व्हिडिओ पाहण्यासाठी

होलोकॉस्टच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांसोबत काय घडलं?

होलोकॉस्टच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांसोबत काय घडलं?

 जर्मनी आणि नात्झी सरकाराखाली असलेल्या देशांमध्ये जवळपास ३५,००० यहोवाचे साक्षीदार राहत होते. त्यांपैकी होलोकॉस्टच्या वेळी जवळजवळ १,५०० साक्षीदारांचा जीव गेला. प्रत्येकाचा जीव कसा गेला याचं नेमकं कारण सांगता येत नाही. या बाबतीत शोध सुरू असल्यामुळे पुढे जाऊन आकडेवारी बदलू शकते आणि आणखी माहिती समोर येऊ शकते.

 त्यांचा मृत्यू कसा झाला?

  • नात्झी काळातलं शिरच्छेद करण्याचं यंत्र

      मृत्युदंड: जर्मनी आणि नात्झी सरकाराखाली असलेल्या देशांमध्ये जवळपास ४०० यहोवाच्या साक्षीदारांना मृत्युदंड देण्यात आला. बऱ्‍याचशा पिडितांवर खटला चालवण्यात आला, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली आणि त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. तर इतर काहींवर खटला न चालवताच त्यांची गोळ्या झाडून किंवा फाशी देऊन हत्या करण्यात आली.

  •   कैदेतली भयंकर परिस्थिती: नात्झी छळछावण्या आणि तुरुंगांमध्ये १,००० पेक्षा जास्त यहोवाच्या साक्षीदारांचा मृत्यू झाला. सक्‍तमजूरी, छळ, उपासमार, कडाक्याची थंडी, आजार किंवा वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशा अमानवीय अत्याचारांमुळे दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी सुटका झालेल्या इतर काहींचा थोड्या काळातच जीव गेला.

  •   मृत्यूची इतर कारणं: काही साक्षीदारांना गॅस चेंबरमध्ये डांबून मारण्यात आलं. त्यांच्यावर जीवघेणे वैद्यकीय प्रयोग केले जायचे किंवा त्यांना प्राणघातक इंजेक्शनं दिली जायची.

 त्यांचा छळ का करण्यात आला?

 यहोवाचे साक्षीदार बायबलच्या शिकवणींप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला. नात्झी सरकारने साक्षीदारांवर बायबलच्या विरोधात वागायचा दबाव टाकला, तेव्हा त्यांनी ठामपणे नकार दिला. त्यांनी “माणसांपेक्षा देवाची आज्ञा” पाळायचं ठरवलं. (प्रेषितांची कार्यं ५:२९) त्यांनी पुढे दिलेल्या दोन गोष्टींच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली:

  1.  १. राजकीय गोष्टींच्या बाबतीत. आज जगभरातल्या इतर साक्षीदारांसारखंच, नात्झी सरकाराखाली असलेल्या साक्षीदारांनी राजकीय गोष्टींच्या बाबतीत कोणत्याही पक्षाची बाजू घेतली नाही. (योहान १८:३६) त्यामुळे त्यांनी,

    •   सैन्यात भाग घेतला नाही किंवा युद्धाशी संबंधित कोणतीही कामं केली नाहीत.​—यशया २:४; मत्तय २६:५२.

    •   मतदान केलं नाही किंवा कोणत्याही नात्झी संघटनेचा भाग बनले नाहीत.​—योहान १७:१६.

    •   नात्झी सरकारच्या स्वास्तिक चिन्हाला सलामी दिली नाही किंवा “हेल हिटलर!” असंही म्हटलं नाही.​—मत्तय २३:१०; १ करिंथकर १०:१४.

