व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!

बायबलने बदलले जीवन!
  • जन्म: १९८१

  • देश: अमेरिका

  • माझा गतकाळ: वाट चुकलेला मुलगा

माझी पूर्व जीवनशैली:

अमेरिकेच्या उत्तर वेस्ट व्हर्जिनियातील ओहायो नदीकाठी असलेल्या माऊंड्‌सवील नावाच्या एका शांत गावात माझा जन्म झाला. आम्ही चार भावंडं. तीन मुलं आणि एक मुलगी. त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण कधीच उदास नसायचं. माझे आईबाबा कष्टाळू व प्रामाणिक होते. इतरांबद्दल त्यांना प्रेम वाटायचं. आर्थिक रीत्या आम्ही श्रीमंत नसलो तरी, आमच्या गरजा भागायच्या. आईबाबा यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे, आम्हा चौघांच्या बालमनावर त्यांनी बायबलचे संस्कार केले.

पण मी जसजसा मोठा होऊ लागलो तसतशी मला जगातल्या गोष्टींची भुरळ पडू लागली होती. मला जे शिकवण्यात आलं होतं त्याच्यापासून मी दूर जाऊ लागलो. बायबलनुसार चालल्यानं जीवन खरोखर अर्थपूर्ण किंवा समाधानकारक होऊ शकतं, यावर मी शंका घेऊ लागलो. मनास वाटेल तसे जगल्यानेच आपण खरोखर आनंदी होऊ शकतो, असा मी तर्क करू लागलो. मी हळूहळू ख्रिस्ती सभांना जायचं बंद केलं. माझ्या एका मोठ्या भावानं व धाकट्या बहिणीनं माझ्यासारखंच बंड केलं. आईबाबांनी आम्हाला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले.

ज्या स्वातंत्र्याची मला इतकी आस लागली होती, तेच स्वातंत्र्य मला एक दिवस व्यसनांचा गुलाम बनवेल याची मला तेव्हा जाणीव झाली नाही. एकदा शाळेतून घरी येत असताना, माझ्या एका मित्रानं मला सिगारेट ओढायला दिली. मी ती घेतली. त्या दिवसापासून मी अनेक विनाशकारी सवयी स्वतःला लावून घेतल्या. हळूहळू मी ड्रग्ज घेऊ लागलो, अतिमद्यपान करू लागलो व अनैतिक जीवन जगू लागलो. पुढे अनेक वर्षांपर्यंत मी नशा आणणारे जालीम ड्रग्ज घेऊ लागलो आणि जणू काय त्यांचा दासच झालो. या ड्रग्जच्या मी इतक्या आहारी गेलो, की माझ्या व्यसनांचा खर्च निघावा म्हणून मी ड्रग्जची विक्री सुरू केली.

माझ्या विवेकाकडे मी जितकं दुर्लक्ष करायचो तितकं तो मला, मी चुकीचं जीवन जगतोय याची आठवण सतत करून द्यायचा. माझ्या जीवनाची होळी झाली होती, याची मला जाणीव झाली खरी, पण आता खूप उशीर झाला आहे, असं मला वाटायचं. पार्ट्यांमध्ये, मैफिलींमध्ये माझ्या आजूबाजूला भरपूर लोक असायचे तरीपण मला एकटेपणा जाणवायचा व मी निराश व्हायचो. कधीकधी मी, माझे आईबाबा किती सभ्य व आनंदी लोक आहेत हे आठवायचो व मी त्यांच्यापासून इतका दूर कसा काय गेलो, याचा विचार करायचो.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

मी सुधारेन असं मला स्वतःला वाटत नव्हतं, पण बाकीच्यांना तसं वाटायचं. २००० मध्ये आईबाबांनी मला यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहायचं आमंत्रण दिलं. माझी इच्छा नसतानाही मी गेलो. आणि माझ्या पाठोपाठ माझी ती दोन भावंडंही आली जी माझ्याप्रमाणेच भरकटली होती. त्यांना पाहून मला खूप आश्‍चर्य वाटलं.

