व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यशया ६०:१ मध्ये सांगितलेली “स्त्री” कोण आहे, ती कधी ‘उठली’ आणि तिने आपला प्रकाश कसा ‘झळकवला’?

यशया ६०:१ मध्ये सांगितलंय: “हे स्त्री, ऊठ! आपला प्रकाश झळकू दे, कारण तुझा प्रकाश आला आहे. यहोवाच्या वैभवाचं तेज तुझ्यावर चमकत आहे.” संदर्भावरून लक्षात येतं, की या वचनात “स्त्री” असं जे म्हटलंय, ते सीयोन किंवा यरुशलेम शहर होतं आणि ते त्या वेळी यहूदाचं राजधानी शहर होतं. a (यश. ६०:१४; ६२:१, २) हे शहर संपूर्ण इस्राएल राष्ट्राला सूचित करतं. त्यामुळे यशयाच्या शब्दांवरून दोन प्रश्‍न निर्माण होतात: पहिला, यरुशलेमने कधी आणि कसं ‘उठून आपला लाक्षणिक प्रकाश झळकवला’? दुसरा, यशयाच्या शब्दांची आज आपल्या दिवसांत मोठी पूर्णता आहे का?

यरुशलेमने कधी आणि कसं ‘उठून आपला प्रकाश झळकवला’?  यहुदी जेव्हा ७० वर्षं बाबेलच्या गुलामगिरीत होते तेव्हा यरुशलेम आणि तिथलं मंदिर उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून होतं. पण जेव्हा बाबेलवर मेद आणि पर्शिया राज्य करू लागलं, तेव्हा संपूर्ण बाबेलमधले इस्राएली लोक गुलामगिरीतून मुक्‍त झाले आणि त्यांच्या मायदेशी परतून त्यांनी खरी उपासना पुन्हा सुरू केली. (एज्रा १:१-४) इ.स.पू. ५३७ पासून, इस्राएलच्या १२ वंशातले उरलेले विश्‍वासू लोकसुद्धा यरुशलेमला परत येऊ लागले. (यश. ६०:४) ते यहोवाला अर्पणं देऊ लागले, उत्सव साजरा करू लागले आणि मंदिर पुन्हा बांधू लागले. (एज्रा ३:१-४, ७-११; ६:१६-२२) अशा प्रकारे, परत एकदा यहोवाच्या वैभवाचं तेज यरुशलेमवर म्हणजे त्याच्या लोकांवर चमकू लागलं. मग हेच लोक आध्यात्मिक अंधकारात असलेल्या राष्ट्रातल्या लोकांसाठी प्रकाश बनले.

पण त्या वेळी यशयाच्या भविष्यवाण्या प्राचीन यरुशलेमवर काही प्रमाणातच पूर्ण झाल्या. कारण इस्राएल राष्ट्रातले लोक देवाच्या आज्ञांचं पालन करत राहिले नाहीत. (नेह. १३:२७; मला. १:६-८; २:१३, १४; मत्त. १५:७-९) नंतर तर त्यांनी मसीहाला म्हणजे येशूलाही नाकारलं. (मत्त. २७:१, २) मग इ.स. ७० मध्ये यरुशलेम आणि तिथल्या मंदिराचा दुसऱ्‍यांदा नाश झाला.

हे होईल याबद्दल यहोवाने आधीच सांगितलं होतं. (दानी. ९:२४-२७) हे स्पष्टच आहे की यशया अध्याय ६० मधल्या पुन्हा वसण्याच्या भविष्यवाणीचे प्रत्येक पैलू पृथ्वीवरची यरुशलेम पूर्ण करेल हा यहोवाचा उद्देश नव्हता.

यशयाच्या शब्दांची आज आपल्या दिवसांत मोठी पूर्णता आहे का?  हो, पण दुसऱ्‍या एका लाक्षणिक स्त्रीच्या म्हणजे ‘वरच्या यरुशलेमच्या बाबतीत’  हे पूर्ण होत आहे. पौलने तिच्याबद्दल म्हटलं: “ती आपली आई आहे.” (गलती. ४:२६) वरची यरुशलेम ही देवाच्या संघटनेचा असा भाग आहे, जो स्वर्गात आहे आणि त्यात त्याचे एकनिष्ठ स्वर्गदूत आहेत. तिच्या मुलांमध्ये येशू आणि देवाच्या पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त असलेल्या १,४४,००० ख्रिश्‍चनांचा समावेश होतो. या ख्रिश्‍चनांना पौलसारखीच स्वर्गातल्या जीवनाची आशा आहे. आणि त्यांचं मिळूनच “पवित्र राष्ट्र” म्हणजे ‘देवाचं इस्राएल’ बनतं.—१ पेत्र २:९; गलती. ६:१६.