  2.  २. विश्‍वासाच्या बाबतीत. उपासनेवर बंदी असतानाही यहोवाचे साक्षीदार,

 प्रोफेसर रॉबर्ट गरवॉर्थ यांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल म्हटलं की, “नात्झी सरकाराखाली ज्यांचा-ज्यांचा छळ झाला त्यांच्यापैकी फक्‍त यहोवाचे साक्षीदारच असे होते, ज्यांचा त्यांच्या धार्मिक विश्‍वासांमुळे छळ झाला.” a आपल्या विश्‍वासासाठी ठाम भूमिका घेणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांबद्दल छळछावण्यांमधल्या इतर कैद्यांना फार कौतुक वाटायचं. ऑस्ट्रियाच्या एका कैद्याने असं म्हटलं: “ते युद्धात भाग घेत नाहीत. कोणाचा जीव घेण्याऐवजी ते स्वतःचा जीव देण्याची निवड करतील.”

 त्यांचा मृत्यू कुठे झाला?

  •   छळछावण्या: बहुतेक यहोवाच्या साक्षीदारांचा छळछावण्यांमध्येच मृत्यू झाला. त्यांना मारून टाकण्यासाठी ऑस्वीच, बुखनवाल्ड, डखाऊ, फ्लॉसनबर्ग, मॉतहाऊसन, न्युयनगॅम्मे, नायदरहेगन, रॅवेन्सब्रुक आणि सॅकसनहाऊसन इथल्या छळछावण्यांमध्ये डांबण्यात आलं. फक्‍त सॅकसनहाऊसन इथल्या छळछावणीमध्येच जवळपास २०० यहोवाच्या साक्षीदारांचा मृत्यू झाल्याचा पक्का पुरावा मिळालाय.

  •   तुरुंग: काही साक्षीदारांना इतक्या भयंकर यातना देण्यात आल्या, की त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. तर इतर काहींचा चौकशीच्या वेळी खूप मारहाण केल्यामुळे जीव गेला.

  •   कत्तलीची ठिकाणं: खासकरून बर्लिन-प्लॉटझेनसी, ब्रॅन्डनबर्ग आणि हाले (साले) इथल्या तुरुंगांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना ठार मारण्यात आलं. यासोबतच, इतर ७० ठिकाणीही साक्षीदारांना ठार मारण्यात आल्याची नोंद आहे.

 मृत्युदंड देण्यात आलेले काही जण

  •  नाव: हेलेनी गॉटहोल्ड

     मृत्युदंडाचं ठिकाण: प्लॉटझेनसी (बर्लिन)

     हेलेनीचं लग्न झालं होतं आणि तिला दोन मुलं होती. तिला बऱ्‍याचदा अटक करण्यात आली होती. १९३७ मध्ये एकदा चौकशीच्या वेळी तिच्यावर इतके अत्याचार करण्यात आले की तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. ८ डिसेंबर १९४४ मध्ये बर्लिनमधल्या प्लॉटझेनसीच्या तुरुंगात तिचा शिरच्छेद करण्यात आला.

  •  नाव: गरहार्ड लेबओल्ड

     मृत्युदंडाचं ठिकाण: ब्रॅन्डनबर्ग

     ६ मे १९४३ मध्ये एकवीस वर्षांच्या गरहार्डचा शिरच्छेद करण्यात आला. याच्या दोन वर्षांआधीच त्याच तुरुंगात त्याच्या वडिलांचा शिरच्छेद करण्यात आला होता. गरहार्डने आपल्या कुटुंबाला आणि जिच्याशी त्याचं लग्न होणार होतं तिला पत्रात असं लिहिलं: “प्रभूने शक्‍ती दिली नसती, तर या कठीण परीक्षेचा मी सामनाच करू शकलो नसतो.”

  •  नाव: रुडॉल्फ ऑशनर

     मृत्युदंडाचं ठिकाण: हाले (साले)

     २२ सप्टेंबर १९४४ ला रुडॉल्फचा शिरच्छेद करण्यात आला तेव्हा तो फक्‍त १७ वर्षांचा होता. त्याने आपल्या आईला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात असं म्हटलं: “बऱ्‍याच भावांनी या कठीण परीक्षेचा सामना केलाय म्हणून मीही तो करू शकतो.”

a हिटलर्स हँगमॅन: द लाईफ ऑफ हेड्रिच,  पान १०५.