व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही

माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही

१९४१ साली बारा वर्षांचा असताना माझा बाप्तिस्मा झाला. पण, खरंतर १९४६ साली बायबलमधलं सत्य मला स्पष्टपणे समजलं. यामागे काय कारण होतं, ते समजण्यासाठी मी माझ्या जीवनाबद्दल थोडक्यात सांगतो.

१९१० सालच्या आसपास माझे आईवडील जॉर्जियामधील तिफलिस हे शहर सोडून पश्‍चिम कॅनडाला स्थलांतरित झाले. तिथं ते सॅसकॉचवॉन इथल्या पेले या गावात शेतमळ्यावर असलेल्या एका लहानशा घरात राहू लागले. माझा जन्म १९२८ साली झाला. सहा भावंडांमध्ये मी सर्वात लहान होतो. माझ्या जन्माच्या सहा महिन्यांआधी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी अगदी तान्हं बाळ असतानाच माझी आईसुद्धा वारली. याच्या काही काळातच लुसी या माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचाही मृत्यू झाला. त्या वेळी ती १७ वर्षांची होती. त्यामुळे मग नीक या माझ्या मामांनी आम्हा भावंडांना त्यांच्या घरी नेलं आणि तेच आमचा सांभाळ करू लागले.

मी अगदी लहान होतो तेव्हा एक दिवस मी आमच्या घोड्याची शेपूट ओढत असल्याचं माझ्या घरच्यांनी पाहिलं. तो घोडा मला लाथ मारेल अशी भीती त्यांना वाटली आणि मी त्याची शेपूट ओढण्याचं थांबवावं म्हणून ते मला ओरडून सांगू लागले. मी त्यांना पाठमोरा उभा होतो आणि त्यांचं ओरडणं मला ऐकू आलं नाही. चांगली गोष्ट म्हणजे त्या घोड्याने मला लाथ मारली नाही. पण, त्या दिवशी मला ऐकू येत नसल्याचं माझ्या घरच्यांना समजलं.

मला बहिऱ्यांसाठी असलेल्या शाळेत दाखल केलं तर ते माझ्यासाठी चांगलं राहील, असं माझ्या मामांच्या एका जवळच्या मित्राने त्यांना सुचवलं. त्यामुळे मग मामांनी सॅस्केटून या शहरात बहिऱ्यांसाठी असलेल्या शाळेत मला टाकलं. ही शाळा आमच्या घरापासून खूप लांब होती. त्या वेळी मी फक्त पाच वर्षांचा असल्यामुळे मला खूप भीती वाटली. मी फक्त सणांदरम्यान आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये माझ्या घरच्यांना भेटायला जाऊ शकत होतो. नंतर मात्र जेव्हा मी साईन लँग्वेज (संकेत भाषा) शिकलो, तेव्हा इतर मुलांबरोबर खेळायला मला आवडू लागलं.

बायबल सत्य मला समजलं

१९३९ साली बिल डॅनिएलचक याच्यासोबत माझ्या मोठ्या बहिणीचं, मिरियनचं लग्न झालं. मग तेच माझा आणि फ्रान्सीस या आमच्या दुसऱ्या बहिणीचा सांभाळ करू लागले. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू करणारे ते आमच्या कुटुंबातील पहिले होते. उन्हाळ्याच्या सुट्यांदरम्यान जेव्हा मी घरी जायचो, तेव्हा ते फार मेहनत घेऊन बायबलमधून शिकत असलेलं सत्य मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना साईन लँग्वेज येत नसल्यामुळे आम्हाला एकमेकांशी संवाद साधणं खूप कठीण होतं. पण, यहोवाबद्दल ज्या गोष्टी मी शिकत होतो त्या मला मनापासून आवडत आहेत हे ते पाहू शकत होते. ते जे करत आहेत ते बायबलनुसारच असावं हे मला जाणवलं. त्यामुळे मग मीसुद्धा त्यांच्यासोबत प्रचार कार्याला जाऊ लागलो. त्यानंतर मलाही बाप्तिस्मा घेण्याची इच्छा होती. म्हणून मग ५ सप्टेंबर १९४१ साली बिलनं मला एका स्टीलच्या टाकीत बाप्तिस्मा दिला. त्या टाकीत विहिरीतलं पाणी भरण्यात आलं होतं आणि ते अतिशय थंड होतं.