वरची यरुशलेम कधी ‘उठली’ आणि तिने आपला प्रकाश कसा ‘झळकवला’? तिने पृथ्वीवरच्या आपल्या अभिषिक्‍त मुलांद्वारे आपला प्रकाश झळकवला. यशया अध्याय ६० मध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती तिची आणि या मुलांना आलेल्या अनुभवाची तुलना करा.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ‘उठावं’ लागणार होतं, कारण ते आध्यात्मिक रितीने अंधकारमय स्थितीत गेले होते. तसंच भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे दुसऱ्‍या शतकात धर्मत्यागाचं जंगली गवत खूप जास्त वाढलं होतं. (मत्त. १३:३७-४३) आणि अशा प्रकारे ते मोठ्या बाबेलच्या म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या बंदिवासात गेले. आणि ते ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीची’ सुरुवात होईपर्यंत बंदिवासात होते. ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीची’ सुरुवात १९१४ मध्ये झाली. (मत्त. १३:३९, ४०) त्यानंतर लगेचच १९१९ मध्ये त्यांना बंदिवासातून मुक्‍त करण्यात आलं आणि त्यांनी लगेचच स्वतःला प्रचारकार्यात झोकून दिलं, तेव्हा त्यांचा आध्यात्मिक प्रकाश झळकू लागला. b त्यानंतरच्या वर्षांमध्ये सगळ्या राष्ट्रांतले लोक या प्रकाशाकडे आले आहेत. यात देवाच्या इस्राएलच्या उरलेल्या लोकांचा म्हणजे यशया ६०:३ मध्ये उल्लेख केलेल्या ‘राजांचा’ समावेश होतो.​—प्रकटी. ५:९, १०.

भविष्यात अभिषिक्‍त ख्रिस्ती यहोवाकडून मिळालेला हा प्रकाश आणखी मोठ्या प्रमाणात झळकवतील. तो कसा? जेव्हा पृथ्वीवरचं त्यांचं जीवन संपेल तेव्हा ते ‘नवीन यरुशलेम’ म्हणजेच १,४४,००० राजे आणि याजकांनी मिळून बनलेल्या ख्रिस्ताच्या वधूचा भाग बनतील.​—प्रकटी. १४:१, २१:१, २, २४; २२:३-५.

यशया ६०:१ मधली भविष्यवाणी पूर्ण करण्यात नवीन यरुशलेम एक महत्त्वाची भूमिका पार पाडेल. (यशया ६०:१, ३, ५, ११, १९, २० ची प्रकटीकरण २१:२, ९-११, २२-२६ सोबत तुलना करा.) ज्या प्रकारे पृथ्वीवरचं यरुशलेम हे जुन्या इस्राएली राष्ट्राचं सरकारी केंद्र होतं, त्याच प्रकारे नवीन यरुशलेम आणि ख्रिस्त नवीन व्यवस्थेचं सरकार बनेल. नवीन यरुशलेमबद्दल म्हटलंय की “ती स्वर्गातून, देवापासून खाली” उतरते. मग याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ ती आपलं पूर्ण लक्ष पृथ्वीकडे वळवते. त्यामुळे देवाला भिऊन वागणारे सर्व राष्ट्रांमधले लोक तिच्या “प्रकाशाने चालतील.” तसंच ते पाप आणि मृत्यूपासूनही मुक्‍त होतील. (प्रकटी. २१:३, ४, २४) याचा परिणाम म्हणजे यशया आणि इतर संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” होतील. (प्रे. कार्यं ३:२१) हा मोठा बदल ख्रिस्त जेव्हा राजा बनला तेव्हा सुरू झाला आणि त्याचा शेवट त्याच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी होईल.

a नवे जग भाषांतरात  यशया ६०:१ मध्ये “सीयोन” किंवा “यरुशलेम” या शब्दांऐवजी “स्त्री” हा शब्द वापरण्यात आलाय. कारण ‘उठणं’ आणि ‘झळकवणं’ या शब्दांसाठी जी हिब्रू क्रियापदं वापरण्यात आली आहेत, ती क्रियापदं आणि “तुझ्यावर” हा शब्दसुद्धा स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे इथे “स्त्री” हा शब्द वाचकाला हे समजून घ्यायला मदत करतो की इथे लाक्षणिक स्त्रीबद्दल बोलण्यात आलंय.

b १९१९ ला देवाच्या लोकांमध्ये शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली. आणि त्याचं वर्णन यहेज्केल ३७:१-१४ आणि प्रकटीकरण ११:७-१२ मध्येही दिलंय. यहेज्केलने अशी भविष्यवाणी केली की बंदिवासाच्या एका मोठ्या काळानंतर सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चन  पुन्हा यहोवाची शुद्ध उपासना करू लागतील. आणि प्रकटीकरणाची भविष्यवाणी अभिषिक्‍त भावांच्या एका छोट्या गटाला  लाक्षणिक रितीने पुन्हा उठवण्यात आलं त्याला सूचित करते. अन्यायीपणे तुरुंगात टाकल्यामुळे अतिशय थोड्या काळासाठी त्यांना काहीच काम करता आलं नाही. पण नंतर त्यांनी देवाच्या संघटनेत पुढाकार घेतला.  मग १९१९ मध्ये त्यांना “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नेमण्यात आलं.​—मत्त. २४:४५; शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!  पान ११८ बघा.