व्हिडिओ पाहण्यासाठी

देव सृष्टीतल्या कणाकणात म्हणजे सर्वव्यापी आहे का?

देव सृष्टीतल्या कणाकणात म्हणजे सर्वव्यापी आहे का?

बायबलचं उत्तर

 देव सर्वकाही पाहू शकतो आणि तो कोणत्याही ठिकाणी त्याच्या इच्छेप्रमाणे हवं ते करू शकतो. (नीतिवचनं १५:३; इब्री लोकांना ४:१३) पण बायबल असं शिकवत नाही की देव सर्वव्यापी आहे, म्हणजे तो सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत किंवा कणाकणात आहे. याउलट, बायबल सांगतं की देव एक व्यक्‍ती आहे आणि त्याच्या राहण्याचं एक विशिष्ट ठिकाण आहे.

  •   देवाचं स्वरूप: देव एक अदृश्‍य व्यक्‍ती आहे. (योहान ४:२४) मानव त्याला पाहू शकत नाहीत. (योहान १:१८) बायबलमध्ये दिलेल्या प्रत्येक दृष्टान्तात देव एका विशिष्ट ठिकाणी आहे असं वर्णन केलं आहे. तो सगळीकडे आहे असं कुठेच सांगितलेलं नाही.​—यशया ६:१, २; प्रकटीकरण ४:२, ३,.

  •   देवाचं राहायचं ठिकाण: बायबल सांगतं की देवाचं ‘निवासस्थान स्वर्गात आहे.’ (१ राजे ८:३०) देव या विश्‍वात किंवा पृथ्वीवर राहत नाही तर स्वर्गात राहतो. बायबलमध्ये सांगितलंय की एकदा “सगळे स्वर्गदूत यहोवासमोर a आले.” यावरून दिसून येतं की देव एका विशिष्ट ठिकाणी राहतो.​—ईयोब १:६.

देव सर्वव्यापी नसेल तर तो खरंच मला मदत करू शकतो का?

 हो. देवाला आपल्या प्रत्येकाची मनापासून काळजी आहे. तो स्वर्गात राहत असला, तरी पृथ्वीवरचे जे लोक त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे तो लक्ष देतो. आणि तो त्यांना मदतही करतो. (१ राजे ८:३९; २ इतिहास १६:९) यहोवाची मनापासून भक्‍ती करणाऱ्‍यांबद्दल तो कोणकोणत्या मार्गांनी काळजी दाखवतो हे पाहा.

  •   तुम्ही प्रार्थना करता तेव्हा: तुम्ही प्रार्थना करता त्या क्षणीच यहोवा ती ऐकू शकतो.​—२ इतिहास १८:३१.

  •   तुम्ही निराश असता तेव्हा: “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; मनाने खचलेल्यांना तो वाचवतो.”​—स्तोत्र ३४:१८.

  •   तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा: यहोवा त्याच्या वचनाद्वारे, म्हणजेच बायबलद्वारे तुम्हाला ‘सखोल समज देईल आणि ज्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे तो तुम्हाला दाखवेल.’​—स्तोत्र ३२:८.

‘देव सर्वव्यापी आहे’ याबद्दलचे गैरसमज

 गैरसमज: देव सृष्टीतल्या कणाकणात आहे.

 खरी माहिती: देव या विश्‍वात किंवा पृथ्वीवर राहत नाही. (१ राजे ८:२७) हे खरं आहे की देवाने निर्माण केलेले तारे आणि इतर सर्व गोष्टी ‘त्याच्या गौरवाचं वर्णन करतात.’ (स्तोत्र १९:१) असं असलं, तरी जसा एक चित्रकार त्याने बनवलेल्या चित्रात राहत नाही, तसंच देवसुद्धा त्याने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये राहत नाही. तरीपण प्रत्येक चित्र त्याच्या चित्रकाराबद्दल बरंच काही सांगतं. त्याच प्रकारे, देवाने निर्माण केलेली सृष्टी त्याच्या ‘अदृश्‍य गुणांबद्दल’ बरंच काही सांगते. जसं की त्याची शक्‍ती, बुद्धी आणि प्रेम.​—रोमकर १:२०.

 गैरसमज: देव सर्वव्यापी असला तरच त्याला सगळ्या गोष्टी माहीत असू शकतात आणि तो सर्वशक्‍तिमान असू शकतो.

 खरी माहिती: देवाची पवित्र शक्‍ती ही त्याची क्रियाशील शक्‍ती आहे. या पवित्र शक्‍तीद्वारे तो सगळं काही जाणून घेऊ शकतो. तसंच, तो कुठेही आणि कधीही त्याला हवं ते करू शकतो. यासाठी त्याला त्या ठिकाणी असण्याची गरज नाही.​—स्तोत्र १३९:७.

 गैरसमज: स्तोत्र १३९:८ सांगतं की देव सगळीकडे आहे. कारण तिथे असं म्हटलं आहे, “जर मी आकाशात चढून गेलो, तर तू तिथे असशील, आणि जर मी कबरेत अंथरूण घातलं, तर पाहा! तिथेही तू असशील.”

 खरी माहिती: देव कुठे असतो याबद्दल या वचनात सांगितलेलं नाही. तर आपण कुठेही असलो तरी देव आपल्याला मदत करू शकतो हे अलंकारिक भाषेत या वचनात सांगितलंय.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं सांगितलं आहे.