अधिवेशन ज्या ठिकाणी चाललं होतं त्या ठिकाणी आधी मी एक वर्षापूर्वी एका संगीताच्या कार्यक्रमाला आल्याचं आठवलं. त्या कार्यक्रमातला आणि आत्ताच्या कार्यक्रमातला फरक पाहून मी खूप भारावून गेलो. संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळी जिकडं बघावं तिकडं कचरा पडला होता, सगळीकडे नुसता सिगारेटींचा धूरच धूर होता. कार्यक्रमाला आलेल्या बहुतेक लोकांना एकमेकांची पर्वा नव्हती आणि तिथं झालेल्या सर्व गाण्यांतून जो संदेश देण्यात आला होता तो निराशाजनक होता. पण या अधिवेशनात, माझ्या चहूबाजूला असे लोक होते जे खरोखरच आनंदी होते. मी त्यांना कितीतरी वर्षं भेटलो नव्हतो तरीसुद्धा त्यांनी माझं प्रेमानं स्वागत केलं. अधिवेशनाच्या ठिकाणी सर्वकाही स्वच्छ होतं आणि तिथं दिला जाणारा संदेश आशादायक होता. बायबलमधील सत्याचा लोकांवर किती चांगला प्रभाव पडू शकतो हे पाहून मी विचार करू लागलो, की मी तो असा कसा काय धुडकावला होता!—यशया ४८:१७, १८.

“बायबलमुळं मला ड्रग्ज घेण्याचं, त्यांची विक्री करण्याचं सोडून देऊन समाजाचा एक मदतदायी सदस्य बनण्याची शक्‍ती मिळाली.”

अधिवेशनानंतर लगेच मी ख्रिस्ती मंडळीत परतण्याचं ठरवलं. माझ्या भावंडांनीसुद्धा अधिवेशनात जे काही अनुभवलं त्यामुळं त्यांनीही मंडळीत परतण्याचं ठरवलं. आम्ही तिघांनी बायबल अभ्यास स्वीकारला.

बायबलमधल्या याकोब ४:८ या वचनाचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. तिथं म्हटलं आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” पण देवाजवळ जर मला यायचंय तर मला माझी जीवनशैली सुधारावी लागेल. इतर बदलांपैकी मला तंबाखूचा वापर, ड्रग्ज, अतिमद्यपान करायचं सोडून द्यावं लागणार होतं.—२ करिंथकर ७:१.

मी माझे जुने मित्र सोडून दिले आणि यहोवाच्या उपासकांमध्ये नवीन मित्र जोडले. एका ख्रिस्ती वडिलांनी माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास केला. त्यांनी मला बरीच मदत केली. ते मला कायम फोन करायचे आणि माझं कसं चाललंय हे पाहायला घरी यायचे. आजही आम्ही दोघं जवळचे मित्र आहोत.

२००१ सालच्या वसंत ऋतूत मी आणि माझ्या दोन्ही भावंडांनी, पाण्यानं बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आमचं जीवन समर्पित केलं. यहोवाच्या उपासनेत आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं तेव्हा माझ्या आईबाबांना व विश्‍वासू राहिलेल्या आमच्या धाकट्या भावाला किती आनंद झाला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.

मला काय फायदा झाला:

बायबलमधील तत्त्वं खूपच कडक व बंधनकारक आहेत असं पूर्वी मला वाटायचं पण ती आपल्याच सुरक्षिततेसाठी आहेत, असं आत्ता मला वाटतं. बायबलमुळं मला ड्रग्ज घेण्याचं, त्यांची विक्री करण्याचं सोडून देऊन समाजाचा एक मदतदायी सदस्य बनण्याची शक्‍ती मिळाली.

आज मला यहोवाच्या उपासकांच्या विश्‍वव्यापी बंधुसमाजाचा एक भाग बनण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. या बंधुसमाजातील लोक एकमेकांवर खरोखर प्रेम करतात व ते ऐक्याने देवाची सेवा करतात. (योहान १३:३४, ३५) याच बंधुसमाजातून माझी ओळख एका खास व्यक्‍तीशी, म्हणजे ॲड्रिएनशी झाली. ती माझी सहचारिणी झाली व तिच्यावर मी जिवापाड प्रेम करतो. एकमेकांच्या सोबतीनं आमच्या निर्माणकर्त्याची सेवा करण्यातील आनंद काही निराळाच आहे!

पूर्वी मी स्वतःसाठी जीवन जगत होतो. आता मी स्वेच्छेने पूर्ण वेळेचा सेवक बनलो आहे व देवाच्या वचनातून फायदा कसा मिळवायचा ते लोकांना शिकवत आहे. या कामातून मला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. बायबलमुळंच माझं जीवन बदललं, हे मी अगदी ठासून सांगू शकतो. मला खरं स्वातंत्र्य आत्ता मिळालंय! ▪ (w१३-E ०१/०१)