व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं

माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं
  • जन्म: १९५२

  • देश: अमेरिका

  • पार्श्‍वभूमी: हिंसक आणि तापट

माझं आधीचं जीवन

मी अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये, लॉस जल्स शहरात लहानाचा मोठा झालो. ज्या वस्त्यांमध्ये माझं लहानपण गेलं तिथे मारामाऱ्‍या करणाऱ्‍या टोळ्या आणि ड्रग्स यांसारखे प्रकार सर्रास चालायचे. आम्ही सहा भावंडं होतो. त्यांतला मी दुसरा.

लहानपणी आई आम्हाला नेहमी चर्चला घेऊन जायची. पण मोठं झाल्यावर मी ढोंगीपणाने जगायला लागलो. एकीकडे चर्चमध्ये मी भक्‍तिगीतं गायचो तर दुसरीकडे आठवडाभर पार्ट्या करायचो, ड्रग्स घ्यायचो आणि घाणेरडी कामंही करायचो.

मी खूप तापट स्वभावाचा होतो. राग आला की मी हातापायीवरच यायचो. आणि मग जे हातात येईल त्याच्याने समोरच्याला मारायचो. चर्चमध्ये शिकलेल्या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम नाही व्हायचा. मी म्हणायचो, “सूड घेणं प्रभूचं काम असेल खरं, पण त्यासाठी तो माझा वापर करतो.” १९६५ ते ७० च्या दरम्यान मी हायस्कूलमध्ये होतो. त्या वेळी मी ब्लॅक पॅंथर नावाच्या एका राजकीय गटामुळे खूप प्रभावित झालो होतो कारण ते लोकांच्या हक्कांसाठी लढायचे. त्यानंतर मी विद्यार्थ्यांच्या एका युनियनचा सदस्यही बनलो. आम्ही बऱ्‍याचदा मोर्चे काढायचो, नारेबाजी करायचो. त्यामुळे शाळा बंद करावी लागायची.

मला हाणामारी करायला खूप आवडायचं. त्यामुळे मोर्चे काढून, नारेबाजी करून माझं समाधान व्हायचं नाही. म्हणून मग मी गोऱ्‍या लोकांविरुद्ध हिंसक हल्ल्यांमध्ये भाग घेऊ लागलो. कधीकधी आम्ही सगळे मित्र मिळून, अमेरिकेत आफ्रिकन गुलामांवर झालेल्या अत्याचारांवरचे पिक्चर पाहायला जायचो. त्यांच्यावर किती अन्याय झालाय हे पाहून आम्ही रागाने पेटून उठायचो. आणि तिथे थेटरमध्येच गोऱ्‍या तरुणांवर हल्ला करायचो. मग तिथून पुढे आम्ही गोऱ्‍या लोकांच्या वस्त्यांमध्ये जायचो आणि लोकांना पकडून मारायचो.

मी अठरा-एकोणीस वर्षांचा होईपर्यंत, मी आणि माझे भाऊ पक्के गुंड बनलो होतो. बऱ्‍याचदा आम्ही पोलिसांच्या तावडीतही सापडायचो. माझा एक लहान भाऊ एका कुख्यात टोळीत होता. आणि नंतर मीही त्यात सामील झालो. माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं.

बायबलने जीवन कसं बदललं?

माझ्या एका मित्राचे आईवडील यहोवाचे साक्षीदार होते. त्यांनी मला त्यांच्या मंडळीच्या सभांना बोलावलं आणि मी गेलो. अगदी पहिल्या दिवसापासूनच मला जाणवलं की यहोवाचे साक्षीदार खूप वेगळे आहेत. प्रत्येकाकडे एक बायबल होतं आणि सभेमध्ये आपापलं बायबल उघडून ते वचनं पाहत होते. तरुण लोकसुद्धा भाषण देत होते. देवाचं नाव यहोवा आहे हे जेव्हा मला समजलं आणि ते सर्वांच्या तोंडून जेव्हा मी ऐकलं, तेव्हा ही गोष्ट मला खूप विशेष वाटली. (स्तोत्र ८३:१८) आणखीन एक गोष्ट म्हणजे, मंडळीत बऱ्‍याच वेगवेगळ्या देशाचे लोक होते. पण तरीपण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता.

सुरुवातीला मला साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायची इच्छा नव्हती. पण त्यांच्या सभांना जायला मात्र मला आवडायचं. एकदा मी सभेला गेलो होतो तेव्हा माझे काही मित्र एका म्युझिक कॉन्सर्टला गेले होते. तिथे एका मुलाने त्यांना त्याचं लेदर जॅकेट दिलं नाही, म्हणून त्यांनी त्याला इतकं बेदम मारलं, की तो मेला. दुसऱ्‍या दिवशी ते त्या खुनाबद्दल चक्क फुशारकी मारत होते. कोर्टात जेव्हा त्यांचा खटला चालू होता, तेव्हा त्यांच्या चेहऱ्‍यावर जराही पस्तावा दिसत नव्हता. उलट ते हसत होते. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मी विचार केला, ‘बरं झालं मी त्यांच्यासोबत त्या दिवशी तिथे नाही गेलो.’ आणि म्हणून मी ठरवलं की बायबल अभ्यास करायचा आणि जीवनात बदल करायचा.

