व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती दयाळूपणाचं एक कृत्य

ख्रिस्ती दयाळूपणाचं एक कृत्य

भारतातल्या गुजरात राज्यातील एका छोट्याशा शहरात घडलेली ही घटना. १९५० च्या दशकाच्या अखेरीस जॉनच्या वडिलांचा यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला होता. पण जॉन, त्याची पाच भावंडं आणि त्याची आई हे कट्टर रोमन कॅथलिक होते. त्यामुळे आपल्या वडिलांच्या विश्‍वासाला त्यांचा खूप विरोध होता.

एक दिवस, जॉनच्या वडिलांनी त्याला मंडळीतल्या बांधवाला एक पाकीट नेऊन द्यायला सांगितलं. पण, त्या दिवशी सकाळी पत्र्याच्या एका मोठ्या डब्याचं झाकण उघडताना जॉनच्या बोटाला जखम झाली आणि त्यातून बरंच रक्‍त वाहत होतं. तरीसुद्धा, वडिलांनी सांगितलेलं काम केलं पाहिजे म्हणून त्याने लगेच आपल्या जखमेवर कापड बांधलं. आणि तो ते पाकीट द्यायला निघाला.

जॉन दिलेल्या पत्त्यावर पोचला आणि ते पाकीट त्या बांधवाला देण्यासाठी त्याने त्याच्या पत्नीच्या हातात दिलं. तीसुद्धा यहोवाची साक्षीदार होती. तिने जॉनच्या बोटाला झालेली जखम पाहिली. त्याला मदत करण्यासाठी तिने लगेच प्रथमोपचाराचं साहित्य आणलं आणि जखम स्वच्छ करून पट्टी बांधली. नंतर तिने जॉनसाठी चहा बनवला. हे सगळं करताना ती अतिशय प्रेमळपणे त्याच्याशी बायबलबद्दल बोलत होती.

तिच्या प्रेमळ व्यवहारामुळे, यहोवाच्या साक्षीदांराबद्दल असलेला जॉनचा दृष्टिकोन बदलू लागला. त्यामुळे त्याने तिला असे दोन प्रश्‍न विचारले ज्यांबद्दल यहोवाच्या साक्षीदांराच्या आणि कॅथलिक पंथाच्या शिकवणी वेगळ्या होत्या. ते प्रश्‍न म्हणजे: येशू देव आहे का आणि ख्रिश्‍चनांनी मरीयाला प्रार्थना केली पाहिजे का? त्या बहिणीने गुजराती भाषा शिकून घेतली होती, त्यामुळे तिने जॉनला गुजराती भाषेत उत्तर दिलं. तिनं त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून दिली आणि त्याला “राज्याची ही सुवार्ता” नावाची पुस्तिका दिली.

जॉनने ती पुस्तिका वाचली तेव्हा त्याला वाटलं, की तो जे वाचत आहे ते सत्य आहे. त्यामुळे तो पाळकाकडे गेला आणि ते दोन प्रश्‍न त्यालाही विचारले. पण पाळक इतका भडकला, की त्याच्यावर बायबल फेकून ओरडून म्हणाला: “तू सैतान झाला आहेस! येशू देव नाही असं बायबलमध्ये कुठं सांगितलं आहे मला दाखव. मरीयाची उपासना करायची नाही असं कुठं सांगितलं आहे, दाखव मला!” पाळकाची ही प्रतिक्रिया पाहून जॉनला धक्काच बसला. तो त्या पाळकाला म्हणाला, की तो पुन्हा कधीच कॅथलिक चर्चमध्ये पाऊल टाकणार नाही. आणि खरंच तो कधीच तिथं गेला नाही.

जॉनने साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला, सत्य स्वीकारलं आणि तो यहोवाची सेवा करू लागला. काही काळानंतर, त्याच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांनीही सत्य स्वीकारलं. जवळ जवळ ६० वर्षांनंतरही जॉनच्या बोटावर असलेली जखमेची ती खूण त्याला ख्रिस्ती दयाळूपणाच्या त्या कृत्याची आठवण करून देते, ज्यामुळे त्याला आयुष्यभर यहोवाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.—२ करिंथ. ६:४, ६.