व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या

बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या

कॅनडामध्ये राहणारा आणि यहोवाचा साक्षीदार असलेला डॅन हा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना राज्याचा संदेश सांगण्यासाठी विशेष मेहनत घेतो. अशाच एका अनुभवाबद्दल सांगताना तो म्हणतो: “पीटर हा घरदार नसलेल्या आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांपैकी एक होता. रस्त्यांमागील गल्ल्यांमध्ये राहणारा पीटर, मी आजवर पाहिलेला सर्वात अस्वच्छ, गबाळा आणि कोणालाही चीड येईल असा मनुष्य होता. शिवाय, इतरांना आपल्यापासून दूर ठेवण्यात तो अगदी पटाईत होता. माणुसकीच्या नात्याने अनेकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याने ती नेहमीच नाकारली.” असं असलं तरी, डॅन १४ पेक्षा अधिक वर्षांपर्यंत अधूनमधून पीटरला धीराने दया दाखवत राहिला.

एक दिवस पीटर डॅनला म्हणाला: “तू मला त्रास का देतोस? इतरांना तर माझं काहीच घेणं-देणं नाही, मग तुला माझी एवढी काळजी का?” पीटरच्या हृदयापर्यंत पोचायला डॅनने फार कुशलतेनं तीन वचनं वापरली. सगळ्यात पहिलं, त्याने पीटरला विचारलं की त्याला देवाचं नाव माहीत आहे का, आणि मग त्याला बायबलमधलं स्तोत्र ८३:१८ हे वचन वाचायला दिलं. त्यानंतर आपल्याला पीटरची काळजी का वाटते, हे समजावण्यासाठी त्याने पीटरला रोमकर १०:१३, १४ ही वचनं वाचायला सांगितली. या वचनांत म्हटलं आहे: “जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.” शेवटी, डॅनने मत्तय ९:३६ हे वचन वाचलं आणि पीटरलाही ते वाचायला सांगितलं. या वचनात म्हटलं आहे: “त्याने [येशूने] लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले व भरकटलेले होते.” हे वचन वाचल्यानंतर पीटरच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने डॅनला विचारलं: “मीसुद्धा अशा मेंढरांपैकीच एक आहे का?”

त्यानंतर, पीटरने स्वतःमध्ये बदल केला. त्याने दाढी केली, आंघोळ केली आणि डॅनकडून मिळालेले चांगले कपडे घातले. तिथून पुढे पीटर नीटनेटका आणि स्वच्छ राहू लागला.

पीटरला डायरी लिहायची सवय होती. डायरीच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये त्याच्या जीवनातील आशाहीनतेची आणि उदासीनतेची छटा होती. पण, अलीकडे त्याने जे काही लिहिलं ते मात्र पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्या डायरीतल्या एका पानावर त्याने असं लिहिलं: “आज मला देवाचं नाव कळालं. आता जेव्हा मी प्रार्थना करतो, तेव्हा मी यहोवा देवाला प्रार्थना करतो. मला देवाचं नाव समजलं याचा मला अतिशय आनंद वाटतो. यहोवा माझा मित्र बनू शकतो असं डॅननी मला सांगितलं; एक असा मित्र ज्याच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे आणि ज्याच्याशी मी केव्हाही आणि कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो.”

पीटरने त्याच्या डायरीमध्ये सगळ्यात शेवटी त्याच्या लहान भावासाठी आणि त्याच्या मोठ्या बहिणीसाठी काही लिहून ठेवलं होतं. त्यात त्याने म्हटलं:

“आज मला बरं वाटत नाहीये. मला वाटतं आता माझं वय झालं आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस जरी ठरला, तरी मला माहीत आहे की नवीन जगात मी माझ्या मित्राला [डॅनला] पुन्हा भेटेन. जर तुम्ही माझी ही डायरी वाचत असाल, तर याचा अर्थ असा आहे की मी आता जिवंत नाही. आणि माझ्या मयतीच्या वेळेस जर तुम्ही अशा एका माणसाला पाहिलंत ज्याचा तिथं असण्याचा काहीएक संबंध नाही, तर त्याच्याशी नक्की बोला आणि हे लहान निळं पुस्तक त्याला वाचून दाखवा. * यात म्हटलं आहे, मी माझ्या मित्राला नवीन जगात भेटेन. आणि या गोष्टीवर माझा पक्का विश्वास आहे. तुमचा बंधू, पीटर.”

पीटरच्या अंत्यविधीच्या वेळी त्याची मोठी बहीण उमे म्हणाली: “जवळपास दोन वर्षांआधी पीटरने मला कॉन्टॅक्ट केला. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मला तो इतका आनंदी वाटला; तो हसलादेखील.” पुढे ती डॅनला म्हणाली: “मीही ते पुस्तक नक्कीच वाचेन. कारण, जी गोष्ट माझ्या भावाच्या हृदयाला स्पर्श करू शकते ती नक्कीच विशेष असली पाहिजे.” उमे ही यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकावरही साक्षीदारांसोबत चर्चा करण्यास तयार झाली.

आपणदेखील इतरांच्या बाहेरच्या रूपापेक्षा त्यांचं आतलं रूप पाहिलं पाहिजे आणि त्यांना खरं ख्रिस्ती प्रेम दाखवलं पाहिजे. तसंच, आपण सर्व प्रकारच्या लोकांना धीराने मदत केली पाहिजे. (१ तीम. २:३, ४) असं केल्यास, आपण पीटरसारख्या लोकांना, म्हणजे ज्यांचं बाहेरचं रूप कदाचित चांगलं नसेल, पण हृदय मात्र चांगलं आहे, अशांना देवाच्या राज्याकडे येण्यासाठी मदत करू शकतो. “परमेश्वर हृदय पाहतो” त्यामुळे चांगल्या अंतःकरणाच्या लोकांमध्ये तो सत्याचं बी नक्की वाढवेल याची खात्री आपण बाळगू शकतो.—१ शमु. १६:७; योहा. ६:४४.

^ परि. 7 हे निळं पुस्तक म्हणजे, पीटरला बऱ्याच वर्षांपूर्वी मिळालेलं सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे बायबल अभ्यासासाठी असलेलं पुस्तक. यहोवाचे साक्षीदार आता या पुस्तकाचं प्रकाशन करत नाहीत.