व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालकांसाठी

मुलांना नम्र बनायला शिकवणं

मुलांना नम्र बनायला शिकवणं

हे कठीण का आहे?

  • तुमचा मुलगा फक्‍त दहा वर्षांचा असूनही खूप उद्धटपणे वागतो!

  • सर्वांनी त्याचे लाड पुरवावेत, असं त्याला वाटतं.

तुम्ही विचार कराल, की ‘माझा मुलगा असा का वागतो?’ ‘त्याने स्वाभिमानी व्हावं असं, मला वाटतं. पण याचा अर्थ त्याने स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ नको समजायला!’

मुलाचा स्वाभिमान न दुखावता, त्याला नम्र राहायला शिकवणं शक्य आहे का?

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

अलीकडच्या काही दशकांपासून पालकांना असं सांगितलं जात आहे, की त्यांनी आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. तसंच, त्यांचं भरभरून कौतुक केलं पाहिजे, प्रशंसा करण्यासारखं काही केलं नसलं तरी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. त्यासोबतच, त्यांनी मुलांवर रागावू नये किंवा त्यांना शिक्षा करू नये असंही पालकांना सांगितलं जात आहे. जर मुलांना खूप खास असल्याची वागणूक दिली, तर ती मोठी झाल्यावर योग्य आत्मसन्मान बाळगणारी बनतील, असा खरंतर यामागचा विचार होता. पण असं घडलं का? जनरेशन मी या पुस्तकात, याविषयी असं म्हटलं आहे: “मानसिक आणि भावनिक रीत्या स्थिर व आनंदी मुलं घडण्याऐवजी, या आत्मसन्मानाच्या चळवळीमुळे छोट्या आत्मपूजकांचं सैन्य तयार झालं आहे.”

ज्या मुलांची विनाकारण किंवा सतत प्रशंसा केली जाते, अशी बरीच मुलं मोठी झाल्यावर निराशा, टीका, अधूनमधून येणारं अपयश यांसाठी तयार नसतात. स्वतःच्याच इच्छांवर, आकांक्षांवर लक्ष केंद्रित करायला शिकल्यामुळे, ही मुलं मोठी झाल्यावर नाती टिकवून ठेवू शकत नाहीत. आणि याचा परिणाम असा झाला आहे, की कित्येक जण चिंता आणि नैराश्‍याला बळी पडले आहेत.

‘तुम्ही खास आहात,’ असं सतत म्हटल्याने मुलांमध्ये आत्मसन्मान किंवा स्वाभिमान विकसित होत नाही. त्यांनी खरोखर कौतुक करण्यासारखं काही काम केलं असेल, तेव्हाच तो विकसित होतो. आणि असं एखादं काम करण्यासाठी आत्मविश्‍वास असण्यासोबत आणखीन काही गोष्टी गरजेच्या आहेत. मुलांनी एखादी कला किंवा कौशल्य निवडलं असेल, तर त्यांनी ते मेहनत घेऊन शिकलं पाहिजे. इतकंच नाही तर सतत सराव आणि अभ्यास करून त्यात आणखीन कुशल व्हायला शिकलं पाहिजे. (नीतिसूत्रे २२:२९) तसंच, त्यांनी दुसऱ्‍यांच्या गरजांचाही विचार केला पाहिजे. (१ करिंथकर १०:२४) आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी विशेषतः नम्रतेची गरज आहे.

तुम्ही काय करू शकता?

योग्य कारण असताना प्रशंसा करा. जर तुमच्या मुलीला शाळेच्या परीक्षेत चांगले मार्क पडले असतील, तर तिचं कौतुक करा. पण जर का तिला कमी मार्क मिळाले असतील, तर लगेच टिचरवर दोष लावू नका. यामुळे तुमच्या मुलीला नम्र राहायला कठीण जाईल. त्याऐवजी पुढच्या वेळी चांगले मार्क मिळवण्यासाठी ती कशी मेहनत घेऊ शकते ते समजायला तिला मदत करा. आपली प्रशंसा राखून ठेवा. पुढे जाऊन जेव्हा तुमची मुलगी एखादं चांगलं काम करेल तेव्हा तिची प्रशंसा करा.

