व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा संदेश सांगणाऱ्‍यांकडून आपण देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो

देवाचा संदेश सांगणाऱ्‍यांकडून आपण देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो

पूर्वीच्या काळी देवाने काही विशिष्ट व्यक्‍तींकडून, म्हणजेच संदेष्ट्यांकडून मानवांना काही महत्त्वाचे संदेश कळवले. या संदेष्ट्यांकडून आपण देवाबद्दल काय शिकू शकतो, हे जाणून घेण्यासाठी आता आपण देवाच्या तीन विश्‍वासू संदेष्ट्यांच्या उदाहरणावर चर्चा करू या.

अब्राहाम

देव भेदभाव करत नाही आणि त्याला सर्व मानवांना आशीर्वाद द्यायची इच्छा आहे.

देवाने अब्राहाम संदेष्ट्याला असं वचन दिलं, की “तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति १२:३.

यातून आपण काय शिकतो? हेच की देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि त्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्‍या सगळ्यांना, म्हणजे स्त्री, पुरुष, मुलं अशा सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायची त्याची मनापासून इच्छा आहे.

मोशे

देव दयाळू आहे आणि जे त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात त्यांना तो आशीर्वाद देतो.

सर्वशक्‍तिशाली देवाने मोशे संदेष्ट्याला अनेक मोठमोठे चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. मोशे देवाला ओळखत होता. पण तरीही त्याने देवाकडे अशी विनंती केली, की “तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल.” (निर्गम ३३:१३) मोशेची ही विनंती देवाने ऐकली. त्याने त्याला आपल्या मार्गांबद्दल, आपल्या गुणांबद्दल आणखी ज्ञान दिलं, आणि त्या गोष्टी समजून घ्यायलाही त्याला मदत केली. उदाहरणार्थ, मोशे हे समजू शकला की आपल्याला घडवणारा देव “दयाळू व कृपाळू” आहे.—निर्गम ३४:६, ७.

यातून आपण काय शिकतो? आपण जर देवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर तो आपल्यापैकी प्रत्येकाला आशीर्वाद देईल; मग आपण एक स्त्री असो, पुरुष असो किंवा मुलं असोत. त्याची उपासना कशी करावी हे त्याने पवित्र शास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे. यासोबतच, त्याला आपल्याबद्दल कसं वाटतं आणि तो आपल्याला आशीर्वाद द्यायला किती उत्सुक आहे, हेसुद्धा त्याने पवित्र शास्त्रात सांगितलं आहे.

येशू

लोकांबद्दल दया असल्यामुळेच येशूने त्यांचे सर्व प्रकारचे रोग बरे केले

आपण जर येशूबद्दल, त्याच्या कार्यांबद्दल आणि त्याने शिकवलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेतलं तर देव आपल्याला कायम टिकणारे आशीर्वाद देईल.

येशूच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या शिकवणींबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रातून बरंच काही शिकायला मिळतं. देवाने येशूला अनेक मोठमोठे चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. जसं की त्याने अंधळ्यांना, बहिऱ्‍यांना आणि अपंगांना बरं केलं. तसंच, त्याने मेलेल्या लोकांनाही जिवंत केलं. असे चमत्कार करून येशूने हे दाखवून दिलं, की भविष्यात देव मानवांना कोणकोणते आशीर्वाद देणार आहे. आणि ते आशीर्वाद अनुभवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो हेही त्याने सांगितलं. त्याने म्हटलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.”—योहान १७:३.

येशू अतिशय दयाळू आणि प्रेमळ होता. म्हणूनच स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध असे सर्व प्रकारचे लोक त्याच्याकडे यायचे. तो जेव्हा लोकांना म्हणाला की, “माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे आणि तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल,” तेव्हा येशूकडून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले. (मत्तय ११:२९) येशूच्या काळात लोक स्त्रियांचा आदर करत नव्हते, पण तो मात्र स्त्रियांशी प्रेमाने आणि आदराने वागला.

यातून आपण काय शिकतो? येशूप्रमाणेच आपणही लोकांवर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.

येशू देव नाही

पवित्र शास्त्र असं शिकवतं, की आपल्यासाठी “फक्‍त एकच देव” आहे. आणि येशू हा देवाचा संदेश सांगणारा होता. (१ करिंथकर ८:६) येशूने स्वतः म्हटलं की देव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि देवानेच त्याला पृथ्वीवर पाठवलं आहे.—योहान ११:४१, ४२; १४:२८. *

^ परि. 17 येशू ख्रिस्ताबद्दल जास्त माहितीसाठी www.pr418.com/mr या वेबसाईटवर देवाकडून आनंदाची बातमी!  या माहितीपत्रकातला पाठ ४ पाहा.