व्हिडिओ पाहण्यासाठी

टॅटू काढण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

टॅटू काढण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबलचं उत्तर

 बायबलमध्ये टॅटू काढण्याबद्दल म्हणजे शरीरावर गोंदवण्याबद्दल फक्‍त एकदाच, लेवीय १९:२८ या वचनात उल्लेख आलाय. तिथे असं म्हटलंय: “आपल्या शरीरावर गोंदवून घेऊ नका.” ही आज्ञा देवाने इस्राएल राष्ट्रातल्या लोकांना दिली होती. कारण त्याकाळी त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांतले लोक आपल्या देवांची नावं आणि चिन्हं शरीरावर गोंदवून घ्यायचे. पण देवाच्या लोकांनी या राष्ट्रांपासून वेगळं राहावं म्हणून देवाने त्यांना तशी आज्ञा दिली होती. (अनुवाद १४:२) इस्राएली लोकांना दिलेलं नियमशास्त्र आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी पाळायची गरज नसली, तरी ही आज्ञा ज्या तत्त्वावर आधारित आहे त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी टॅटू करून घ्यावा का?

 खाली दिलेली बायबल वचनं तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तर काय आहे हे ठरवायला मदत करतील:

  •   ‘स्त्रियांनी शालीनतेने स्वतःला सजवावं.’ (१ तीमथ्य २:९) हे तत्त्व फक्‍त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही आहे. आपण केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे इतरांना कसं वाटेल याचा आपण विचार केला पाहिजे आणि स्वतःकडे जास्त लक्ष वेधायचं आपण टाळलं पाहिजे.

  •   काही जण आपली स्वतंत्र ओळख दाखवून देण्यासाठी किंवा ‘माझ्या शरीरावर माझा हक्क आहे’ हे दाखवण्यासाठी टॅटू करून घेतात. पण बायबल देवाच्या उपासकांना असं प्रोत्साहन देतं, “आपली शरीरं जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत. असं केल्यामुळे, तुम्हाला आपल्या विचारशक्‍तीने पवित्र सेवा करता येईल.” (रोमकर १२:१) म्हणून टॅटू करून घेण्याआधी तुम्हाला तो नेमका का हवाय, हे समजून घेण्यासाठी आपल्या ‘विचारशक्‍तीचा’ वापर करा. कदाचित फक्‍त फॅशनसाठी किंवा आपण विशिष्ट गटाचे सदस्य आहोत हे दाखवण्यासाठी तुम्हाला टॅटू करून घ्यायचा असेल. जर असं असेल, तर लक्षात ठेवा, की आज तुम्हाला जसं वाटतंय तसं कदाचित उद्या वाटणार नाही. पण तो टॅटू मात्र कायम राहील. म्हणून, मुळात आपला उद्देश काय आहे यावर विचार केल्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल.​—नीतिवचनं ४:७.

  •   “मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात, पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.” (नीतिवचनं २१:५) बऱ्‍याचदा टॅटू करून घ्यायचा निर्णय घेण्याआधी लोक पुरेसा विचार करत नाही. पण या निर्णयाचा आपल्या नात्यांवर तसंच एखाद्याच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय, टॅटू काढून टाकणं तितकं सोपं नसतं, त्यासाठी बराच खर्च करावा लागतो आणि टॅटू काढून टाकताना खूप वेदनाही होतात. संशोधन करणाऱ्‍यांना असं दिसून आलंय, की टॅटू करून घेणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच लोकांना नंतर पस्तावा होतो. म्हणूनच आज टॅटू काढून टाकणं हासुद्धा एक मोठा व्यवसाय बनलाय!