व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

फिलिप्प इथियोपियाच्या अधिकाऱ्‍याला भेटला तेव्हा तो कोणत्या प्रकारच्या रथातून प्रवास करत होता?

बायबलच्या नवे जग भाषांतर  यात “रथ” असं भाषांतर केलेला मूळ भाषेतला शब्द, वेगवेगळ्या वाहनांसाठी वापरला जायचा. (प्रे. कार्यं ८:२८, २९, ३८) असं दिसतं, की इथियोपियाचा अधिकारी ज्या रथातून जात होता तो रथ सैनिकांसाठी किंवा शर्यतीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या रथापेक्षा मोठा होता. असं का म्हणता येईल, याची काही कारणं लक्षात घ्या.

इथियोपियाचा हा माणूस मोठा अधिकारी होता आणि त्याने लांबचा प्रवास केला होता.  तो “कूशी लोकांची राणी कांदके हिच्या दरबारातला एक अधिकारी होता आणि तिच्या खजिन्यावर देखरेख करायचा.” (प्रे. कार्यं ८:२७) प्राचीन इथियोपियामध्ये आजच्या इजिप्त देशाचा दक्षिणेकडचा भाग आणि सुदान देश समाविष्ट होता. या अधिकाऱ्‍याने कदाचित संपूर्ण प्रवासासाठी एकापेक्षा जास्त रथांचा वापर केला असेल. पण या लांबच्या प्रवासासाठी त्याच्यासोबत बरंच सामान असावं हे नक्की. पहिल्या शतकात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ज्या वाहनांचा वापर केला जायचा त्यात चार चाकांची घोडागाडीसुद्धा होती. आणि सावलीसाठी या घोडागाडीला वर टपासारखं छतसुद्धा असायचं. प्रेषितांची कार्यं या पुस्तकाबद्दल सविस्तर वर्णन देणाऱ्‍या एका पुस्तकात (ॲक्टस्‌—ॲन एक्सेजेटिकल कमेंट्री ) अशा गाड्यांबद्दल म्हटलंय, की “या घोडागाड्यांमध्ये जास्त सामान ठेवता यायचं आणि प्रवाससुद्धा सोईस्कर व्हायचा. त्यामुळे एखाद्याला खूप लांबपर्यंत प्रवास करता यायचा.”

जेव्हा फिलिप्प त्याच्याकडे आला तेव्हा हा इथियोपियाचा अधिकारी वाचत होता.  अहवालात असं म्हटलंय, की “फिलिप्प जाऊन त्या रथासोबत धावू लागला. तेव्हा तो [अधिकारी] यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून वाचत असल्याचं त्याने ऐकलं.” (प्रे. कार्यं ८:३०) या घोडागाड्या वेगाने प्रवास करण्यासाठी नसायच्या, तर त्या संथ गतीने चालवल्या जायच्या. त्यामुळेच हा अधिकारी वाचू शकत होता. आणि फिलिप्पलाही पळत त्याच्यापर्यंत पोचता आलं.

या अधिकाऱ्‍याने “फिलिप्पला रथात चढून आपल्यासोबत बसायचा आग्रह केला.”  (प्रे. कार्यं ८:३१) शर्यतीसाठी असलेल्या रथात, रथ चालवणाऱ्‍याला उभं राहावं लागायचं. पण प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्‍या या घोडागाडीत त्या अधिकाऱ्‍याला आणि फिलिप्पला बसण्यासाठी पुरेशी जागा असावी.

म्हणूनच प्रेषितांची कार्यं आठव्या अध्यायात लिहिण्यात आलेल्या अहवालाच्या आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर असं म्हणता येईल, की इथियोपियाच्या अधिकाऱ्‍याने सैनिकांच्या किंवा शर्यतीच्या रथापेक्षा मोठ्या असलेल्या घोडागाडीचा वापर केला असावा. आणि त्यामुळेच आपल्या प्रकाशनांमध्ये आता तसंच चित्र दाखवलं जातं.