व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवा

आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवा

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवा

लॉईडा * नावाची मेक्सिकोतील एक आई म्हणते: “शाळेतच कॉन्डम वाटले जातात. त्यामुळे किशोरवयीन मुलांना वाटते, की ‘सुरक्षित’ सेक्ससंबंध ठेवण्यात काहीही गैर नाही.”

नोबुको नावाची जपानमधील एक आई म्हणते: “मी माझ्या मुलाला एकदा विचारलं, की तू तुझ्या मैत्रिणीसोबत एकटा असला तर काय करशील? तेव्हा त्यानं मला उत्तर दिलं: ‘माहीत नाही.’”

तुमचे मूल नुकतेच चालायला शिकले तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या घरातील सामान-सुमानाची जागा बदलली असेल. त्याला काही इजा होऊ नये याची तुम्ही खबरदारी घेतली असेल, नाही का? कदाचित तुम्ही त्याचे हात पोहचतील असे सर्व प्लग चिकट-पट्टीने झाकून टाकले असतील, टोकदार वस्तू लपवून ठेवल्या असतील आणि जिन्याच्या पायऱ्‍यांजवळ गेट लावले असेल. हे सर्व तुम्ही तुमच्या लहानुल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी केले असेल.

असेच जर तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलाला अथवा मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकला असता तर किती बरे झाले असते! त्यांच्याबाबतीत आता तुम्हाला वेगळ्याच चिंता असतील. ‘माझ्या मुलाला पोर्नोग्राफी (अश्‍लील चित्रे) पाहण्याची सवय तर लागली नाही ना?’ ‘माझी मुलगी तिच्या मोबाईलवरून स्वतःची अश्‍लील चित्रे कुणाला पाठवत तर नसेल ना?’ आणि सर्वात भीतीदायक प्रश्‍न तुम्हाला भेडसावत असेल, ‘माझा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी शरीरसंबंध तर ठेवत नाही ना?’

ज्याची होती भीती

काही पालक आपल्या मुलांच्या आसपास राहून व त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून त्यांच्यावर जणू काय २४ तास पहारा ठेवण्याचा प्रयत्न करतात. नंतर त्यांना कळते, की मुलांवरील त्यांच्या या करड्या नजरेमुळे त्यांची किशोरवयीन मुले, त्यांच्या मागे कार्य करतात. पालक ज्या गोष्टी करण्यापासून त्यांना रोखत होते नेमक्या त्याच गोष्टी त्यांचा मुलगा किंवा मुलगी लपून-छपून करण्यास शिकली आहेत.

यावरून स्पष्ट कळते, की मुलांना दबावात ठेवल्याने मुले सुधारत नाहीत. स्वतः यहोवा देवही, त्याने निर्माण केलेल्या मानवांना त्याच्या आज्ञेत राहण्याकरता अशा पद्धतीचा अवलंब करत नाही तर पालकांनो, तुम्हीही असे करू नका. (अनुवाद ३०:१९) मग तुम्ही आपल्या किशोरवयीनांना योग्य नैतिक निर्णय घेण्यास कशी मदत करू शकाल?नीतिसूत्रे २७:११.

यासाठी मुले लहान असतात तेव्हापासूनच त्यांच्याबरोबर तुम्ही संवादाचा मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. * (नीतिसूत्रे २२:६) आणि मग ते जेव्हा किशोरावस्थेत पोहचतात तेव्हाही त्यांच्याबरोबर बोलत राहा. पालक या नात्याने तुमच्या किशोरवयीनांना विश्‍वसनीय माहिती सर्वात आधी तुमच्याकडून मिळाली पाहिजे. अलीशा नावाची ब्रिटनमधील एक मुलगी म्हणते: “लोकांना वाटतं, की आम्हा तरुणांना सेक्सबद्दल आमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बोलायला आवडतं. पण ते खरं नाही. आमच्या पालकांनी या गोष्टी सांगितलेल्या आम्हाला अधिक आवडतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आम्ही डोळे झाकून विश्‍वास ठेवू शकतो.”

मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवण्याची गरज

मुले जसजशी लहानाची मोठी होतात तसतसे त्यांना अधिक माहिती देण्याची गरज असते. जसे की, गर्भधारणा होऊन बाळाचा जन्म कसा होतो केवळ इतकेच सांगणे पुरेसे नसते तर त्यांना मार्गदर्शन देणे आवश्‍यक असते. शिवाय, त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला” पाहिजे. (इब्री लोकांस ५:१४) थोडक्यात, त्यांच्या मनात नैतिक मूल्ये रुजवण्याची गरज आहे. योग्य लैंगिक वर्तनाबद्दल त्यांचे ठाम मत असले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी जगले पाहिजे. तर तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात नैतिक मूल्ये कशी रुजवू शकता?

तुमची स्वतःची कोणती मूल्ये आहेत ते आधी पाहा. जसे की, जारकर्म म्हणजे लग्न न झालेल्या पुरुष व स्त्रीमधील लैंगिक संबंध हे चुकीचे आहे, असा तुमचा पक्का विश्‍वास असेल. (१ थेस्सलनीकाकर ४:३) याबाबतीत तुमच्या मुलांना तुमचे मत माहीत असेल; तुम्ही असा विश्‍वास का करता त्याची बायबलमधील वचनेही कदाचित ते सांगू शकतील. आणि तुम्ही त्यांना प्रश्‍न विचारता तेव्हा ते, लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक आहे असे पटकन उत्तरही देतील.

पण फक्‍त इतकेच पुरेसे नाही. काही तरुण, सेक्सबद्दल त्यांचे पालक काय विश्‍वास ठेवतात त्याजशी आपणही सहमत आहोत असे वरवर दाखवतील, असे सेक्स स्मार्ट नावाच्या पुस्तकात म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे: “स्वतःचे मत बनवायला कदाचित त्यांना कठीण वाटेल. त्यामुळे, त्यांच्यासमोर जेव्हा एखादा अनपेक्षित प्रसंग येतो तेव्हा कोणते वर्तन उचित आहे व कोणते नाही हे ठरवण्याच्या बाबतीत त्यांच्या मनात गोंधळ चालतो व मग त्यांच्या हातून काहीतरी पाप घडते.” म्हणूनच तर त्यांच्या मनात नैतिक मूल्ये रुजवणे महत्त्वाचे आहे. ही नैतिक मूल्ये आत्मसात करायला तुम्ही तुमच्या किशोरवयीनांना कशी मदत करू शकाल?

तुमची मूल्ये त्यांना स्पष्ट सांगा. शरीरसंबंध केवळ पती-पत्नीतच मर्यादित आहे, असा तुम्ही स्वतः विश्‍वास करता का? मग याविषयी आपल्या किशोरवयीनांना स्पष्ट व गरज पडेल तसे नेहमी सांगत राहा. बियॉन्ड द बिग टॉक नावाच्या एका पुस्तकानुसार, “ज्या घरातील पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या वागण्यातून, किशोरवयीनांनी शरीरसंबंध ठेवल्याचे त्यांना मुळीच खपत नाही, असा स्पष्ट संदेश दिलेला असतो, ते किशोरवयीन कदाचित लैंगिक कृत्य आचरणार नाहीत,” असे संशोधनावरून दिसून आले आहे.

पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे, फक्‍त तुमची मूल्ये मुलांना सांगितल्याने तुमचे किशोरवयीन त्यानुसार वागण्याची निवड करतीलच याची खात्री नाही. कुटुंबातील सदस्यांनी देखील ही मूल्ये बाळगावीत असे स्पष्ट सांगितल्याने कदाचित तुमची मुलेसुद्धा तीच मूल्ये आचरतील. आणि अभ्यासांतून असे दिसून आले आहे, की ज्या मुलांनी किशोरावस्थेत असताना आपल्या पालकांच्या मूल्यांचा कदाचित अवलंब केला नाही त्यांनी कालांतराने ती स्वीकारली आहेत.

हे करून पाहा: चर्चा सुरू करण्याकरता व मुलांना तुमची मूल्ये सांगण्याकरता एखाद्या घटनेविषयीच्या बातमीचा उल्लेख करा. जसे की, बलात्काराविषयीची एखादी बातमी असेल तर तुम्ही म्हणू शकता: “काही पुरुष स्त्रियांचा किती गैरफायदा घेतात हे पाहून मला खरंच खूप धक्का बसतो. कुठून मिळत असतील रे या पुरुषांना अशा कल्पना?”

