व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे

मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे

गौरव: * “हे रोज रात्रीचं नाटक झालं होतं. मनीष, माझा ४ वर्षांचा मुलगा घरभर त्याच्या खेळण्यांचा पसारा करायचा. मी त्याला, झोपायच्याआधी सर्व खेळण्या जागच्या जागी ठेवून द्यायची सवय लावायचा प्रयत्न करत होतो. पण मनीष कांगावा करायचा, ओरडून सगळं घर डोक्यावर घ्यायचा. कधीकधी माझाही पारा चढायचा आणि मी त्याच्यावर खेकसायचो, पण यामुळे नंतर आम्हा दोघांनाही वाईट वाटायचं. झोपताना आपण प्रसन्‍न असलं पाहिजे, असं मला वाटायचं. म्हणून मग मी त्याला काही सांगायचंच सोडून दिलं, मीच पसारा आवरून ठेवायचो.”

इंदिरा: “जुईनं म्हणजे, माझ्या १३ वर्षांच्या मुलीनं, शाळेत तिच्या बाईनं तिला दिलेलं काम कसं करायचं हे समजलं नाही तेव्हा खूप त्रागा केला. शाळेतून घरी आल्याबरोबर ती जवळजवळ एक तास रडत होती. मी तिला म्हटलं, की तिनं तिच्या बाईनांच विचारायचं असतं. पण जुई म्हणाली, की तिला तिची बाई खडूस वाटते म्हणून तिची मदत घ्यायला भीती वाटत होती. हे ऐकल्यावर मला, ताडकन उठून शाळेत जावं आणि त्या बाईची चांगली जिरवावी, असं वाटलं. माझ्या मुलीला असा विनाकारण त्रास द्यायचा कोणालाही अधिकार नाही, असं मला वाटलं.”

तुम्हालाही कधीकधी गौरव आणि इंदिरासारखे वाटते का? यांच्याप्रमाणेच अनेक पालकांना, आपल्या मुलाला अथवा मुलीला एखादी समस्या सोडवताना होणारा त्रास किंवा रडकुंडीस आलेला त्यांचा चेहरा पाहवत नाही. आणि मग अशा पालकांचे आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धावून येणे अगदी साहजिक आहे. पण, वर उल्लेखण्यात आलेल्या पालकांसमोर आलेल्या परिस्थितींमुळे, आपल्या मुलांना जबाबदार होण्यास शिकवण्याची अमूल्य संधी होती. अर्थात, ४ वर्षांचा मनीष आणि १३ वर्षांची जुई जे धडे शिकतील ते मात्र वेगवेगळे असतील.

पण, वस्तुस्थिती अशी आहे, की तुमच्या मुलांना जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर राहणार नाही. मुलाला आज नाही तर उद्या आपल्या आईबापास सोडावे लागणार आहे आणि स्वतःलाच ‘स्वतःचा भार वाहावा’ लागणार आहे. (गलतीकर ६:५; उत्पत्ति २:२४) मुलांना स्वतःची काळजी स्वतःच घेता यावी म्हणून पालकांनी त्यांना, निःस्वार्थी, काळजी घेणारे व जबाबदार प्रौढ होण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. पण हे बोलण्याइतके सोपे नाही!

याबाबतीत पालकांसाठी येशूने एक उत्तम उदाहरण मांडले. येशूचे आपल्या शिष्यांबरोबरचे व्यवहार तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याकरता त्याने अवलंबिलेले मार्ग यांचे अनुकरण पालक करू शकतात. येशूला स्वतःला मुले नसली तरी, शिष्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यामागे त्याचा एक हेतू होता. त्याने त्यांना जे काम पूर्ण करायला दिले होते ते त्यांनी त्याच्या पश्‍चातही चालू ठेवावे म्हणून त्याने त्यांना प्रशिक्षित केले. (मत्तय २८:१९, २०) आपल्या मुलांना जबाबदार बनण्यास शिकवण्याचे प्रत्येक पालकाचे ध्येय हे, येशूने जे साध्य केले त्यानुसार असण्याची आशा बाळगली पाहिजे. येशूने पालकांसाठी मांडलेल्या उदाहरणाच्या तीन पैलूंवर आपण विचार करू या.

मुलांसाठी ‘कित्ता घाला’ पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटी, येशू आपल्या शिष्यांना असे म्हणाला: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहान १३:१५) तसेच, जबाबदार असणे म्हणजे नेमके काय हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजे व आपल्या उदाहरणावरून दाखवले पाहिजे.

स्वतःला विचारा: ‘माझ्या जबाबदाऱ्‍या सांभाळण्याविषयी मी नेहमी सकारात्मक बोलत असतो का? दुसऱ्‍यांसाठी खपल्याने मिळणाऱ्‍या समाधानाविषयी मी बोलतो का? की, मी सतत कुरकुर करत असतो आणि ऐषोआरामात जीवन जगणाऱ्‍यांबरोबर स्वतःची तुलना करत असतो?’

