व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही!

बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही!
  • जन्म: १९५८

  • देश: इटली

  • माझा गतकाळ: टोळीचा एक हिंसक सदस्य

माझी पूर्व जीवनशैली:

माझा जन्म रोमच्या उपनगरात झाला आणि इंथच मी लहानाचा मोठा झालो. ही पूर्ण गरिबांची वस्ती होती. जीवन खूप कठीण होतं. आईला मी कधीच पाहिलं नव्हतं आणि वडिलाचं प्रेम काय असतं हे मला माहीत नव्हतं. त्यामुळं साहजिकच रस्त्यावरच्या टवाळ पोरांसारखा मी लहानाचा मोठा झालो.

दहा वर्षांचा होईपर्यंत मी चोरी करू लागलो. बारा वर्षांचा झाल्यावर मी पहिल्यांदा घरातून पळून गेलो. कितीतरी वेळा वडिलांनी मला पोलीस चौकीतून सोडवून घरी आणलं होतं. मी लोकांशी सतत भांडायचो. मी खूप हिंसक होतो आणि अख्ख्या जगाशी माझं वैर होतं. चौदा वर्षांचा झाल्यावर मी कायमचं घर सोडलं. मी ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली आणि रस्त्यावर राहू लागलो. झोपायला जागा नसल्यामुळं मी कारचं लॉक तोडून त्यात झोपायचो आणि उजाडण्याआधी निघून जायचो. मग, आंघोळीसाठी कुठं पाणी मिळतं का हे शोधत फिरायचो.

बॅग हिसकावण्यापासून ते घरफोड्या करण्यापर्यंत कोणतीही चोरी करण्यात मी अगदी पटाईत झालो होतो. त्यामुळं मी कुप्रसिद्ध होऊ लागलो आणि लवकरच मी एका कुख्यात टोळीत सामील झालो. या टोळीत सामील झाल्यानंतर बँकांमध्ये दरोडे घालण्याची “सुसंधी” मला मिळाली. माझ्या हिंसक स्वभावामुळं टोळीत माझा दबदबा वाढला. बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही; झोपतानाही बंदूक माझ्या उशालाच असायाची. मारामारी, ड्रग्ज, चोरी, शिवीगाळ आणि अनैतिकता हेच माझं जीवन होतं. पोलीस सतत माझ्या मागावर असायचे आणि कितीतरी वेळा मी तुरुंगाची हवा खाऊन आलो होतो.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

तुरुंगातून सुटल्यानंतर एकदा मी माझ्या मावशीला भेटायला गेलो. माझ्या पश्‍चात माझी मावशी आणि मावस भावंडं यहोवाचे साक्षीदार बनले होते. त्यांनी मला त्यांच्यासोबत साक्षीदारांच्या सभेला येण्यास सांगितलं. केवळ उत्सुकतेपोटी मी त्यांच्यासोबत जाण्याचं ठरवलं. आम्ही राज्य सभागृहात पोहचलो तेव्हा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवता यावी म्हणून मी दाराजवळ बसण्याचा हट्ट धरला. अर्थात, त्या वेळीसुद्धा माझ्याजवळ माझी बंदूक होती.

या सभेमुळं माझं आयुष्य पार बदलून गेलं. त्या वेळी मला असं वाटलं जणू मी एका दुसऱ्याच विश्वात आहे. लोकांनी माझं प्रेमळपणे आणि आनंदानं स्वागत केलं. त्यांनी दाखवलेली आपुलकी, त्यांचा प्रामाणिकपणा अजूनही मला लख्ख आठवतो. या लोकांमध्ये आणि मी ज्या जगात वावरत होतो तिथल्या लोकांमध्ये जमीन-आसमानाचा फरक होता.

मी साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मी जितकं शिकत गेलो तितकं मला जाणवलं की मी माझ्या जीवनशैलीत बदल करायला हवा. मी नीतिसूत्रे १३:२० या वचनातील सल्ला लागू केला: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” मला याची जाणीव झाली की टोळीशी असलेले सर्व संबंध मला तोडून द्यावे लागतील. अर्थात, असं करण इतकं सोप नव्हतं. पण यहोवाच्या मदतीनं मी हे करू शकलो.

आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःवर ताबा ठेवू लागलो

तसेच, मी स्वतःत अनेक बदल केले. खूप प्रयत्न करून शेवटी मी सिगारेट ओढणं आणि ड्रग्ज घेणं सोडून दिलं. मी माझे लांब केस कापले, कानातील बाली काढल्या आणि शिवीगाळ करण्याचं सोडून दिलं. आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःवर ताबा ठेवू लागलो.

वाचन, अभ्यास या गोष्टी मला कधीच आवडल्या नव्हत्या; त्यामुळं बायबलचा अभ्यास करणं आणि त्यातील गोष्टी जीवनात लागू करणं मला खूप कठीण गेलं. पण, मी जसजसा प्रयत्न करत गेलो तसतसं मी यहोवावर प्रेम करू लागलो आणि माझ्यात काहीतरी बदल होत असल्याचं मला जाणवलं; तो म्हणजे, माझा विवेक मला बोचू लागला होता. मी नेहमी स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायचो. मी जी वाईट कामं केली होती त्याबद्दल यहोवा मला कधी माफ करेल का अशी शंका माझ्या मनात यायची. अशा वेळी, गंभीर पाप केलेल्या दावीद राजाला यहोवानं कसं माफ केलं याबद्दलचा वृत्तान्त वाचून मला खूप सांत्वन मिळायचं.—२ शमुवेल ११:१–१२:१३.

माझ्यासाठी कठीण असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे घरोघरी जाऊन माझ्या विश्वासाबद्दल इतरांना सांगणं. (मत्तय २८:१९, २०) मी पूर्वी ज्यांना त्रास दिला होता किंवा ज्यांचं वाईट केलं होतं त्यांपैकी एखादी व्यक्ती मला भेटली तर काय, या विचारानं मला धडकी बसायची! पण, हळूहळू माझ्या मनातून ही भीती निघून गेली. उदार मनानं माफ करणाऱ्या आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याबद्दल इतरांना सांगण्यात मला खरं समाधान मिळू लागलं.

मला काय फायदा झाला:

यहोवाला जाणून घेतल्यामुळंच माझं जीवन वाचलं! माझ्या पूर्वीच्या सोबत्यांपैकी बरेच जण एकतर मरण पावले आहेत किंवा तुरुंगात आहेत; पण मी खऱ्या अर्थानं समाधानी जीवन जगत आहे आणि एका उज्ज्वल भविष्याची मला आशा आहे. नम्रता, आज्ञाधारकता हे गुण मी विकसित केले आहेत. तसंच, मी माझ्या तापट स्वभावावरही मात करू शकलो. यामुळं इतरांसोबत चांगले नातेसंबंध जोडणं मला शक्य झालं आहे. कार्मेन नावाच्या एका सुंदर मुलीशी माझं लग्न झालं आणि आम्ही दोघं सुखासुखी जीवन जगत आहोत. इतरांना बायबलबद्दल शिकवण्यात आम्हाला खूप आनंद मिळतो.

आणि हो, आता मी इमानदारीनं नोकरी करतो. पूर्वी मी बँका लुटायचो पण आता त्या स्वच्छ करतो! ▪ (w14-E 07/01)