सेक्सबद्दलच्या खऱ्‍या गोष्टी त्यांना शिकवा. इशारा देणे आवश्‍यक आहे. (१ करिंथकर ६:१८; याकोब १:१४, १५) पण बायबलमध्ये, सेक्स हे सैतानाचा पाश नव्हे तर देवाकडून मिळालेली एक देणगी आहे, असे सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे ५:१८, १९; गीतरत्न १:२) सेक्सबद्दलच्या फक्‍त धोक्यांविषयी तुम्ही आपल्या किशोरवयीनांना सांगितले तर सेक्सबद्दलचा विकृत व बायबलनुसार नसलेला दृष्टिकोन त्यांच्या मनात वाढत राहील. कोरिना नावाच्या फ्रान्समधील एका तरुणीने म्हटले: “माझे आईवडील लैंगिक अनैतिकता याविषयी इतके बोलत राहिले, की लैंगिक संबंधांबद्दलचा माझा दृष्टिकोनच नकारात्मक झाला.”

तेव्हा, सेक्सबद्दलच्या खऱ्‍या गोष्टी त्यांना शिकवा. मेक्सिकोतील नाडिया नावाची एक आई म्हणते: “मी माझ्या मुलांना हे सांगायचा प्रयत्न करते, की शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नैसर्गिक, तृप्तीदायक आहे व यहोवा देवानेच ती मानवांना उपभोगण्यासाठी दिली आहे. पण सेक्सलाही उचित स्थान आहे म्हणजे फक्‍त विवाहाच्या चाकोरीतच हे संबंध असले तर तुम्ही आनंदी होऊ शकता, नसले तर दुःखी.”

हे करून पाहा: पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर सेक्सबद्दल बोलाल तेव्हा शेवटी काहीतरी सकारात्मक बोला. भविष्यात जेव्हा त्याचा किंवा तिचा विवाह होईल तेव्हा देवाने दिलेल्या या सुरेख देणगीचा ती किंवा तोही उपभोग घेईल, हे सांगण्यास लाजू नका. पण लग्न होत नाही तोपर्यंत तुमचा किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी देवाच्या स्तरांनुसार वागेल, याची तुम्हाला खात्री आहे, असा भरवसा व्यक्‍त करा.

परिणामांचा विचार करायला किशोरवयीनांना मदत करा. जीवनातील कोणत्याही पैलूत योग्य निर्णय घेता यावेत म्हणून किशोरवयीनांना वेगवेगळे पर्याय ओळखता आले पाहिजेत आणि प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे तोलून पाहता आले पाहिजेत. बरोबर व चूक, फक्‍त इतकेच माहीत असणे पुरेसे आहे, असा विचार करू नका. ऑस्ट्रेलियातील एमा नावाची एक ख्रिस्ती स्त्री म्हणते: “किशोरवयात केलेल्या चुकांवर जेव्हा मी आता विचार करते तेव्हा म्हणू शकते, की देवाचे स्तर फक्‍त माहीत असण्याचा अर्थ मी त्यांजशी सहमत आहे, असा होत नाही. या स्तरांनुसार जगल्याने कोणते फायदे होतात व कोणते तोटे होतात हेही समजणे महत्त्वाचे आहे.”

याबाबतीत बायबल आपली मदत करू शकते. कारण, बायबलमध्ये अनेक आज्ञा दिल्या आहेत. आणि या आज्ञांचे उल्लंघन केल्याने काय होईल तेही त्यात सांगण्यात आले आहे. जसे की, नीतिसूत्रे ५:८, ९ या वचनांत तरुणांना व्यभिचारापासून चार हात दूर राहण्याचे आर्जवण्यात आल्यानंतर म्हटले आहे, की जर ते दूर राहिले नाहीत तर ‘त्यांची अब्रू दुसऱ्‍यांच्या हाती जाईल.’ या वचनांवरून असे सूचित होते, की लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणारे काही प्रमाणात, आपले शील, आपली एकनिष्ठा व आपला आत्म-सन्मान गमावून बसतात. आणि असे गुण असलेल्या त्यांच्या भावी जोडीदाराला ते आकर्षक वाटत नाहीत. देवाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने उद्‌भवणाऱ्‍या शारीरिक, भावनिक व आध्यात्मिक धोक्यांवर विचार केल्याने तुमच्या किशोरवयीनांचा देवाच्या स्तरांनुसार जगण्याचा निर्धार आणखी पक्का होईल. *