१९४६ साली ओहायोमधील क्लीवलँड इथं झालेल्या अधिवेशनात इतर बहिऱ्या लोकांसोबत

१९४६ साली उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जेव्हा मी घरी आलो, तेव्हा आम्ही अमेरिकेच्या ओहायो इथल्या क्लीवलँडमध्ये झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. कार्यक्रमात काय चाललं आहे ते मला समजावं, म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माझ्या बहिणी आळीपाळीनं माझ्यासाठी त्या गोष्टी लिहित होत्या. पण, दुसऱ्या दिवशी मला समजलं की अधिवेशनात माझ्यासारखे इतरही काही लोक आहेत, आणि त्यांच्यासाठी भाषणांचं साईन लँग्वेजमध्ये भाषांतर केलं जात आहे. हे माहीत झाल्यावर मला खूप आनंद झाला. त्यामुळे मी कार्यक्रमाचा पूर्ण फायदा घेऊ शकलो. आणि शेवटी तिथं बायबलमधील सत्यं मला स्पष्टपणे समजण्यास मदत झाली!

इतरांना सत्य शिकवणं

त्या वेळी दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना जोर पकडत होती. पण अधिवेशनानंतर जेव्हा मी पुन्हा शाळेत गेलो, तेव्हा यहोवालाच विश्वासू राहण्याचा माझा निर्धार पक्का झाला होता. त्यामुळे मी झेंडावंदन करणं, राष्ट्रगीत गाणं आणि सण साजरा करणं हे पूर्णपणे थांबवलं. तसंच, इतर मुलांसोबत चर्चमध्ये जाण्याचंही मी थांबवलं. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे मग ते माझ्यावर दबाव आणून व खोटं बोलून माझा निर्धार तोडण्याचा प्रयत्न करू लागले. शाळेतील इतर मुलंदेखील या सर्व गोष्टी पाहत होते आणि त्यामुळे त्यांना साक्ष देण्याच्या अनेक संधी मला मिळत होत्या. माझ्या काही शाळासोबत्यांनी नंतर सत्य स्वीकारलं आणि आजही ते यहोवाची सेवा करत आहेत. त्यांपैकी काही म्हणजे, लॅरी अँड्रेसोफ, नॉर्मन डिटरिक आणि एमिल श्‍नाईडर.

मी जेव्हा दुसऱ्या शहरांमध्ये जायचो, तेव्हा तिथं असलेल्या बहिऱ्या लोकांना साक्ष देण्यासाठी मी खास मेहनत घ्यायचो. उदाहरणार्थ, माँट्रियल या शहरात असताना मी अशा ठिकाणी गेलो जिथं काही बहिरे लोक एकत्र जमायचे. तिथं मी एडी टॅगर या तरुण मुलाला भेटलो. त्या वेळी तो एका गुन्हेगार टोळीचा सदस्य होता. पण, नंतर मात्र तो यहोवाची सेवा करू लागला. मागील वर्षी त्याचा मृत्यू झाला तोपर्यंत तो क्विबेकमधील लवाल इथं असलेल्या साईन लँग्वेज मंडळीत सेवा करत होता. मी क्वॅन आर्डिनाझ या आणखी एका तरुणालाही भेटलो. प्राचीन काळातील बिरुयामधील लोकांप्रमाणे त्यानेही संशोधन केलं, आणि ज्या गोष्टी तो शिकत होता त्या बायबलवर आधारित आहेत की नाही याची खात्री केली. (प्रे. कार्ये १७:१०, ११) नंतर त्यानेही सत्य स्वीकारलं. आणि आँटेरियोमधील ओटावा इथं असलेल्या मंडळीत त्याने शेवटपर्यंत विश्वासूपणे एक वडील या नात्यानं सेवा केली.

१९५० दशकाच्या सुरुवातीच्या काळात रस्त्यावरील साक्षकार्य करताना

१९५० साली मी व्हँकूव्हर इथं राहायला गेलो. मला बहिऱ्या लोकांना प्रचार करायला खूप आवडायचं. असं असलं तरी, ऐकता व बोलता येत असलेल्या एका स्त्रीला प्रचार करण्याचा जो अनुभव मला आला, तो मी कधीही विसरू शकणार नाही. तिचं नाव क्रीस स्पाईसर होतं. ती रस्त्यावरून जात असताना मी तिला साक्ष दिली. ती संघटनेच्या मासिकांची वर्गणीधारक बनली. मी तिच्या पतीला, गॅरीला भेटून त्यालाही साक्ष द्यावी अशी तिची इच्छा होती. म्हणून मग मी त्यांच्या घरी गेलो. आम्हाला एकमेकांशी जे बोलायचं होतं, ते आम्ही कागदावर लिहून एकमेकांना द्यायचो. अशा प्रकारे आम्ही बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. त्यानंतर काही वर्षांदरम्यान आमची भेट झाली नाही. पण, आँटेरियोमधील टराँटो इथल्या अधिवेशनात अचानक माझी त्या दोघांशी भेट झाली. त्यांना पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. खरंतर त्या दिवशी गॅरीचा बाप्तिस्मा होणार होता. या अनुभवावरून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे आपण प्रचार करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्यांना प्रचार करतो त्यांपैकी कधी कोण सत्य स्वीकारेल हे आपल्याला माहीत नाही.

