व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलनं बदललं जीवन!

यहोवा देव दयाळू व क्षमाशील आहे हे मला कळलं

यहोवा देव दयाळू व क्षमाशील आहे हे मला कळलं
  • जन्म: १९५४

  • देश: कॅनडा

  • पार्श्‍वभूमी: फसवणूक करणारा, जुगारी

माझं आधीचं जीवन:

कॅनडातील माँट्रियलच्या एका भकास वाटणाऱ्या भागात मी लहानाचा मोठा झालो. सहा महिन्यांचा होतो तेव्हा वडील वारले. त्यामुळं घरची सर्व जबाबदारी आईवर आली. मी आठ मुलांमध्ये सर्वांत धाकटा.

मादक पदार्थ, जुगार, हिंसा या सर्व वाईट गोष्टी पाहतच मी मोठा झालो. गुन्हेगारांबरोबर माझं रोजचं उठणं बसणं होतं. मी अवघ्या दहा वर्षांचा असताना, व्याजावर पैसे देणाऱ्यांची आणि वेश्या-व्यवसाय करणाऱ्यांची छोटी-मोठी कामं करायचो. मी बिनधास्त खोटं बोलायचो. लोकांना फसवायला मला मजा वाटायची; आणि त्यातून एक वेगळाच आनंद मिळायचा.

चौदा वर्षांचा होईपर्यंत तर मी वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवण्यात तरबेज झालो. जसं, मी सोन्याचा मुलामा लावलेली घड्याळं, ब्रेसलेट, अंगठ्या विकत आणायचो आणि त्यावर १४ कॅरेट सोन्याचा छाप मारून रस्त्यांवर किंवा शॉपिंग सेंटरच्या पार्किंगमध्ये विकायचो. यात मला भरपूर पैसा मिळायचा. एकदा तर मी एका दिवसात १०,००० डॉलर कमवले!

पंधराव्या वर्षी सुधार शाळेतून बाहेर काढल्यानंतर मला राहायला घर नव्हतं. मी कधी रस्त्यांवर, बागांमध्ये किंवा असंच एखादा कुणी मित्र भेटला तर त्याच्या घरी राहायचो.

माझ्या फसवा-फसवीच्या धंद्यामुळं पुष्कळदा पोलीस माझी चौकशी करायचे. मी चोरलेला माल विकत नसल्यामुळं मला कधी तुरुंगात पाठवण्यात आलं नाही. पण, फसवणूक केल्यामुळं, खोटे छाप मारल्यामुळं आणि विना परवाना वस्तु विकत असल्यामुळं मला अनेकदा भरमसाट दंड भरावा लागला. मला कुणाची भीती नसल्यामुळं मी कधीकधी, व्याजानं पैसे देणाऱ्या लोकांचे पैसे वसूल करायलासुद्धा जायचो. हे काम तसं धोक्याचं असल्यामुळं मी माझ्यासोबत एक पिस्तूल बाळगायचो. काही प्रसंगी तर मी गुन्हेगाऱ्यांच्या टोळीसोबतही काम केलं.

बायबलनं कसं जीवन बदललं?

१७ वर्षांचा होतो तेव्हा मला पहिल्यांदा बायबलबद्दल समजलं. मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर राहत होतो. ती यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करत होती. बायबलमध्ये नैतिक आचरणाबद्दल सांगितलेल्या गोष्टी मला काही पटल्या नाहीत त्यामुळं मी तिला सोडून माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीबरोबर राहायला गेलो.

आता खरी परीक्षा होती. या माझ्या दुसऱ्या मैत्रिणीनंसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला! तिनं आपल्या जीवनात अनेक बदल केले. तिचा स्वभाव शांत व सहनशील झालेला पाहून मला आश्चर्य वाटलं. तिनं एकदा मला यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात होणाऱ्या सभेला यायचं आमंत्रण दिलं तेव्हा मी गेलो. तिथं मला भेटलेले सर्व लोक सभ्य व दयाळू होते. मी ज्या जगात राहत होतो त्या जगातल्या लोकांत आणि या राज्य सभागृहातल्या लोकांत किती फरक होता! मी प्रेम मिळवण्यास आसुसलो होतो. लहानपणापासून मला कधीच माझ्या कुटुंबाकडून प्रेम मिळालं नाही. ज्या प्रेमासाठी मी तरसत होतो ते मला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मिळालं. त्यामुळं साक्षीदारांनी जेव्हा मला बायबल अभ्यासाबद्दल विचारलं तेव्हा मी लगेच तयार झालो.

