व्हिडिओ पाहण्यासाठी

दशांश देण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

दशांश देण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबलचं उत्तर

 जुन्या काळात इस्राएली लोकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्‍नाचा दशांश, a म्हणजेच दहावा भाग यहोवाच्या उपासनेला हातभार लावण्यासाठी दान करण्याची आज्ञा देण्यात आली होती. देवाने त्यांना असं सांगितलं होतं: “तुम्ही पेरलेल्या बियांपासून तुमच्या शेतात दरवर्षी जे काही उगवेल, त्याचा दहावा भाग [“दशांश,” तळटीप] तुम्ही न चुकता द्या.”​—अनुवाद १४:२२.

 इस्राएली लोकांना दशांश देण्याची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आली होती. आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मोशेचं नियमशास्त्र पाळणं आवश्‍यक नसल्यामुळे, दशांश देण्याची आज्ञासुद्धा त्यांनी पाळण्याची गरज नाही. (कलस्सैकर २:१३, १४) त्याऐवजी, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने, “आपल्या मनात जसं ठरवलं आहे, तसंच द्यावं. त्याने कुरकुर करत किंवा देणं भाग पडतं म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.”​—२ करिंथकर ९:७.

 दशांश देण्याबद्दल “जुन्या करारात” काय म्हटलंय?

 बायबलमधल्या ‘जुना करार’ म्हटल्या जाणाऱ्‍या भागात, दशांश देण्याबद्दल बऱ्‍याचदा उल्लेख आला आहे. यांतले बरेच उल्लेख, मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र (मोशेचं नियमशास्त्र) देण्यात आल्यानंतरच्या काळातले आहेत. फक्‍त काही उल्लेख त्याआधीच्या काळातले आहेत.

मोशेच्या नियमशास्त्राच्या आधीच्या काळात

 बायबलमध्ये उल्लेख केलेला, दशांश देणारा पहिला व्यक्‍ती अब्राम (अब्राहाम) होता. (उत्पत्ती १४:१८-२०; इब्री लोकांना ७:४) शालेमचा राजा आणि याजक असलेल्या मलकीसदेकला अब्रामने हा दशांश एकदाच दिला होता असं दिसतं. यानंतर अब्राहामने किंवा त्याच्या मुलांनी पुन्हा दशांश दिल्याचा बायबलमध्ये उल्लेख नाही.

 बायबलमध्ये उल्लेख केलेला, दशांश देणारा दुसरा व्यक्‍ती म्हणजे अब्राहामचा नातू याकोब. त्याने असं वचन दिलं होतं, की जर देवाने त्याला आशीर्वाद दिला, तर तो त्याला मिळालेल्या “सगळ्यातला दहावा भाग” देवाला देईल. (उत्पत्ती २८:२०-२२) काही विद्वान असं म्हणतात, की याकोबने हा दशांश प्राण्यांच्या बलिदानांच्या रूपात दिला होता. याकोबने स्वतः जरी अशी शपथ घेतली होती, तरी त्याने आपल्या कुटुंबासाठी दशांश देण्याचा नियम बनवला नाही.

मोशेचं नियमशास्त्र पाळलं जात होतं त्या काळात

 देवाने इस्राएली लोकांना उपासनेशी संबंधित कार्यांना हातभार लावण्यासाठी दशांश देण्याची आज्ञा दिली होती.

  •   इस्राएलमध्ये याजक आणि इतर लेवी, देवाची उपासना करायला लोकांना मदत करायचे. ते पूर्णवेळ सेवा करायचे. त्यांच्याकडे शेती करण्यासाठी स्वतःची जमीन नव्हती. त्यामुळे या याजकांना आणि इतर लेव्यांना इस्राएली लोकांनी दिलेल्या दशांशामुळे मदत व्हायची. (गणना १८:२०, २१) याजक म्हणून सेवा करत नसलेल्या लेव्यांना लोकांकडून जो दशांश मिळायचा, त्यातला सगळ्यात चांगला, म्हणजेच “दहाव्या भागातला दहावा भाग” ते याजकांसाठी द्यायचे.​—गणना १८:२६-२९.

  •   इस्राएली लोकांना दरवर्षी आणखी एक दशांश देण्याची आज्ञा होती असं दिसतं. या दुसऱ्‍या दशांशामुळे लेव्यांना आणि इतर लोकांनाही मदत व्हायची. (अनुवाद १४:२२, २३) इस्राएली कुटुंबं या दशांशाचा उपयोग खास सणांच्या वेळी करायचे. काही विशिष्ट वर्षी, गोरगरिबांना मदत करण्यासाठीही या दशांशाचा उपयोग केला जायचा.​—अनुवाद १४:२८, २९; २६:१२.

 दशांश किती द्यायचा हे कसं ठरवलं जायचं? शेतीच्या वार्षिक उत्पन्‍नातून इस्राएली लोकांना दहावा भाग दशांश म्हणून बाजूला काढावा लागायचा. (लेवीय २७:३०) जर पिकाऐवजी पैसे द्यायचं त्यांनी ठरवलं, तर मग त्यांना त्या पिकाच्या किंमतीपेक्षा २० टक्के जास्त पैसे द्यावे लागायचे. (लेवीय २७:३१) तसंच, ‘कळपातला आणि गुराढोरांतला प्रत्येक दहावा प्राणीसुद्धा’ देवासाठी राखून ठेवण्याची त्यांना आज्ञा देण्यात आली होती.​—लेवीय २७:३२.