नंतर मी पुन्हा सॅस्केटून इथं राहायला गेलो. तिथं माझी भेट एका स्त्रीसोबत झाली आणि तिनं मला बहिऱ्या असलेल्या तिच्या दोन जुळ्या मुलींचा बायबल अभ्यास घेण्यास सांगितलं. त्यांचं नाव जीन आणि जोअॅन रोथनबर्गर असं होतं. त्या दोघी त्याच शाळेत शिकत होत्या जिथं माझं शिक्षण झालं होतं. त्यानंतर, लवकरच त्या दोघी आपल्या वर्गसोबत्यांना बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी सांगू लागल्या. याचा परिणाम म्हणजे त्यांच्या वर्गातील पाच मुली यहोवाच्या साक्षीदार बनल्या. युनिस कोलीन हीदेखील त्यांपैकी एक होती. शाळेतील माझ्या शेवटल्या वर्षी युनिससोबत माझी पहिल्यांदा भेट झाली होती. त्या वेळी तिने मला चॉकलेटचा एक तुकडा दिला होता आणि मला तिच्याशी मैत्री करायला आवडेल का, असं विचारलं होतं. युनिस नंतर माझ्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग बनली; ती माझी पत्नी झाली.

१९६० आणि १९८९ मध्ये युनिससोबत

युनिस बायबल अभ्यास करत आहे असं तिच्या आईला समजलं. तेव्हा तिने शाळेतील प्राचार्याला विनंती केली की त्यांनी युनिसला बायबल अभ्यास बंद करावा यासाठी समजावून सांगावं. प्राचार्याने युनिसला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी तर तिच्याकडे असलेलं बायबल अभ्यासाचं साहित्यही जप्त केलं. पण, युनिस मात्र यहोवाला विश्वासू राहण्याच्या तिच्या निर्धारावर ठाम राहिली. जेव्हा तिला बाप्तिस्मा घ्यायचा होता तेव्हा तिच्या पालकांनी तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं, की जर ती यहोवाची साक्षीदार बनली तर तिला घर सोडावं लागेल. त्यामुळे युनिसने तिच्या आईवडिलांचं घर सोडलं आणि एका साक्षीदार कुटुंबासोबत राहू लागली. त्या वेळी ती १७ वर्षांची होती. तिथं तिने बायबल अभ्यास सुरू ठेवला आणि नंतर बाप्तिस्मा घेतला. १९६० साली युनिससोबत माझं लग्न झालं. आमच्या लग्नाला तिचे आईवडील आले नव्हते. पण, जसजशी वर्षं सरत गेली तसतसं आमच्या विश्वासांबद्दल त्यांना कदर वाटू लागली. तसंच, आम्ही आमच्या मुलांचं कसं संगोपन करत आहोत ते पाहिल्यावर आमच्याबद्दल त्यांना आदर वाटू लागला.

यहोवाने नेहमी माझी काळजी घेतली आहे

माझा मुलगा निकोलस आणि त्याची पत्नी डेबोरा लंडन बेथेलमध्ये सेवा करताना

आम्ही दोघेही बहिरे असल्यामुळे आमच्या सात मुलांचं संगोपन करणं आमच्यासाठी एक आव्हानच होतं. आमच्या सर्व मुलांना ऐकायला येत होतं. पण, त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि त्यांना सत्य शिकवणं आम्हाला शक्य व्हावं, म्हणून त्यांनाही साईन लँग्वेज येईल याकडे आम्ही लक्ष दिलं. यासोबतच, मंडळीतील बांधवांनीही आम्हाला पुष्कळ मदत केली. याचं एक उदाहरणार्थ म्हणजे, आमचा मुलगा राज्य सभागृहात वाईट शब्द बोलत असल्याचं एकदा एका पालकाने आम्हाला कागदावर लिहून सांगितलं. त्यामुळे आम्ही लगेच त्याकडे लक्ष देऊ शकलो. सध्या आमची चार मुलं, जेम्स, जेरी, निकोलस आणि स्टीवन हे मंडळीत वडील आहेत. आणि ते आपल्या पत्नींसोबत व संपूर्ण कुटुंबासोबत विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. तसंच, निकोलस आणि त्याची पत्नी डेबोरा हे सध्या ब्रिटन इथल्या शाखा कार्यालयात साईन लँग्वेज भाषांतराच्या कामात मदत करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच स्टीवन आणि त्याची पत्नी शॅनन हे दोघं अमेरिकेतील शाखा कार्यालयात असलेल्या साईन लँग्वेज भाषांतर विभागात सेवा करत आहेत.

