व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का?

यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का?

 होय, अर्थात. संपूर्ण बायबल “परमेश्‍वरप्रेरित” व “उपयोगी आहे,” असे यहोवाचे साक्षीदार मानतात. (२ तीमथ्य ३:१६) लोक ज्याला “जुना करार” व “नवा करार” म्हणतात ते आहे संपूर्ण बायबल. पण यहोवाचे साक्षीदार बायबलच्या या दोन भागांना, हिब्रू शास्त्रवचने व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने असे संबोधतात. त्यामुळे, बायबलचे काही भाग जुने आहेत किंवा आपल्या काळाला लागू होत नाहीत, असा फरक ते करत नाहीत.

ख्रिश्‍चनांसाठी “जुना करार” आणि “नवा करार” हे दोन्ही लाभदायक का आहेत?

 ख्रिस्ती प्रेषित पौलाने देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असे लिहिले: “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.” (रोमकर १५:४) म्हणजे, हिब्रू शास्त्रवचनांमध्येही आपल्या लाभासाठी माहिती आहे. शिवाय, त्यात ऐतिहासिक अहवालांची माहिती आणि व्यावहारिक सल्लाही मिळतो.

  •   ऐतिहासिक अहवाल. हिब्रू शास्त्रवचनांमध्ये निर्मितीचे तसेच मानवजातीने पाप कसे केले त्याबद्दलचे सविस्तर वर्णन आढळते. ही माहिती नसती तर आपल्याला, आपण कोठून आलो? मानव का मरतात? यांसारख्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसती. (उत्पत्ति २:७, १७) तसेच हिब्रू शास्त्रवचनांमध्ये, आपल्या सारख्याच आनंदांचा अनुभव घेतलेल्या व समस्यांचा सामना केलेल्या लोकांबरोबर यहोवा देवाने कसे व्यवहार केले त्याबद्दलची माहिती मिळते.—याकोब ५:१७.

  •   व्यवहारोपयोगी सल्ला. बायबलमधील नीतिसूत्रे व उपदेशक या हिब्रू शास्त्रवचनांतील पुस्तकांमध्ये सुखी जीवनासाठी असलेला सल्ला सर्वकाळासाठी आहे. कौटुंबिक जीवनाचा आनंद कसा लुटायचा (नीतिसूत्रे १५:१७), कामाबद्दलचा संतुलित दृष्टिकोन कसा बाळगायचा (नीतिसूत्रे १०:४; उपदेशक ४:६), तरुण त्यांच्या तरुणाईत सर्वाधिक आनंद कसा मिळवू शकतात (उपदेशक ११:९–१२:१) यांबद्दलचा सल्ला या पुस्तकांमध्ये आहे.

 तसेच, मोशे नावाच्या देवाच्या एका प्राचीन सेवकाला देवाने दिलेल्या नियमशास्त्रात, ज्याला तोरहदेखील (बायबलची पहिली पाच पुस्तके) म्हणतात, त्यात असलेल्या नियमांचा अभ्यास केल्यानेसुद्धा आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. आज ख्रिश्‍चनांना या नियमांनुसार जगण्याचे बंधन नसले, तरी त्यातील तत्त्वांमुळे आपल्याला सुखी जीवन जगण्यास मदत होऊ शकते.—लेवीय १९:१८; अनुवाद ६:५-७.