व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय: देव निर्दयी आहे का?

देव निर्दयी आहे असे लोक का बोलतात?

देव निर्दयी आहे असे लोक का बोलतात?

मुखपृष्ठावरील प्रश्‍न वाचून तुम्हाला धक्का बसला का? काहींना बसतो कारण देव निर्दयी असूच शकत नाही असा ते विचार करतात. पण, देव निर्दयी आहे का असा प्रश्‍न आज पुष्कळ लोकांना पडतो. किंवा तो तसा आहे असे ते धरून चालतात. असे का?

नैसर्गिक विपत्तींतून बचावलेले लोक असे विचारतात: “देवानं या गोष्टी का घडू दिल्या? त्याला आपली काळजी नाही का? की तो निर्दयी आहे?”

बायबलचे वाचन करतानाही काहींच्या मनात हा प्रश्‍न उद्‌भवतो. नोहा व त्याच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयाविषयीचा अहवाल वाचल्यावर ते विचार करू लागतात, ‘एक प्रेमळ देव इतक्या लोकांचा नाश कसा करू शकतो? तो निर्दयी आहे का?’

केव्हाकेव्हा तुमच्याही मनात असे प्रश्‍न येतात का? देव निर्दयी आहे का, असा प्रश्‍न लोक तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्हाला त्याचे उत्तर देण्यास कठीण वाटते का? असल्यास एका वेगळ्या प्रश्‍नाचा जरा विचार करा.

एखादी निर्दयी किंवा क्रूर व्यक्‍ती आपल्याला का आवडत नाही?

सरळ शब्दांत सांगायचे तर, योग्य व चूक यातला फरक ओळखण्याची क्षमता असल्यामुळे आपल्याला एका निर्दयी किंवा क्रूर व्यक्‍तीचा राग येतो. या बाबतीत प्राण्यांमध्ये व आपल्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला त्याचे “प्रतिरूप” असे निर्माण केले आहे. (उत्पत्ति १:२७) याचा काय अर्थ होतो? त्याने आपल्याला त्याचे गुण दाखवण्याची आणि त्याचे नैतिक मूल्य, म्हणजेच योग्य व अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता दिली आहे. याचा विचार करा: योग्य व अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता जर देवाने आपल्याला दिली आहे आणि त्यामुळे एका निर्दयी व्यक्‍तीचा आपल्याला राग येतो, तर मग यावरून हे सिद्ध होत नाही का की देवालासुद्धा एका निर्दयी किंवा क्रूर व्यक्‍तीचा राग येत असावा?

या तर्काशी बायबल सहमत आहे, कारण बायबलमध्ये देव आपल्याला आश्‍वासन देतो: “माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.” (यशया ५५:९) देव निर्दयी आहे असे जर आपण म्हणत असू तर एका अर्थाने आपण असे म्हणतो की आपले मार्ग देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. देव निर्दयी आहे असे मत करण्याआधी आणखी काही तथ्यांचा विचार करणे सुज्ञपणाचे ठरेल. देव निर्दयी आहे का? असा प्रश्‍न विचारण्याऐवजी आपण असे विचारू शकतो, की त्याच्या काही कार्यांवरून असे का दिसते की तो निर्दयी किंवा क्रूर आहे? हे समजण्यासाठी आपण आधी हे पाहू या की एक “निर्दयी” किंवा “क्रूर” व्यक्‍ती कशी असते.

जेव्हा आपण एका व्यक्‍तीला निर्दयी किंवा क्रूर म्हणतो तेव्हा आपण तिचे हेतू चुकीचे आहेत असा निष्कर्ष काढतो. एका निर्दयी किंवा क्रूर व्यक्‍तीला इतरांचे दुःख पाहताना आनंद होतो किंवा तिला काहीच फरक पडत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या पित्याला आपल्या मुलाच्या भावना दुखावण्यास आवडत असतील आणि म्हणून तो त्याला शिस्त लावत असेल तर असा पिता नक्कीच निर्दयी किंवा क्रूर आहे. पण आपल्या मुलाला शिकवण्यासाठी किंवा त्याचे रक्षण करण्यासाठी तो त्याला शिस्त लावत असेल तर तो नक्कीच एक प्रेमळ पिता आहे. एखाद्याच्या मनातले हेतू ओळखता न आल्यामुळे बरेच गैरसमज होतात, तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आला असेल.

आज घडणाऱ्‍या नैसर्गिक विपत्ती आणि बायबलमधील देवाच्या न्यायदंडाविषयीचे अहवाल, या दोन कारणांमुळे लोक, देव निर्दयी आहे असा विचार करतात. पण आपण या दोन कारणांचे बारकाईने परीक्षण करून देव निर्दयी आहे की नाही, हे पुराव्यांवरून पाहू यात. (w१३-E ०५/०१)