खरंतर बायबलचा अभ्यास करत असल्यामुळंच मी मरतामरता वाचलो होतो. माझ्या जुगारीमुळं माझ्यावर ५०,००० डॉलरपेक्षा जास्त कर्ज झालं होतं. ते फेडण्यासाठी मी माझ्या दोन मित्रांसोबत दरोडा टाकण्याचा प्लॅन बनवला; पण काही कारणासाठी मी त्या दरोड्यात सामील झालो नाही. ते एका अर्थी बरंच झालं. माझ्या त्या दोन्ही मित्रांनी दरोडा टाकला खरा, पण त्यातला एक पकडला गेला आणि दुसरा मारला गेला.

बायबलचा अभ्यास चालू ठेवल्यामुळं मला जाणवलं की माझ्या स्वभावात, आचरणात पुष्कळ बदल करावे लागणार आहेत. जसं की, बायबलमध्ये १ करिंथकर ६:१० या वचनात म्हटलं आहे: “चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे [फसवणूक करणारे] यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” हे वचन वाचल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी किती घोर पाप करत होतो आणि मला माझं जीवन बदललं पाहिजे, याची मला जाणीव झाली. (रोमकर १२:२) मी स्वभावानं हिंसक होतो, मला लगेच राग यायचा आणि खोटं बोलणं माझ्या अंगवळणी पडलं होतं.

पण बायबलच्या अभ्यासातून मला समजलं, की यहोवा देव किती दयाळू व क्षमाशील आहे. (यशया १:१८) मला माझ्या वाईट सवयीतून मुक्त व्हायला मदत कर, अशी मी त्याला कळकळीनं प्रार्थना केली. हळूहळू माझ्यात बदल होऊ लागले. मी ज्या मैत्रिणीबरोबर राहत होतो तिच्याबरोबर कायदेशीर रीत्या लग्न केलं.

बायबलमधील तत्त्वांचं पालन केल्यामुळं आज मी जिवंत आहे.

तेव्हा मी २४ वर्षांचा होतो आणि आम्हाला तीन मुलं होती. आणि आता मला, अशी नोकरी हवी होती जी कायदेशीर रीत्या योग्य असेल. माझं जास्त शिक्षणही झालं नव्हतं. शिवाय माझ्या ओळखी-पाळखी नव्हत्या. पुन्हा एकदा मी यहोवाला कळकळून प्रार्थना केली आणि नोकरी शोधायला गेलो. मी जिथंजिथं जायचो तिथंतिथं त्यांना सांगायचो, की मला आता प्रामाणिकपणे काम करून पैसे कमवायचे आहेत. मी बायबलचा अभ्यास करतोय आणि मला एक चांगला नागरिक बनायची इच्छा आहे, असंही मी त्यांना सांगायचो. पण पुष्कळ लोकांना माझ्यावर विश्वास नसल्यामुळं ते मला नोकरी देत नव्हते. पण असंच एकदा एका इंटरव्ह्यूला गेलो असताना मी इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माझ्या भूतकाळाविषयी सगळं सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला: “माहीत नाही, पण माझं मन मात्र मला सारखं सांगतंय की तुला नोकरीवर ठेवून घ्यावं.” हे माझ्या प्रार्थनेचं उत्तर होतं, असंच मला वाटतं. कालांतरानं मी व माझ्या बायकोनं यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला.

मला झालेला फायदा:

बायबलमधील तत्त्वांचं पालन केल्यामुळं आणि त्यानुसार जीवन जगल्यामुळंच आज मी जिवंत आहे. माझं एक छानसं कुटुंब आहे. यहोवानं मला खरोखरच क्षमा केली आहे याची मला खातरी असल्यामुळं माझा विवेक शुद्ध आहे.

गेल्या १४ वर्षांपासून मी पूर्ण वेळेची सेवा करत आहे. पूर्ण वेळेचे सेवक दर महिन्याला ७० पेक्षा अधिक तास लोकांना बायबल जे शिकवतं ते शिकायला मदत करतात. अलीकडंच माझी बायकोसुद्धा माझ्यासारखीच पूर्ण वेळेची सेवा करू लागली. मागील ३० वर्षांमध्ये मला माझ्यासोबत काम करणाऱ्या २२ जणांना यहोवाची उपासना करायला मदत करण्याची संधी मिळाली. आजही मी शॉपिंग सेंटरमध्ये जातो—पण हो, लोकांना फसवायला नाही, तर बायबलमधील गोष्टी सांगायला. मला लोकांना सांगायचं आहे की लवकरच एक असं जग येणार आहे ज्यात कुणी कुणाला फसवणार नाही.—स्तोत्र ३७:१०, ११. ▪ (w15-E 05/01)