वेगवेगळ्या वंशांच्या लोकांमध्ये केला जाणारा भेदभाव मी आधीपासूनच पाहत आलो होतो. पण यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मी जे पाहिलं त्यामुळे मला खूप आश्‍चर्य वाटलं. जसं की, एका गोऱ्‍या साक्षीदाराला जेव्हा परदेशात जायचं होतं तेव्हा तो आपल्या मुलांना एका काळ्या साक्षीदार कुटुंबाकडे सोडून गेला. तसंच, जेव्हा एका काळ्या मुलाला राहायला जागा हवी होती, तेव्हा एका गोऱ्‍या कुटुंबाने त्याला आपल्या घरात राहायला जागा दिली. हे पाहून मला खातरी पटली की योहान १३:३५ मधले शब्द यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत एकदम खरे आहेत. तिथे म्हटलंय, “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” माझा विश्‍वास बसला की मला खऱ्‍या अर्थाने भाऊबहीण सापडले आहेत.

बायबलचा अभ्यास केल्यामुळे मला याची जाणीव झाली की मला माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. मला माझा हिंसक स्वभाव सोडून सगळ्यांसोबत शांतीने वागण्याची गरज होती. यासोबतच हेही समजून घ्यायचं होतं की हाच जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. (रोमकर १२:२) हळूहळू मी जीवनात बरेच बदल केले आणि जानेवारी १९७४ ला बाप्तिस्मा घेतला.

मला माझा हिंसक स्वभाव सोडून सगळ्यांसोबत शांतीने वागण्याची गरज होती. यासोबतच हेही समजून घ्यायचं होतं की हाच जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे

पण बाप्तिस्म्यानंतरसुद्धा मला माझ्या रागावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. एकदा आम्ही प्रचार कार्य करत असताना एका चोराने माझ्या कारमधला रेडियो चोरला. तो पळून जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा मीही त्याच्या मागे धावत गेलो. मी त्याला पकडणारच होतो, इतक्यात तो रेडियो खाली टाकून तिथून निसटून गेला. मला माझा रेडियो परत कसा मिळाला हे जेव्हा मी इतरांना सांगत होतो, तेव्हा एका वडिलांनी मला विचारलं, “स्टीफन, जर तो चोर तुझ्या हातात सापडला असता तर तू काय केलं असतं?” या प्रश्‍नाने मला विचार करायला भाग पाडलं. आणि मला समजलं की इतरांसोबत शांतीने राहण्यासाठी मला माझ्या स्वभावात आणखीन बदल करत राहण्याची गरज आहे.

ऑक्टोबर १९७४ मध्ये मी पायनियर सेवा सुरू केली. इतरांना बायबलमधून शिकवण्यासाठी मी दर महिन्याला १०० तास खर्च करायचो. नंतर, न्यू यॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात मला स्वयंसेवा करण्याची संधी मिळाली. १९७८ मध्ये माझी आई आजारी असल्यामुळे मी लॉस जल्सला तिची काळजी घेण्यासाठी परत आलो. दोन वर्षांनंतर माझी प्रिय पत्नी अरँडा हिच्यासोबत माझं लग्न झालं. माझ्या आईचा मृत्यू होईपर्यंत तिची काळजी घ्यायला तिने माझी खूप साथ दिली. पुढे अरँडा आणि मला गिलियड स्कूलला जायची संधी मिळाली. आणि मग नंतर आम्हाला पनामाला नेमण्यात आलं. आजही आम्ही तिथेच राज्य प्रचाराचं काम करत आहोत.

बाप्तिस्म्यानंतर माझ्या जीवनात असे बरेच प्रसंग आले जेव्हा मी हिंसकपणे वागू शकलो असतो. पण आता मी शिकलोय, की कोणी जर मला चीड आणायचा प्रयत्न करत असलं तर एकतर तिथून निघून जायचं किंवा दुसऱ्‍या प्रकारे तो वाद मिटवायचा. मी या परिस्थितींमध्ये ज्या प्रकारे वागलो त्यासाठी बऱ्‍याच जणांनी, माझ्या बायकोनेसुद्धा माझं कौतुक केलं. खरंतर मलाही नवल वाटलं, पण हे सर्व बदल मी स्वतःच्या बळावर करू शकलेलो नाही. उलट बायबलमध्ये एखाद्याचं जीवन बदलून टाकण्याची जी ताकद आहे, त्याच्यामुळेच हे शक्य झालं.—इब्री लोकांना ४:१२.

मला झालेला फायदा

बायबलमुळे माझ्या जीवनाला एक दिशा मिळाली आहे. आता मी सगळ्यांसोबत शांतीने राहतो. आता मी लोकांना मारत नाही. उलट त्यांना देवाचं वचन समजून घ्यायला मदत करतो. इतकंच काय, तर हायस्कूलमध्ये जो माझा पक्का शत्रू होता त्याच्यासोबतसुद्धा मी बायबल अभ्यास केला. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही काळ आम्ही दोघं रूम पार्टनर होतो. आजसुद्धा आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र आहोत. माझ्या पत्नीने आणि मी आजपर्यंत ८० पेक्षा जास्त लोकांसोबत बायबलचा अभ्यास करून त्यांना यहोवाचे साक्षीदार बनायला मदत केली आहे.

आज मी यहोवाचे मनापासून आभार मानतो की माझ्या जीवनाला खरा अर्थ मिळालाय. आणि जगभरात असलेल्या भाऊबहिणींच्या कुटुंबात मी खूप आनंदी आहे.