व्हिडिओ पाहण्यासाठी

येशूच्या बलिदानामुळे ‘बऱ्‍याच जणांसाठी’ खंडणी कशी देण्यात आली?

येशूच्या बलिदानामुळे ‘बऱ्‍याच जणांसाठी’ खंडणी कशी देण्यात आली?

बायबलचं उत्तर

 मानवांना पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी देवाने एक व्यवस्था केली. ती म्हणजे येशूचं बलिदान. बायबलमध्ये ‘येशूच्या वाहिलेल्या रक्‍ताला’ खंडणी म्हटलंय. (इफिसकर १:७; १ पेत्र १:१८, १९) म्हणूनच येशूने म्हटलं होतं, की तो “बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”​—मत्तय २०:२८.

“बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात खंडणी” देण्याची गरज का पडली?

 पहिला मानव आदाम याला निर्माण करण्यात आलं तेव्हा तो परिपूर्ण होता. त्याच्यात कोणतंही पाप नव्हतं. तो सर्वकाळ जगू शकत होता. पण जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडून त्याने कायमचं जीवन गमावलं. (उत्पत्ती ३:१७-१९) त्याला मुलं झाली तेव्हा त्याने त्यांनाही वारशाने पाप दिलं. (रोमकर ५:१२) म्हणूनच बायबलमध्ये असं सांगितलंय, की आदामने स्वतःला आणि आपल्या मुलांना पापाच्या आणि मृत्यूच्या गुलामीत ‘विकलं.’ (रोमकर ७:१४) सगळेच मानव अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही आदामने जे गमावलं होतं ते परत मिळवू शकत नव्हतं.​—स्तोत्र ४९:७, ८.

 आदामच्या वंशजांना कोणतीच आशा नाही हे पाहून देवाला त्यांची दया आली. (योहा. ३:१६) पण देव न्यायी असल्यामुळे, योग्य आधार असल्याशिवाय तो त्यांच्या पापांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता किंवा त्यांना माफ करू शकत नव्हता. (स्तोत्र ८९:१४; रोमकर ३:२३-२६) तरीसुद्धा, देवाचं मानवांवर प्रेम असल्यामुळे त्याने त्यांच्या पापांची क्षमा करण्यासोबतच त्यांना पापापासून पूर्णपणे मुक्‍त करण्यासाठी एक कायदेशीर आधार पुरवला. (रोमकर ५:६-८) तो कायदेशीर आधार खंडणीद्वारे देण्यात आला.

खंडणीमुळे पापापासून सुटका कशी मिळते?

 बायबलमध्ये वापरलेल्या “खंडणी” या शब्दात तीन गोष्टी सामील आहेत:

  1.   खंडणी ही मोजण्यात आलेली किंमत आहे.​—गणना ३:४६, ४७.

  2.   खंडणीमुळे सुटका होते.​—निर्गम २१:३०.

  3.   ज्याला सोडवण्यासाठी खंडणी दिली जाते, त्याच्याइतकंच तिचं मूल्य असतं. a

 येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाला या गोष्टी कशा लागू होतात ते पाहू या.

  1.   मोजण्यात आलेली किंमत. बायबलमध्ये सांगितलंय की ख्रिस्ताच्या अनुयायांना “किंमत देऊन विकत घेण्यात आलं आहे.” (१ करिंथकर ६:२०; ७:२३) ती किंमत म्हणजे येशूचं वाहिलेलं रक्‍त. त्याद्वारे त्याने “प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं” आहे.​—प्रकटीकरण ५:८, ९.

  2.   सुटका. येशूच्या बलिदानामुळे आपण पापापासून “खंडणीद्वारे मुक्‍त” होतो.​—१ करिंथकर १:३०; कलस्सैकर १:१४; इब्री लोकांना ९:१५.

  3.   सारखं मूल्य. आदामने एक परिपूर्ण मानवी जीवन गमावलं होतं आणि येशूने आपलं परिपूर्ण मानवी जीवन बलिदान म्हणून दिलं. त्यामुळे, येशूच्या बलिदानाचं मूल्य आदामने जे गमावलं होतं त्याच्याइतकंच होतं. (१ करिंथकर १५:२१, २२, ४५, ४६) बायबल म्हणतं: “जसं एका माणसाने [आदामने] आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसंच, एकाच माणसाने [येशू ख्रिस्ताने] आज्ञापालन केल्यामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवलं जाईल.” (रोमकर ५:१९) यावरून, फक्‍त एका माणसाच्या मृत्यूमुळे बऱ्‍याच लोकांसाठी खंडणी कशी दिली जाऊ शकते हे समजतं. येशूचं बलिदान अशा “सर्वांच्या मोबदल्यात खंडणी” आहे, जे त्यापासून फायदा होण्यासाठी पाऊल उचलतात.​—१ तीमथ्य २:५, ६.

a बायबलमध्ये “खंडणी” असं भाषांतर केलेल्या मूळ भाषेतल्या शब्दांचा अर्थ मोबदल्यात दिलेली किंमत किंवा वस्तू असा होतो. उदाहरणार्थ, काफार या हिब्रू भाषेतल्या क्रियापदाचा अर्थ ‘झाकणं’ असा होतो. (उत्पत्ती ६:१४) सहसा पाप झाकण्याच्या किंवा क्षमा करण्याच्या संदर्भात हा शब्द वापरला आहे. (स्तोत्र ६५:३) त्याच्याशी संबंधित असलेल्या कोफेर या शब्दाचा अर्थ, झाकण्यासाठी किंवा क्षमा मिळण्यासाठी दिलेली किंमत असा होतो. (निर्गम २१:३०) त्याच प्रकारे, लिट्रॉन या ग्रीक शब्दाचं सहसा “खंडणी” असं भाषांतर केलं आहे. तसंच, “सोडवण्यासाठी दिलेली किंमत” असंही त्याचं भाषांतर केलं जाऊ शकतं. (मत्तय २०:२८; द न्यू टेस्टामेंट इन मॉडर्न स्पीच, आर. एफ वेमथ) काही ग्रीक लेखकांनी युद्धाच्या बंदिवानाला किंवा गुलामाला सोडवण्यासाठी मोजलेली किंमत या अर्थानेही या शब्दाचा वापर केला आहे.