या जगात कोणीही परिपूर्ण नाही, हे कबूल आहे. आपण सर्वच जण कधी ना कधी तरी दबावांखाली दबून जातो. पण कदाचित तुमचे उदाहरण पाहूनच मुलांना, जबाबदार बनण्याचे महत्त्व व त्याची किंमत समजेल.

हे करून पाहा: शक्य असेल तर आपल्या मुलाला अथवा मुलीला, तुम्ही जिथे नोकरी करता तेथे घेऊन जा आणि कुटुंबाचा गाडा उचलण्यासाठी तुम्हाला काय काम करावे लागते हे तिला/त्याला दाखवा. तुमच्या भागात काही समाज कार्य केले जात असेल किंवा गरजू लोकांना मदत करताना आपल्या मुलीला अथवा मुलाला तुमच्यासोबत काम करायला न्या. त्यानंतर मग, या कार्यात भाग घेतल्यामुळे तुम्हाला कोणता आनंद मिळाला त्याची चर्चा करा.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

व्यावहारिक अपेक्षा बाळगा येशूच्या आपल्या शिष्यांकडून काही अपेक्षा होत्या. पण त्या भूमिका निभावण्याकरता व त्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता तयार होण्यास त्यांना वेळ लागेल, याची त्याला जाणीव होती. एकदा तो त्यांना असे म्हणाला: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” (योहान १६:१२) येशूने आपल्या शिष्यांना लगेचच, त्याच्या मदतीविना काहीही करायला सांगितले नाही. उलट, त्याने त्यांना खूप सबुरीने अनेक गोष्टी शिकवल्या. आणि आता ते स्वतःहून, त्याने दिलेले कार्य करण्यास तयार झाले आहेत याची खात्री पटल्यावरच त्यांना पाठवले.

तसेच, प्रौढांच्या जबाबदाऱ्‍या पेलण्यास तयार होण्याआधीच पालकांनी जर मुलांकडून त्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली तर ती अपेक्षा अवास्तव ठरेल. पण याचा अर्थ असा होत नाही की पालकांनी आपल्या मुलांना काहीच काम देऊ नये. मुले जसजशी मोठी होतात तसतसे पालक, मुलांच्या वयोमानानुसार त्यांना कोणत्या जबाबदाऱ्‍या द्यायच्या हे ठरवू शकतात. जसे की, पालक मुलांना स्वच्छ राहण्यास, त्यांची स्वतंत्र खोली असेल तर ती स्वच्छ ठेवण्यास, वेळेचे भान ठेवण्यास व पैशांचा सुज्ञपणे उपयोग करण्यास शिकवू शकतात. मुले शाळेत जाऊ लागतात तेव्हा पालक मुलांना, गृहपाठ पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे हे शिकवू शकतात.

आणि पालकांनी मुलांना फक्‍त काम देऊन मोकळे होऊ नये तर ते काम यशस्वी होण्यास त्यांना मदत देखील केली पाहिजे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखण्यात आलेल्या गौरवला, मनीषला जेव्हा त्याची खेळणी आवरण्यास सांगितले जाते तेव्हा तो इतका कांगावा का करतो त्याचे कारण समजले. मनीषला एकट्याला, खेळणी गोळा करायचे काम, खूप वाटायचे व म्हणून तो चिडचिड करायचा. गौरव म्हणतो: “म्हणून मग, ‘मनीष, खेळणी उचल,’ असं फक्‍त त्याच्यावर रागावण्याऐवजी मी त्याच्याकडून ते काम करवून घेण्यासाठी एक शक्कल लढवली.”

काय केले गौरवने? “पहिल्यांदा मी, दररोज रात्री एक वेळ ठरवली, की त्यावेळेपर्यंत सर्व खेळणी गोळा करून झाल्या पाहिजेत. मग, मी मनीषबरोबर खोलीतल्या एकेका भागातील खेळणी गोळा करू लागलो. खेळणी गोळा करण्याचं काम मजेशीर बनवण्याकरता मी, मनीषला म्हटलं, ‘चल, कोण सर्वात जास्त खेळणी लवकर उचलतं ते पाहू या.’ मग काय, रोज रात्री झोपायच्या आधी आमचा हा खेळ चालायचा. मी मनीषला म्हटलं, की जर त्यानं पटापट खेळणी गोळा केली तर मी त्याला झोपताना आणखीन एक गोष्ट सांगेन. पण त्यानं जर टंगळमंगळ केली तर मग मी पण गोष्ट सांगायची वेळ कमी करायचो.”

हे करून पाहा: घरातली सर्व कामे सुरळीत चालावीत म्हणून तुमचे प्रत्येक मूल कोणकोणते काम करू शकेल, याचा आधी बसून अंदाज काढा. स्वतःला विचारा, ‘माझी मुलं स्वतःहून करू शकतात अशी काही कामं आहेत का जी मी अजूनही त्यांच्यासाठी करत आहे?’ जर होय तर मग, तुमचे मूल स्वतःहून ते काम करू शकेल याची तुम्हाला खात्री होईपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर ते काम करा. काम व्यवस्थित केले तर बक्षीस मिळेल, नाही तर शिक्षा, हे स्पष्टपणे सांगा. आणि मग शिक्षा द्यायची पाळी आली तर ती द्या, किंवा मग बक्षीस द्यायचे असेल तर ते द्या.