 गुराढोरांचा दशांश ठरवण्यासाठी इस्राएली लोक आपल्या मेंढवाड्यातून बाहेर येणारा प्रत्येक दहावा प्राणी बाजूला काढायचे. नियमशास्त्रात सांगितलं होतं, की त्यांनी हे निवडलेले प्राणी चांगले की वाईट हे पाहू नये, तसंच त्यांची अदलाबदलही करू नये. शिवाय, गुराढोरांच्या बदल्यात दशांश म्हणून पैसे देण्याचीही परवानगी नव्हती. (लेवीय २७:३२, ३३) पण, वार्षिक सणांसाठी दशांश म्हणून बाजूला काढलेले प्राणी इस्राएली लोक विकू शकत होते आणि ते पैसे सणांच्या वेळी वापरू शकत होते. या तरतुदीमुळे ज्यांना सणांसाठी खूप दूरचा प्रवास करावा लागायचा त्यांना मदत व्हायची.​—अनुवाद १४:२५, २६.

 इस्राएली लोक दशांश कधी द्यायचे? इस्राएली लोक दर वर्षी दशांश द्यायचे. (अनुवाद १४:२२) पण प्रत्येक सातव्या वर्षी त्यांना दशांश द्यावा लागत नव्हता. कारण सातवं वर्ष हे शब्बाथ वर्ष, म्हणजेच विश्रांतीचं वर्ष असायचं आणि त्या वर्षी इस्राएली लोक कोणतंही पीक काढत नव्हते. (लेवीय २५:४, ५) यामुळे कापणीच्या वेळी त्यांना दशांश द्यावा लागत नव्हता. प्रत्येक तिसऱ्‍या आणि सहाव्या वर्षी, इस्राएली लोक दुसरा दशांश गरीब लोकांना आणि लेव्यांना द्यायचे.​—अनुवाद १४:२८, २९.

 दशांश न देणाऱ्‍याला कोणती शिक्षा दिली जायची? मोशेच्या नियमशास्त्रात दशांश न देणाऱ्‍याला शिक्षा देण्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. दशांश देणं ही प्रत्येक व्यक्‍तीची नैतिक जबाबदारी होती. आपण दशांश दिला आहे हे इस्राएली लोक देवासमोर सांगायचे आणि ही आज्ञा पाळल्याबद्दल देवाचा आशीर्वाद मिळावा अशी विनंतीही करायचे. (अनुवाद २६:१२-१५) दशांश न देणं हे देवाच्या दृष्टीने त्याला लुबाडण्यासारखं होतं.​—मलाखी ३:८, ९.

 दशांश दिल्यामुळे इस्राएली लोकांवर जास्तीचा भार यायचा का? नाही. देवाने इस्राएली लोकांना वचन दिलं होतं, की जर त्यांनी दशांश दिला तर तो त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल आणि त्यांना कशाचीही कमी पडणार नाही. (मलाखी ३:१०) याउलट, जेव्हा-जेव्हा ते दशांश देत नव्हते तेव्हा-तेव्हा राष्ट्राचं नुकसान व्हायचं. त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नव्हता, तसंच याजक आणि लेव्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या सेवेचा लाभही त्यांना मिळत नव्हता.​—नहेम्या १३:१०; मलाखी ३:७.

 दशांश देण्याबद्दल “नव्या करारात” काय म्हटलंय?

 येशू पृथ्वीवर होता, त्या वेळीही देवाच्या उपासकांनी दशांश देणं आवश्‍यक होतं. पण येशूच्या मृत्यूनंतर ही आज्ञा रद्द करण्यात आली.

येशूच्या काळात

 बायबलमधल्या ‘नवा करार’ म्हटलेल्या भागातून दिसून येतं, की येशू पृथ्वीवर असतानाही इस्राएली लोक दशांश देत होते. येशूनेही हे मान्य केलं की दशांश देणं गरजेचं आहे. पण, जे धर्मपुढारी एकीकडे दशांश द्यायचे आणि दुसरीकडे “नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय, दया आणि विश्‍वासूपणा यांकडे . . . दुर्लक्ष” करायचे त्यांची येशूने निंदा केली.​—मत्तय २३:२३.

येशूच्या मृत्यूनंतर

 येशूच्या मृत्यूनंतर दशांश देणं आवश्‍यक राहिलं नाही. येशूने त्याच्या जीवनाचं बलिदान दिल्यामुळे मोशेचं नियमशास्त्र आणि त्यासोबतच ‘दशांश गोळा करण्याची आज्ञासुद्धा’ रद्द झाली.​—इब्री लोकांना ७:५, १८; इफिसकर २:१३-१५; कलस्सैकर २:१३, १४.

a दशांश म्हणजे “एखाद्याच्या उत्पन्‍नातून काही खास उद्देशासाठी राखून ठेवलेला दहावा भाग. . . . बायबलमध्ये सहसा दशांश हा उपासनेसाठी दिलेल्या दानाला सूचित करतो.”​—हार्पर्स बायबल डिक्शनरी, पान क्र. ७६५.