व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली

बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली
  • जन्म: १९४८

  • देश: हंगेरी

  • पार्श्‍वभूमी: जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं शोधत होते

माझं आधीचं जीवन:

माझा जन्म हंगेरीच्या एका खूप जुन्या शहरात झाला. मला आजही आठवतं, की दुसऱ्‍या महायुद्धामुळे झालेल्या नुकसानाच्या खुणा या शहरात स्पष्ट दिसायच्या.

मी माझ्या आजी-आजोबांकडेच लहानाचा मोठा झालो. लहानपणीच्या माझ्या खूप गोड आठवणी आहेत. खासकरून माझी आजी एलिझाबेथ माझा खूप लाड करायची. तिने लहानपणापासूनच मला देवाबद्दल शिकवलं. मी तीन वर्षांचा होतो तेव्हापासून, दररोज संध्याकाळी तिच्या मागे-मागे एक प्रार्थना म्हणायचो. त्या प्रार्थनेला सहसा ‘प्रभूची प्रार्थना’ म्हणतात. पण खरं सांगायचं तर मी ३० वर्षांचा होईपर्यंत मला त्या प्रार्थनेचा अर्थ माहितच नव्हता.

एक चांगलं घर घ्यायची माझ्या आईबाबांची इच्छा होती. यासाठी ते रात्रंदिवस काम करायचे. आणि म्हणून लहानपणी माझ्या आजी-आजोबांनीच माझी काळजी घेतली. पण महिन्यातून दोनदा आम्ही घरचे सगळे जण जेवायला एकत्र यायचो. तो एकत्र घालवलेला वेळ मला खूप आवडायचा.

१९५८ मध्ये माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण झालं. आम्हाला तिघांना राहता येईल असं एक घर त्यांनी विकत घेतलं. मी खूप खूश होतो, कारण आता शेवटी मी माझ्या आईबाबांसोबत राहू शकणार होतो. पण माझा तो आनंद जास्त दिवस काही टिकला नाही. कारण सहा महिन्यांतच माझ्या बाबांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.

बाबांच्या मृत्यूमुळे माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. मला आठवतं, मी देवाला अशी प्रार्थना करायचो, “देवा मी बाबांशिवाय कसा राहू? मी तुला प्रार्थना केली होती की माझ्या बाबांना वाचव. मग तू माझ्या प्रार्थना का नाही ऐकल्यास?” मला कसंही करून जाणून घ्यायचं होतं की शेवटी बाबा कुठे गेलेत. मी विचार करायचो, ‘ते स्वर्गात असतील का? ते कायमचे गेलेत का?’ इतर मुलांना मी त्यांच्या बाबांसोबत पाहायचो तेव्हा मला त्यांचा खूप हेवा वाटायचा.

बऱ्‍याच वर्षांपर्यंत जवळजवळ दररोज मी बाबांच्या कबरेजवळ जायचो. तिथे मी गुडघे टेकून देवाला प्रार्थना करायचो आणि म्हणायचो, “देवा प्लीझ, माझे बाबा कुठे आहेत ते मला सांग.” तसंच जीवनाचा उद्देश काय आहे ते समजून घ्यायला मदत कर, अशीही मी त्याच्याकडे प्रार्थना करायचो.

मग १३ वर्षांचा झालो तेव्हा मी जर्मन भाषा शिकायचं ठरवलं. जर्मन भाषेत बरीच प्रसिद्ध पुस्तकं होती. त्यामुळे मला वाटायचं की माझ्या प्रश्‍नांची उत्तरं मला त्यात मिळतील. मग १९६७ मध्ये मी एना शहरात शिकायला गेलो. त्या वेळी हे शहर पूर्व जर्मनीचा भाग होतं. जर्मन तत्त्वज्ञान्यांनी लिहिलेली भरपूर पुस्तकं मी वाचली. खासकरून मानवी जीवनाच्या उद्देशाबद्दल असलेली पुस्तकं मी वाचायचो. त्यांतली बरीच माहिती मला आवडली, पण माझ्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मला मिळाली नाहीत. म्हणून मी प्रार्थना करत राहिलो.

बायबलने जीवन कसं बदललं:

मग १९७० मध्ये, मी हंगेरीला परत आलो. तिथे माझी भेट रोझाशी झाली. पुढे आम्ही लग्न केलं. त्या वेळी हंगेरीमध्ये कम्युनिस्ट सरकार होतं. लग्नानंतर लगेचच आम्ही ऑस्ट्रियाला राहायला गेलो. पुढे आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात स्थायिक व्हायचं होतं. माझे मामाही तिथे राहायचे.