स्पष्ट सूचना द्या उत्तम शिक्षकाप्रमाणे येशूलाही हे माहीत होते, की आपण जी गोष्ट करायला शिकत असतो ती आपण केली पाहिजे. जसे की, प्रचारासाठी जाण्यास आपले शिष्य तयार आहेत असे जेव्हा येशूला वाटले तेव्हा “ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे-दोघे असे [त्याने] त्यांना आपणापुढे पाठविले.” (लूक १०:१) पण त्याने त्यांना असेच पाठवले नाही तर स्पष्ट सूचना देऊन पाठवले. (लूक १०:२-१२) शिष्य जेव्हा त्यांच्या प्रचार कार्याहून परतले आणि त्यांना मिळालेल्या यशाबद्दल जेव्हा येशूला अगदी उत्साहाने सांगू लागले तेव्हा येशूने त्यांची प्रशंसा केली व त्यांना उत्तेजन दिले. (लूक १०:१७-२४) दिलेले काम तुम्ही नक्की पूर्ण कराल, असा आत्म-विश्‍वास व्यक्‍त करत येशूने त्यांना स्वीकृती दर्शवली.

तुमच्या मुलांना जेव्हा काही कठीण काम करायचे असते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? त्यांनी निराश होऊ नये, अपयशी ठरू नये म्हणून तुम्ही, त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींपासून लगेच दूर करता का? तुमची पहिली प्रतिक्रिया, त्यांना “वाचवण्याचीच” असेल किंवा मग ते काम तुम्ही स्वतःच कराल.

पण जरा विचार करा: तुम्ही जर दर वेळी तुमच्या मुलांना या नाही तर त्या मार्गाने असे “वाचवत” राहाल, तर तुम्ही त्यांना नेमके काय शिकवत आहात? तुम्हाला त्यांच्यावर भरवसा आहे व त्यांना दिलेले काम ते नक्की पूर्ण करतील असा तुमचा त्यांच्यावर विश्‍वास असल्याचे तुम्ही दाखवत आहात का? की, तुम्ही त्यांना हा संदेश देत आहात की, ते एका कुकुल्या बाळासारखे आहेत ज्यांना सर्व गोष्टींसाठी आईवडिलांवरच अवलंबून राहावे लागते?

वर आपण इंदिराबद्दल चर्चा केली होती; तिने जुईची समस्या कशी सोडवली? मधे पडण्याऐवजी इंदिराने जुईलाच आपल्या शिक्षिकेबरोबर बोलायचे प्रोत्साहन दिले. शाळेत गेल्यावर बाईंना कोणकोणते प्रश्‍न विचारायचे, याची दोघा मायलेकींनी बसून यादी बनवली. मग, जुईने आपल्या बाईंबरोबर कधी बोलावे याची त्यांनी चर्चा केली. जुई आणि तिच्या बाई या दोघींमध्ये काय काय बोलणे होईल, त्याचा या दोघा मायलेकींनी घरी सरावही केला. इंदिरा म्हणते: “यामुळं काय झालं, की जुईला आपल्या बाईंबरोबर बोलायचं धाडस मिळालं. आणि तिच्या बाईंनीही जुईनं जो पुढाकार घेतला तो पाहून तिचं कौतुक केलं. यामुळे जुईला स्वतःचा अभिमान वाटला, आणि तिचा आनंद पाहून मला तिचा अभिमान वाटू लागला.”

हे करून पाहा: तुमच्या मुलाला अथवा मुलीला सध्या कोणती समस्या भेडसावत आहे ते एका कागदावर लिहा. त्याच्या बाजूलाच मग, तुम्ही तिला अथवा त्याला “वाचवायचा” प्रयत्न न करता कोणती मदत करू शकता ते लिहा. त्या समस्येवर मात करण्याकरता कोणकोणती पावले उचलायची त्यांचा आपल्या मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर सराव करा. ‘तू ही समस्या नक्की सोडवशील,’ असे म्हणून आपल्या मुलावरील भरवसा व्यक्‍त करा.

तुम्ही जर तुमच्या मुलांना नेहमी वाचवत राहिलात तर वास्तविक पाहता, जीवनात येणारे कठीण प्रसंग झेलण्याची त्यांची कुवत तुम्ही कमी करत असता. याऐवजी, तुमच्या मुलांना जबाबदार बनवण्याद्वारे तुम्ही, आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास त्यांची मदत करा. हीच सर्वात मौल्यवान देणगी तुम्ही त्यांना देऊ शकता. (w१०-E ०५/०१)

[तळटीप]

^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.

स्वतःला विचारा . . .

▪ मी माझ्या मुलांकडून व्यावहारिक अपेक्षा करतो का?

▪ यशस्वी कसे व्हायचे हे मी फक्‍त बोलूनच दाखवतो की माझ्या कार्यातूनही दाखवतो?

▪ मी माझ्या मुलाला प्रोत्साहन केव्हा दिले होते किंवा त्याची प्रशंसा केव्हा केली होती?