हे करून पाहा: काही उदाहरणे देऊन आपल्या किशोरवयीनाला, देवाच्या स्तरांचे पालन करण्यात किती सुज्ञपणा आहे हे समजायला मदत करा. जसे की, तुम्ही म्हणू शकता: “शेकोटीतली आग आणि जंगलात लागलेली आग या दोन्हींतील फरक काय आणि तुझे उत्तर, सेक्सबद्दल देवाने घालून दिलेल्या मर्यादेला कसे लागू होते ते मला सांग.” नीतिसूत्रे ५:३-१४ येथील माहितीचा उपयोग करून आपल्या किशोरवयीनाला व्यभिचाराचे हानीकारक परिणाम समजायला मदत करा.

जपानमधील १८ वर्षीय ताकोवा म्हणतो: “मला माहीत आहे की जे बरोबर आहे ते मी केलं पाहिजे पण, माझ्या मनात शरीराच्या वासनांविरुद्धचा लढा सतत चालू असतो.” ज्या तरुणांना असे वाटते त्यांना हे माहीत करून दिलासा मिळेल, की अशा भावना केवळ त्यांच्याच मनात येत नाहीत तर इतर तरुणांच्या मनातदेखील येतात. ख्रिस्ती विश्‍वासांत अगदी मुरलेल्या प्रेषित पौलानेदेखील असे कबूल केले: ‘मी जो सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ सुद्धा वाईट आहे.’—रोमकर ७:२१.

किशोरवयीनांना कळून येईल, की असा लढा नेहमीच वाईट नसतो. यामुळे त्यांना, ते कोणत्या प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छितात यावर विचार करायची प्रेरणा मिळेल. ‘मी माझ्या जीवनाचा ताबा घेऊन, शील जपणारा व सचोटी टिकवणारा म्हणून नाव कमावू इच्छितो की, आपल्या वासनेला लगेच बळी पडणारा असे नाव कमावू इच्छितो?’ या प्रश्‍नावर ते गांभीर्याने विचार करू लागतील. उत्तम नैतिक मूल्ये मनात रुजली असतील तर वरील प्रश्‍नाचे योग्य उत्तर देण्यास तुमच्या किशोरवयीन मुलाला अथवा मुलीला मदत मिळू शकेल. (w११-E ०२/०१)

[तळटीपा]

^ या लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ मुलांबरोबर सेक्सबद्दलच्या संभाषणाला कोठून सुरुवात करायची, व मुलांच्या वयानुसार त्याला माहिती कशी द्यायची याबद्दल अधिक माहिती किंवा सूचना हव्या असतील तर एप्रिल-जून २०११ टेहळणी बुरूज पृष्ठे २०-२२ वरील लेख पाहा.

^ अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तरुणांचे प्रश्‍नउपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातला, “विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?” हा अध्याय २३ पाहा.

स्वतःला विचारा . . .

▪ माझ्या किशोरवयीनाची अगदी ठाम नैतिक मूल्ये आहेत, हे मी कशावरून सांगू शकतो?

▪ माझ्या किशोरवयीनाबरोबर सेक्सविषयी बोलताना मी, सेक्स हा सैतानाचा पाश नव्हे तर देवाकडून मिळालेली एक देणगी आहे, असे बोलतो का?

[२७ पानांवरील चौकट]

बायबलमधील त्रिकालाबाधित सल्ला

“लैंगिक वर्तनाविषयी बायबलमधील सल्ला हा त्रिकालाबाधित शाबीत झाला आहे. आज, वयाआधीच लैंगिक कार्यांत भाग घेतल्यामुळे तरुण वर्गाला गंभीर मानसिक परिणाम, विवाहाआधीच होणारी गर्भधारणा, एड्‌स व इतर लैंगिक संक्रमित आजार यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण बायबलमध्ये, विवाहानंतरच शरीरसंबंध ठेवण्याबद्दल दिलेला सल्ला आजही खूप उपयुक्‍त आहे; नव्हे, ‘सुरक्षित शरीरसंबंध’ ठेवण्याचा तोच एकमेव प्रभावी मार्ग आहे.”—पेरंटींग टिन्स वीथ लव्ह ॲण्ड लॉजिक.