व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती का होत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती का होत नाहीत?

 यहोवाचे साक्षीदार पुढील कारणांसाठी सैन्यात भरती होत नाहीत:

  1.  १. ते देवाची आज्ञा मानतात. बायबलमध्ये म्हटले आहे, की देवाचे सेवक “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील” आणि “युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.

  2.  २. ते येशूची आज्ञा मानतात. येशूने प्रेषित पेत्राला असे सांगितले: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) यावरून येशूने दाखवून दिले, की त्याचे अनुयायी स्वतःजवळ शस्त्रसामग्री बाळगणार नाहीत व सैन्यात भरती होणार नाहीत.

     राजकीय बाबींमध्ये तटस्थ भूमिका घेऊन येशूचे शिष्य जगाचा भाग न बनण्याविषयी त्याने दिलेल्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात. (योहान १७:१६) पण, ते लष्करी कारवायांचा किंवा सशस्त्र सैन्यात सेवा करण्याची निवड करणाऱ्‍यांचा निषेध करत नाहीत.

  3.  ३. त्यांना इतरांबद्दल प्रेम आहे. येशूने आपल्या शिष्यांना “एकमेकांवर प्रीती” करण्याची आज्ञा दिली. (योहान १३:३४, ३५) यामुळे त्यांचा एक आंतरराष्ट्रीय बंधुसमाज तयार होतो. आणि या बंधुसमाजातील कोणीही आपल्या भावाविरुद्ध अथवा बहिणीविरुद्ध युद्ध करत नाही.—१ योहान ३:१०-१२.

  4.  ४. त्यांच्यापुढे आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे उदाहरण आहे.एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन ॲण्ड वॉर  यात असे म्हटले आहे: “येशूच्या आरंभीच्या अनुयायांनी युद्धात किंवा लष्करी सेवेत भाग घेण्यास नकार दिला. यात भाग घेणे म्हणजे येशूने दाखवलेल्या प्रेमाच्या आणि ‘आपल्या शत्रूंवरही प्रेम करा’ या त्याने दिलेल्या आज्ञेच्या विरोधात जाण्यासारखे ठरेल, असे ते मानत होते.” तसेच, जर्मन धर्मवेत्ता पिटर माईनहोल्ट यांनी येशूच्या त्या आरंभीच्या अनुयायांबद्दल असे म्हटले: “एका व्यक्‍तीने ख्रिस्ती असणे आणि सैनिक असणे या परस्परविरोधी गोष्टी समजल्या जायच्या.”

समाजाला योगदान

 यहोवाचे साक्षीदार समाजाचे चांगले नागरिक आहेत. त्यांचा समाजाला फायदाच होतो. ते राहात असलेल्या देशाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. ते सरकारी अधिकाऱ्‍यांचा आदर करतात कारण बायबलमध्ये पुढील आज्ञा दिल्या आहेत:

  •   “वरिष्ठ अधिकार्‌यांच्या अधीन असावे.”—रोमकर १३:१.

  •   “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.”—मत्तय २२:२१.

 त्यामुळे आम्ही नियमांचे पालन करतो, कर भरतो आणि जन कल्याणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य देतो.