योग्य वेळी सुधारणा करा. मुलांनी चुका केल्यावर प्रत्येक वेळी त्यांची टीका केलीच पाहिजे, असा याचा अर्थ होत नाही. (कलस्सैकर ३:२१) पण त्यांनी गंभीर चूक केली, तर मात्र त्या वेळी त्यांना सुधारणं गरजेचं आहे. हीच गोष्ट चुकीची मनोवृत्ती बाळगण्याच्या बाबतीतही खरी आहे. वेळीच असं केलं नाही, तर ती चुकीची मनोवृत्ती त्यांच्यात खोलवर रुजू शकते.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला कळलं की तुमचा मुलगा फुशारकी मारतो. आणि जर तुम्ही वेळीच त्याला सुधारलं नाही, तर तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागेल आणि एक्कलकोंडा बनेल. त्यामुळे तुमच्या मुलाला समजावून सांगणं गरजेचं आहे, की फुशारकी मारल्याने लोक आपल्याला नावं ठेवू शकतात आणि आपली फजितीही होऊ शकते. (नीतिसूत्रे २७:२) तसंच, स्वतःबद्दल समतोल दृष्टिकोन असलेली व्यक्‍ती कधीच आपल्या कौशल्यांबद्दल इतरांसमोर गाजावाजा करत नाही. प्रेमळपणे त्यांची सुधारणा केल्यामुळे त्यांना नम्र व्हायला मदत होईल. शिवाय त्यांच्या स्वाभिमानालाही ठेच पोचणार नाही.—बायबल तत्त्व: मत्तय २३:१२.

मुलांना जीवनाच्या चढ-उतारांसाठी तयार करा. तुम्ही मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, तर त्यांना वाटेल की तो त्यांचा हक्क आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाला अशी एखादी गोष्ट हवी आहे, जी तुम्हाला परवडणारी नाही, तर त्याला हे समजायला मदत करा की आपण आपल्या बजेटनुसार खर्च करणं का गरजेचं आहे. जर तुम्ही ट्रिपला जाण्याची योजना रद्द केली असेल तर मुलांना सांगा, की प्रत्येक हवी असलेली गोष्ट मिळतेच असं नाही. आपण कधीकधी निराश होतो आणि हा जीवनाचाच एक भाग आहे. मग अशा निराशेवर तुम्ही स्वतः कशी मात करता, यावर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. मुलांना आपल्या पंखांखाली घेऊन प्रत्येक समस्येपासून त्यांचं रक्षण करण्याऐवजी, त्यांना समस्यांना सामोरे जाऊ द्या. असं केल्यामुळे, जीवनातल्या खडतर प्रवासासाठी ते तयार होतील.—बायबल तत्त्व: नीतिसूत्रे २९:२१.

देण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन द्या. तुमच्या मुलाला खात्री पटवून द्या, की “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रेषितांची कार्ये २०:३५) तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही कदाचित अशा लोकांची यादी बनवू शकता, ज्यांना काही कामांत मदतीची गरज आहे. जसं की, खरेदी करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा दुरुस्तीच्या कामासाठी. त्यानंतर गरज असलेल्यांना साहाय्य करताना तुम्ही आपल्या मुलाला सोबत नेऊ शकता. असं केल्यामुळे इतरांना मदत करताना तुम्हाला मिळणारा आनंद आणि समाधान तो पाहील. आपल्या उदाहरणाने तुम्ही तुमच्या मुलाला नम्र बनायला शिकवाल. आणि शिकवण्याचा हा सर्वात प्रभावशाली मार्ग आहे.—बायबल तत्त्वं: लूक ६:३८.