलं आहे. हे वचन तो कसं पूर्ण करणार आहे? येशूने जी प्रार्थना शिकवली त्यात त्याने म्हटलं: “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:१०) हे राज्य एक सरकार आहे आणि त्याचा शासक येशू ख्रिस्त आहे. तो लवकरच सर्व मानवी राज्यांना काढून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणार आहे. (दानीएल २:४४) या राज्याच्या शासनादरम्यान पृथ्वीला नंदनवन बनवण्याची देवाची इच्छा “पूर्ण” होईल.

नंदनवनात परिस्थिती कशी असेल याबद्दल लिहिण्यासाठी देवाने यशया नावाच्या संदेष्ट्याला प्रेरित केलं. त्याने लिहिलं की मानवजात आज ज्या चिंतांचा, वादविवादांचा सामना करत आहे त्या सर्व गोष्टी नाहीशा होतील. (यशया ११:६-९; ३५:५-७; ६५:२१-२३) थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या बायबलमधून ही वचनं वाचावी, असं आम्ही तुम्हाला आर्जवतो. असं केल्यामुळे, आज्ञाधारक मानवांसाठी देव जे काही करणार आहे त्यावर तुमचा भरवसा वाढेल. आदामने देवाची पसंती आणि नंदनवनात राहण्याची संधी गमावली. पण आज्ञाधारक मानव या दोन्ही गोष्टींचा आनंद अनुभवतील.—प्रकटीकरण २१:३.

पृथ्वी एक नंदनवन बनणार आहे ही एक कल्पना नाही, तर वास्तविकता आहे. याबद्दल आपण खात्री का बाळगू शकतो? कारण बायबल आपल्याला सांगतं: “स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” पृथ्वी नंदनवन बनेल हे वचन, “देवाने, जो कधीही खोटे बोलू शकत नाही,” फार पूर्वीच दिलं आहे. (स्तोत्र ११५:१६; तीत १:२) बायबल आपल्याला खरंच एक सुरेख आशा देतं—पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळचं जीवन!

^ परि. 15 आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुरआनमध्येही याबद्दल सांगण्यात आलं आहे. कुरआनमधल्या अल-अनबिया [संदेषटे] या २१ व्या ‘सुरा’च्या १०५ वचनात असं म्हटलं आहे: “माझ्या सेवकांतले धर्मी जण पृथ्वीचे वतन पावतील.”