ऑस्ट्रियाला आल्यावर काही दिवसातच मला एक नवीन काम मिळालं. एक दिवशी माझ्यासोबत काम करणाऱ्‍याने मला सांगितलं, की मला माझ्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून मिळतील. त्याने मला बायबलबद्दलची काही पुस्तकं दिली. मी ती सगळी लगेच वाचून काढली. मला आणखी जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी ती पुस्तकं प्रकाशित करणाऱ्‍या साक्षीदारांना पत्र लिहिलं आणि मला आणखी पुस्तकं हवीएत असं सांगितलं.

आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता, त्या दिवशी एक तरुण ऑस्ट्रियन साक्षीदार आमच्या घरी आला. मी मागवलेली पुस्तकं त्याने सोबत आणली होती. आणि मला बायबल अभ्यास करायला आवडेल का असंही त्याने विचारलं. मी लगेच तयार झालो. मला शिकायची खूप उत्सुकता असल्यामुळे आम्ही आठवड्यातून दोनदा अभ्यास करायचो. प्रत्येक अभ्यास जवळपास चार तास चालायचा!

साक्षीदारांनी मला जे बायबलमधून शिकवलं त्यामुळे मला खूप आनंद झाला. जेव्हा त्यांनी माझ्या भाषेतल्या बायबलमधून देवाचं नाव यहोवा आहे हे दाखवलं, तेव्हा माझा विश्‍वासच बसला नाही. कारण मी २७ वर्षांपासून चर्चला जायचो. पण तिथे मी एकदाही देवाचं नाव ऐकलं नव्हतं. माझ्या प्रश्‍नांची बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली. तसंच मला कळलं की मेलेले लोक एका अर्थाने गाढ झोपेत असतात आणि त्यांना काहीच माहीत नसतं. (उपदेशक ९:५, १०; योहान ११:११-१५) बायबलमध्ये देवाने असंही एक वचन दिलं आहे की लवकरच एक नवीन जग येईल तेव्हा “कोणीही मरणार नाही.” (प्रकटीकरण २१:३, ४) त्या नवीन जगात “लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे” आणि मला माझ्या बाबांना परत भेटता येईल.​—प्रेषितांची कार्यं २४:१५.

रोझासुद्धा माझ्यासोबत उत्सुकतेने बायबल अभ्यास करू लागली. आम्ही दोघांनी भरभर प्रगती केली आणि दोन महिन्यांतच आम्ही अभ्यासाचं पुस्तक संपवलं. आम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या प्रत्येक सभेला हजर राहायचो. साक्षीदारांमधलं प्रेम, आपुलकी आणि एकता पाहून आम्ही खूप प्रभावित झालो.​—योहान १३:३४, ३५.

मग १९७६ मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियाला राहायला गेलो. तिथे आम्ही लगेच यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधला. तिथले साक्षीदारसुद्धा आमच्याशी अगदी जुनी ओळख असल्यासारखे वागले. मग १९७८ मध्ये आम्हीसुद्धा यहोवाचे साक्षीदार बनलो.

मला झालेला फायदा:

बऱ्‍याच वर्षांपासून जे प्रश्‍न मला सतावत होते त्यांचं मला शेवटी उत्तर मिळालंय. देवासोबत एक जवळचं नातं जोडल्यामुळे मला सगळ्यात चांगला पिता मिळाला. (याकोब ४:८) तसंच मला एक सुंदर आशाही मिळाली. येणाऱ्‍या नवीन जगात मी माझ्या बाबांना पुन्हा भेटेन त्या दिवसाची मी उत्सुकतेने वाट पाहतोय.​—योहान ५:२८, २९.

आम्ही जे शिकलो ते आमच्या घरच्यांना आणि मित्रांना सांगता यावं म्हणून आम्ही १९८९ मध्ये हंगेरीला परत जायचं ठरवलं. इथे आल्यावर आम्हाला बऱ्‍याच लोकांना बायबलबद्दल सांगायची एक चांगली संधी मिळाली. त्यांच्यापैकी ७० जणांनी आमच्यासोबत देवाची सेवा करायचा निर्णय घेतला. आणि त्यात माझी आईसुद्धा आहे.

माझ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी १७ वर्षं प्रार्थना केली. आता त्याला ३९ वर्षं झाली आहेत आणि मी आजही देवाला प्रार्थना करतो. पण आता मी त्याला असं म्हणतो: “देवा माझ्या प्रेमळ पित्या, लहानपणी केलेल्या प्रार्थनांचं तू उत्तर दिलंस त्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानतो.”