व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल?

देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल?

येशूच्या काही विश्‍वासू शिष्यांनी त्याला विचारलं, की देवाचं राज्य कधी सुरू होईल. येशूने त्यांना असं उत्तर दिलं, की देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येणार आहे याची नेमकी वेळ त्यांना माहीत नसणार. (प्रेषितांची कार्ये १:६, ७) पण याआधी त्याने आपल्या शिष्यांना असंही सांगितलं होतं, की भविष्यात त्याचे अनुयायी काही घटना एकत्र घडताना पाहतील. तेव्हा त्यांना कळेल, की “देवाचं राज्य जवळ आलं आहे.” आणि ते लवकरच जगावर राज्य करेल.—लूक २१:३१.

येशूने कोणत्या घटनांबद्दल सांगितलं होतं?

येशू म्हणाला, “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील.” (लूक २१:१०, ११) आपल्याला माहीत आहे की अंगठ्यावरच्या वेगवेगळ्या रेषांनी ठसा बनतो. आणि या ठशामुळे एका व्यक्‍तीची ओळख होते. त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या घटना सोबत घडतील, तेव्हा “देवाचं राज्य जवळ आलं आहे” हे आपल्याला ओळखता येईल. मग आज आपल्याला अशा घटना जगभरात एकाच वेळी घडताना दिसत आहेत का? पुढे दिलेल्या काही पुराव्यांवर विचार करा.

१. युद्ध

मानवी इतिहासात आधी कधीही झालं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणावर १९१४ मध्ये युद्ध सुरू झालं. इतिहासकार १९१४ या वर्षाला एक महत्त्वाचं वर्ष मानतात. कारण पहिलं महायुद्ध त्यावर्षी सुरू झालं होतं. त्या युद्धामध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर रणगाड्यांचा, विमानाद्वारे बॉम्ब हल्ल्यांचा, मशीन गन्सचा, विषारी गॅसचा आणि इतर घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध झालं. त्यामध्ये आण्विक शस्त्रांचा वापर करण्यात आला. १९१४ पासून माणसांमध्ये कुठे ना कुठे युद्ध चालूच आहेत. आणि त्या युद्धांमुळे लाखो लोकांचे जीव गेले आहेत.

२. भूकंप

ब्रिटॅनिका ॲकेडेमिक  या पुस्तकात म्हटलं आहे, की दरवर्षी होणाऱ्‍या भूकंपांमध्ये १०० भूकंप असे असतात, ज्यांमुळे “मोठ्या प्रमाणावर नुकसान” होतं. अमेरिकेच्या एका भूवैज्ञानिक सर्व्हेमध्ये असं म्हटलं आहे, की “सन १९०० पासून असलेल्या अहवालांप्रमाणे आपण दरवर्षी १६ मोठे भूकंप येण्याची अपेक्षा करू शकतो.” पण काही लोक म्हणतील की भूकंप वाढलेले नाहीत. आज माणसांकडे भूंकप मापण्याची आधुनिक साधनं असल्यामुळे ते वाढल्यासारखे वाटतात. पण मुद्दा हा आहे, की आज जगभरात होणाऱ्‍या तीव्र भूकंपांमुळे लोकांना दुःख सोसावं लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात जिवाचं आणि मालमत्तेचं नुकसानही होत आहे.

३. दुष्काळ

जगभरात युद्धामुळे, भ्रष्टाचारामुळे, आर्थिक व्यवस्था ढासळल्यामुळे, चांगलं पीक न आल्यामुळे ठिकठिकाणी दुष्काळ पडत आहेत. संयुक्‍त राष्ट्रसंघाने सुरू केलेल्या जागतिक खाद्य कार्यक्रमाचा “२०१८ सालचा अहवाल” असं म्हणतो, की “जगभरात जवळजवळ ८२ कोटी लोकांना क्वचितच खायला मिळतं, तर १२ कोटीपेक्षा जास्त लोकांना उपासमार सहन करावी लागते.” कुपोषणामुळे दरवर्षी जवळजवळ ३१ लाख मुलांचा मृत्यू होतो. २०११ मध्ये जगभरात जितकी मुलं मृत्यूला बळी पडली त्यातली ४५ टक्के मुलं कुपोषणामुळे मेली.

४. रोगांच्या साथी

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रकाशनात असं सांगितलं आहे, की “२१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच जगभरात वेगवेगळ्या रोगांच्या साथी पसरल्या आहेत. कॉलेरा, प्लेग आणि पिवळा ताप या जुन्या रोगांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. तसंच, सार्स (सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम), इन्फ्लुऐन्जा, मर्स (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम), इबोला आणि झिका यांसारखे नवीन रोगही पसरले आहेत.” आणि आत्ताच आपण कोव्हिड –१९ महामारीसुद्धा पाहिली. जरी शास्त्रज्ञांना आणि डॉक्टरांना या रोगांबद्दल बरीच माहिती मिळाली असली, तरी या रोगांना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी त्यांना औषध सापडलेलं नाही.

५. जगभरात होत असलेलं प्रचारकार्य

देवाचं राज्य जवळ आलं आहे, हे ओळखण्यासाठी येशूने आणखी एका घटनेबद्दल सांगितलं. तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.” (मत्तय २४:१४) आज जगात लोकांना भयंकर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण ८० लाखांपेक्षा जास्त लोक आज देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश जगभरात सांगत आहेत. ते हे काम २४० देशांमध्ये आणि १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये करत आहेत. मानवी इतिहासात असं काम याआधी कधीच घडलं नाही.

या घटनांचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

येशूने ज्या घटनांबद्दल सांगितलं होतं त्या आज आपल्या काळात घडत आहेत. पण या घटनांबद्दल आपल्याला उत्सुकता का असली पाहिजे? कारण येशू म्हणाला होता: “जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा देवाचं राज्य जवळ आलं आहे हे ओळखा.”—लूक २१:३१.

लवकरच देवाचं राज्य पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करणार आहे

आपण जर येशूने दिलेलं चिन्ह आणि बायबलमध्ये दिलेल्या घटनांचा क्रम पाहिला, तर आपल्याला हे समजायला मदत होते, की देवाने १९१४ मध्ये आपलं राज्य स्वर्गात स्थापन केलं. a त्या वेळी त्याने आपल्या मुलाला म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वर्गात राजा बनवलं. (स्तोत्र २:२, ४, ६-९) लवकरच देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल आणि सर्व मानवी शासकांना काढून टाकेल. आणि या पृथ्वीला असं नंदनवन बनवेल ज्यात मानव कायम राहू शकतील.

येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेतले शब्द लवकरच पूर्ण होतील. त्यात त्याने म्हटलं: “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:१०) १९१४ मध्ये स्वर्गात राज्य करायला सुरुवात केल्यापासून देवाच्या राज्याने कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत? आणि जेव्हा देवाचं राज्य संपूर्ण मानवजातीवर राज्य करेल तेव्हा ते आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करेल?

a १९१४ या वर्षाबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातला धडा ३२ पाहा.