माझी मुलं जेम्स, जेरी आणि स्टीवन त्यांच्या पत्नींसोबत साईन लँग्वेज भाषेत होत असलेल्या प्रचार कार्याला वेगवेगळ्या मार्गाने हातभार लावतात

दुःखाची गोष्ट म्हणजे आमच्या विवाहाला चाळीस वर्षं पूर्ण होणार होती, त्याच्या एक महिन्याआधीच माझ्या पत्नीचा, युनिसचा मृत्यू झाला. तिला कॅन्सर होता. पुनरुत्थानाच्या आशेवरील तिच्या विश्वासामुळे तिला त्या कठीण काळातही खंबीर राहण्यास खूप मदत झाली. मी त्या दिवसाची फार आतुरतेनं वाट पाहत आहे, जेव्हा ती मला पुन्हा भेटेल.

फेय आणि जेम्स, जेरी आणि इव्हलीन, शॅनन आणि स्टीवन

२०१२ सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी पडलो आणि माझ्या कंबरेचं हाड मोडलं. यापुढे आता मला दुसऱ्यांवर आधारित राहावं लागणार होतं. म्हणून मग मी माझ्या एका मुलासोबत आणि त्याच्या पत्नीसोबत राहायला गेलो. आज आम्ही कॅल्गरी इथल्या साईन लँग्वेज मंडळीचे सदस्य आहोत आणि त्या मंडळीत मी वडील या नात्यानं सेवा करत आहे. खरंतर, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मी एका साईन लँग्वेज मंडळीत सेवा करत आहे! पण मग आतापर्यंतच्या इंग्रजी भाषेतील मंडळीत सेवा करत असताना, यहोवासोबत असलेला माझा नातेसंबंध मजबूत ठेवण्यास मला कशामुळे मदत झाली? या बाबतीत यहोवाने मला खूप मदत केली. अनाथ मुलांची काळजी घेण्याचं जे वचन त्याने बायबलमध्ये दिलं आहे, ते त्याने पूर्ण केलं. (स्तो. १०:१४) मी त्या बंधुभगीनींचेही खूप आभार मानतो जे माझ्यासाठी नोट्‌स लिहायचे. तसंच, ज्यांनी साईन लँग्वेज शिकून मला भाषणांचं भाषांतर करून सांगण्यासाठी मेहनत घेतली, त्या बंधुभगिनींचाही मी खूप कृतज्ञ आहे.

७९ वर्षांचा असताना अमेरिकन साईन लँग्वेजमध्ये झालेल्या पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहताना

माझ्या आयुष्यात अशीही वेळ यायची जेव्हा मंडळीत काय सांगितलं जात आहे हे मला समजायचं नाही. किंवा मग बहिऱ्या लोकांची काळजी कशी घ्यायची हे कोणालाही माहीत नाही असं मला वाटायचं. अशा वेळी मी खूप निराश व्हायचो आणि सर्वकाही सोडून द्यावं असं मला वाटायचं. पण, तेव्हा पेत्रने येशूला जे म्हटलं होतं ते मी आठवायचो. त्याने येशूला म्हटलं होतं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.” (योहा. ६:६६-६८) बऱ्याच वर्षांपासून सत्यात असलेल्या इतर बहिऱ्या बंधुभगिनींप्रमाणे मीही धीर दाखवण्यास शिकलो. तसंच, यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर विश्वास दाखवण्याचंही मी शिकलो. याचे बरेच चांगले परिणाम मला पाहायला मिळाले आहेत. आज माझ्या स्वतःच्या भाषेत अनेक प्रकाशनं उपलब्ध आहेत. तसंच, मी अमेरिकन साईन लँग्वेजमध्ये होणाऱ्या सभांना आणि अधिवेशनांना जाऊ शकतो याचाही मला खूप आनंद होतो. आपला महान देव यहोवा याची सेवा केल्यामुळे, मला जीवनात खरा आनंद आणि अनेक आशीर्वाद अनुभवायला मिळाले आहेत.